वाडी ( नागपूर ) /अरूण कराळे:
परिसरात वेणाजलाशय धरण, सुराबर्डी धरण, नांदोरा धरण, सालईमेंढा धरण, कारली खापरी धरणात पाणीसाठा नसल्याने खर्चाच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तलाव पूर्णपणे आटल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. कूपनलिकांना पाणी बंद झाले आहे. परिसरातील नागरिकांच्या व जनवारांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची दाट शक्यता आहे. पावसाअभावी यंदा या भागातील कोणताच तलाव पूर्ण क्षमतेने भरला नाही. काही तलाव कोरडे, तर काही मृतसंचय साठ्याखाली आहेत. परिणामी नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा व जनावरांचा चारा-पाण्याचा प्रश्न उभा आहे. साततच्या दुष्काळी स्थितीमुळे अर्थकारणावर मोठा परिणाम झाला आहे. परिसरातील पाण्याचे सर्वच स्त्रोत आटले. बोअरवेल, विहिरी, तलाव कोरडे पडले आहे.
परिसरात पाण्याचे टँकर येताच पाणी मिळविण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडते. महिलांसह लहान मुले, आबाळवृद्धही गुंडभर पाण्यासाठी धडपड करीत असतात. घरातील मिळेल त्या भांड्यात टँकरमधून पाणी घेतात व साठवून ठेवतात. यासाठी वाडी नगर परिषद प्रशासनाने नागरिकांना टँकरची व्यवस्था करून दिली. असली तरी ग्रामीण भागातील गावकऱ्यांची तहाण भागणार काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाने वा जिल्हा परिषद प्रशासनाने पाणी टंचाई निवारण आराखड्यानुसार उपाययोजना करावी, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष भर उन्हाळ्यात परिसरातील गावकऱ्यांच्या पाण्यासाठी चाललेला संघर्ष प्रशासनाला दिसून येत नाही का ? हे दुर्दैव आहे. नागरिकांच्या नशिबी दिवसरात्र पाण्यासाठी पायपीट करण्याची दुर्दैवी वेळ आल्यानंतरही तालुका प्रशासनाचे अधिकारी एवढे अनभिज्ञ कसे ? एकीकडे पाण्यासाठी गावकऱ्यांचे हाल होत असताना गावाकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. अंधारल्या रात्रीही नागरिकांना मिळेल तिथून पाणी आणावे लागत आहे.
निवडणुकांच्या तोंडावर या योजना काही दिवस कार्यान्वित झाल्या; परंतु सध्या योजना बंद आहेत. उन्हाची दाहकता प्रचंड वाढली असून, नागरिकांचे पाणी व जनावराचे पाणी, चाराप्रश्न उभे असताना या योजना बंद राहिल्याने सर्वांची होरपळ होत आहे. २०१८मध्ये जुलै, ऑगष्टच्या पावसाळ्यात पाऊस नसल्याने खरीप व रब्बी वाया गेला आहे. पीकविमा ही समाधानकारक मिळालेले नाही. त्यामुळे खरीप व रब्बी शेतकरी हताश झालेआहेत.
वेणा जलाशय
वेणा जलाशयाची निर्मिती १९६८ मध्ये झाली. साडेपाचशे हेक्टर परिसरात धरण पसरलेले असून धरणांची पाणी साठवण क्षमता २१.६४२ दलघमी (दश लक्ष घण मीटर) एवढी आहे. तर सिंचन क्षमता १२१४ हेक्टर आहे.
सध्या स्थितीत वेणाजलाशय धरणात १९६८ पासून गेल्या ५० वर्षात पाऊस कमी पडल्याने पहिल्यांदाच पाणी मृतसंचय १.९२५ दलघमी मृतसाठ्याखाली नोंद केल्याची माहिती प्राप्त झाली.
झिल्पी तलाव
या धरणांचे पाणी शेतीसाठी मांडव घोराड, मोहगाव, भिवकुंड या परिसरात दिले जाते.
धरणांची पाणी साठवण क्षमता १०२.९० दलघमी एवढी असून कमी पाऊसामुळे २८.४६ टक्के झाली. सध्या स्थितीत पाणीसाठा ०.१३७४ दलघमी साठा असून ९.९ टक्के एवढी शिल्लक आहे.
सुराबर्डी धरण
धरणांची पाणी साठवण क्षमता ३४०.३५ दलघमी एवढी असून कमी पाऊसामुळे ६५.४५ टक्के झाली. सध्या स्थितीत पाणीसाठा ०.७०७१ दलघमी साठा असून ३०.९४ टक्के एवढी शिल्लक आहे.
नांदोरा धरण
धरणांची पाणी साठवण क्षमता १०२.५० दलघमी एवढी असून कमी पाऊसामुळे ४३.९२ टक्के झाली. सध्या स्थितीत पाणीसाठा १.०७५६ दलघमी साठा असून २२.४४ टक्के एवढी ९.१७ टक्के शिल्लक आहे.
या धरणातील पाणी शेतीकरीता व वन्य प्राण्यांकरीता उपयोगात येते.
सालईमेंढा धरण
धरणांची पाणी साठवण क्षमता ३७४.७० दलघमी एवढी असून कमी पाऊसामुळे ७८.०१ टक्के झाली. सध्या स्थितीत पाणीसाठा ०.४४१४ दलघमी साठा असून २०.८६ टक्के एवढी शिल्लक आहे.
या धरणातील सालईमेंढा, बोरगाव परिसरात पाणी शेतीकरीता व वन्य प्राण्यांकरीता उपयोगात येते
खापरी, कारली तलाव
या परिसरात दोन छोटे तलाव असून शेतीकरीता व वन्य प्राण्यांकरीता वापरले जातात.
सध्या स्थितीत पाणी मृतसाठ्याखाली नोंद केली आहे. वेणाजलाशय धरणांची निर्मिती १९६८ मध्ये साडेपाचशे हेक्टर परिसरात झाली. गेल्या ५० वर्षांपासून पहिल्यांदाच कमी पाऊसामुळे २०१९ या वर्षात धरणांच्या घशाला कोरड पडली आहे . एक दलघमी सध्या साचलेला गार माती असल्याने टाकायचा कुठे? याबाबत वरिष्ठांना माहिती दिली. वरिष्ठांचे आदेश येईतोपर्यंत परिसरातील शेतकऱ्यांनी लेखी अर्ज देऊन शेतीकरीता उपयोगी माती असल्याने विनामुल्य देऊ असे आवाहन जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता राजीव वसू यांनी केले.