नागपूर/प्रतिनिधी:
वीजचोरीला आळा बसावा यासाठी महावितरणतर्फे अनेक उपाय योजण्यात येत आहेत. त्यानुसार सध्या राज्यात सर्वत्र नवीन रेडिओ फ्रिक्वेंसी व इंफ्रारेड असे अत्याधुनिक ईलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्यात येत आहेत. परंतु, याही मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करणाऱ्या लातूर शहरातील ३३ ग्राहकांची वीजचोरी रेडिओ फ्रिक्वेंसी डेटा कॉन्सेट्रेटर युनिटद्वारे (डीसीयू) उघडकीस आणण्यात आली आहे.
नांदेड, लातूर व जळगाव या परिमंडलांमध्ये मोठ्या प्रमाणात वीजहानी असून वीजहानीचे प्रमाण कमी करण्यासाठी या परिमंडलातील काही शहरांमध्ये येत्या वर्षभरात सुमारे ८ लाख ५० हजार रेडिओ फ्रिक्वेंसी मीटर बसविण्यात येणार आहेत. सदर रेडिओ फ्रिक्वेंसी मीटरचे रीडिंग हे डेटा कॉन्सेट्रेटर युनिटद्वारे केंद्रीय बिलींग प्रणालीच्या सर्व्हरवर आणून केंद्रीय बिलींग प्रणालीद्वारे ग्राहकांचे वीजबिल तयार करण्यात येत आहे.
रेडिओ फ्रिक्वेंसी डेटा कॉन्सेट्रेटर युनिट ही प्रणाली मानवविरहित असून या प्रणालीद्वारे ग्राहकांचे अचूक मीटर वाचन नोंदविले जात आहे. त्यामुळे ग्राहकांची वीजबिलांबाबत कोणतीही तक्रार राहणार नाही. या प्रणालीद्वारे प्रत्येक ग्राहकांचे मीटर रीडिंग उपलब्ध होत असून दर १५ मिनिटांमध्ये ग्राहक किती विजेचा वापर करीत आहे ते (realtime) बघता येईल. तसेच त्या भागात वीजपुरवठा करणाऱ्या रोहित्रावर त्यावेळी किती वीजभार आहे, याची अचूक माहिती देखील या प्रणालीमुळे मिळणार आहे.
या रेडिओ फ्रिक्वेंसी डेटा कॉन्सेट्रेटर प्रणालीद्वारे होणाऱ्या मीटर वाचनामुळे एखादा ग्राहक वीजचोरी करीत असेल तर त्याची माहिती केंद्रीय सर्व्हरमधून मिळते. त्यामुळे ग्राहकांकडून होणाऱ्या वीजचोरीस आळा बसण्यास मदत होणार आहे. लातूर शहरामध्ये ८८,३३८ एवढे मीटर बसवायचे असून त्यापैकी ६२,२६५ इतके मीटर बसविण्यात आले आहेत. या प्रणालीद्वारे ग्राहकांच्या मीटर रीडिंगची माहिती येण्यास सुरवात झाली असून एप्रिल- मे महिन्यामध्ये एकूण ३८ ग्राहकांनी मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करण्याचा प्रयत्न केला असता त्याची माहिती केंद्रीय बिलींग प्रणालीमध्ये दिनांक व वेळेसहित उपलब्ध झाल्याने त्या ग्राहकांची प्रत्यक्ष वीजचोरी पकडण्यात आली आहे.
या प्रणालीद्वारे लातूर उत्तर व दक्षिण उपविभागातील ३३ ग्राहकांनी वीजचोरी करीत असल्याचे आढळून आले. त्यांनी २४ हजार ९९५ युनिटची वीजचोरी केली असून त्याची अनुमानित रक्कम २ लाख ३७ हजार ३९५ रुपये तर तडजोड रक्कम रू. १ लाख १८ हजार आहे. सदर वीजग्राहकांविरूध्द विद्युत अधिनियम-२००३ च्या कलम १३५ नुसार कारवाई करण्यात आली आहे. ग्राहकांनी वीजचोरीच्या वाईट प्रकाराला बळी पडू नये, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.