Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मे २८, २०१९

एचव्हीडीएस अंतर्गत विदर्भातील 2814 कृषीपंपांना वीज जोडण्या

शाश्वत आणि दर्जेदार वीजपुरवठा देणारी महावितरणची एक रोहीत्र - एक वीज जोडणी योजना कार्यान्वित

नागपूर/प्रतिनिधी:

प्रत्येक राज्याच्या विकासात कृषी क्षेत्राचे महत्वपुर्ण योगदान असते आणि त्यासाठी कृषीपंपांना शास्वत आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळणे गरजेचे आहे, ही बाब हेरुन राज्यातील शेतक-यांना योग्यदाबाचा आणि विश्वसनिय वीजपुरवठा मिळावा यासाठी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फ़डणवीस आणि ऊर्जा तथा नवीन व नवीकरणीय ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कल्पनेतून साकारलेल्या उच्चदाब वितरण प्रणाली योजने (एचव्हीडीएस) अंतर्गत शेतक-यांना वीज जोडणी देणे सुरु झाले आहे. या योजनेंतर्गत मागिल चार महिन्यात महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राअंतर्गत विदर्भातील 2 हजार 814 वीज जोडण्या देत कृषीपंपांना शाश्वत वीजपुरवठा मिळणे सुरु झाले आहे.

या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एका वितरण रोहीत्रावर जास्तीत जास्त एक किंवा दोन कृषिपंपांना वीज जोडण्या दिल्या जात असल्याने विविध कारणांमुळे विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या त्रासापासून शेतक-यांची कायमची सुटका झाली आहे. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या कुशल नेतृत्वात या योजनेतील कामांनी वेग घेतला असून लवकरात लवकर सर्व प्रलंबित कृषीपंपांना वीज जोडण्या देण्याचे काम सर्वत्र युद्धपातळीवर सुरु झाले आहे.

या योजने अंतर्गत मागिल चार महिन्यात विदर्भातील 2 हजार 814 कृषीपंपांना वीज जोडण्या देण्यात आल्या असून त्यासाठी 2 हजार 771 वितरण रोहीत्रांसोबतच तब्बल 2 हजार 365.18 किमी लांबीची उच्चदाब वीज वाहिनीही उभारण्यात आली आहे. सोबतच 9 हजार 282 ठिकाणी रोहीत्रे उभारण्यासाठी आवश्यक सुविधा तयार करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रात 31 मार्च 2018 पर्यंत पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषीपंपाच्या वीज जोडण्यांचाही समावेश करण्यात आला आहे. 
उच्चदाब वितरण तंत्र

सध्या 65 व 100 केव्हीए क्षमतेच्या एका रोहित्रावरून 10 ते 15 कृषिपंपांसाठी विद्युत पुरवठा केला जातो. सोबतच आकडे टाकून विजेचा वापर करणारांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे वीजेचा दाब वाढून रोहित्र जळण्याचे प्रमाणही अधिक आहे. प्रचलित पद्धतीमुळे लघुदाब वाहिनीची लांबी वाढते, वीज हानी मोठ्या प्रमाणात होते. शिवाय कृषिपंपांना कमी दाबाने वीजपुरवठा होतो. वीजपुरवठ्यात वारंवार बिघाड होतो. यावर ‘एचव्हीडीएस’ योजनेद्वारे या सर्वांवर मात करता येणे शक्य आहे. यात उच्च दाबाच्या वाहिन्या टाकून लघुदाब वाहिन्यांची संख्या मर्यादीत ठेवत शेतकर्-यांना पुरेशी वीज देता येणे शक्य होत आहे. शेतकर्-यांना थेट वितरण रोहित्रावरून वीज दिली जाणार असल्याने आकडे टाकून वीजचोरी करता येणार नाही सोबतच वीज हानी रोखण्यास मदत मिळणार असून, रोहित्रावर ताण येणार नाही. तो जळणार नाही यामुळे कृषी पंपांनाही शाश्वत आणि दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध होत आहे. याशिवाय शेतक-यांमध्ये त्या रोहीत्राबाबत स्वामित्वाची भावना निर्माण होण्यासही मदत होत आहे.

नागपूर परिक्षेत्रांतर्गत एचव्हीडीएस योजनेची सद्यस्थिती

जिल्हा कार्यान्वित करण्यात आलेली रोहीत्रे दिलेल्या वीज जोडण्या
अकोला 331 213
बुलढाणा 445 455
वाशिम 316 360
अमरावती 99 105
यवतमाळ 346 376
चंद्रपूर 154 132
गडचिरोली 150 142
भंडारा 219 219
गोंदीया 205 206
नागपूर 365 366
वर्धा 141 141
एकूण 2771 2814


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.