Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, फेब्रुवारी २३, २०१९

भंडारा व गोंदिया जिल्हयातील विविध सिंचन प्रकल्पासाठी भरीव निधी




तिरोडा (गोंदिया) 23 :- गरीब, शेतकरी, आदिवासी तसेच सर्वसामान्य व्यक्तींच्या जीवनात परिवर्तन घडवून सर्वांगीण विकासावर भर देण्यात येत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

तिरोडा येथे जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मैदानावर विविध सिंचन कामांचे भूमीपूजन व लोकार्पण सोहळयाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. तिरोडा शहरातील विविध विकासकामासांठी तसेच भंडारा व
गोंदिया जिल्हयातील विविध सिंचन प्रकल्पांसाठी भरीव निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. अशी घोषणाही श्री फडणवीस यांनी यावेळी केली. यावेळी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री राजकुमार बडोले, आमदार विजय रहांगडाले, नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, आशिष बारेवार, हेमंत पटले, बाळूभाऊ मलघाटे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विदर्भातील सिंचनाचा अनुशेष भरुन काढण्यात येत असून तिरोडा तालुक्यातील सिंचनाच्या कामांना गती देण्यात येत आहे. धापेवाडा सिंचन योजना या परिसरासाठी अत्यंत
महत्वाची आहे. धापेवाडा सिंचन प्रकल्पाच्या टप्पा दोनसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून यापुढेही शंभर कोटी रुपयांचा अधिकचा निधी देण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यानंतर या क्षेत्रातील सिंचनाची क्षमता ९१ हजार हेक्टरपर्यंत पोहोचणार आहे. यामुळे दोन्ही जिल्हे सुजलाम सुफलाम होतील. गोसेखुर्द प्रकल्पाद्वारे 50 हजार हेक्टर पर्यंत सिंचन क्षेत्र पोहोचले आहे. हा प्रकल्प लवकरच पुर्णत्वाला जाईल.
पायाभूत सुविधांच्या उभारणी संदर्भात श्री फडणवीस म्हणाले,
देशात व राज्यात रस्ते विकासाची कामे वेगात सुरु असून २० हजार किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. राज्यात राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग व मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या अंतर्गत ५० हजार किलोमीटरचे रस्ते तयार करण्यात आले असून याद्वारे गावे शहरांना जोडली जात आहेत.
कृषी विकासाबाबत श्री फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांना ५० हजार कोटींची मदत करण्यात आली असून यावर्षी सात हजार कोटी रुपयांची मदत करण्यात येत आहे. ४ वर्षात साडेआठ हजार कोटी रुपयांची शेतमालाची खरेदी
करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्यात 51 लाख शेतकऱ्यांना 21 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. तिरोडा तालुक्यातील काही उर्वरीत शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात येईल. कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात सहा हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत असून ७५ हजार कोटी रुपयांची तरतुद यासाठी करण्यात आली आहे. यामध्ये दरवर्षी वाढही करण्यात येणार आहे. शेतकरी कंपन्या व गट तयार करुन शेतकऱ्यांना सक्षम करण्यात येत
आहे. रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट समोर ठेवून शेतीवर आधारीत उद्योगासाठी वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून दहा हजार गावातील प्राथमिक सोसायटयांना बळकट करण्यात येत आहे.
विविध योजनांसदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेतर्गत पाच लाख गरीबांना घरे देण्यात आली असून यापुढेही पाच लाख गरीबांना घरे देण्यात येत आहे. गरीबांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यात येत आहेत. उज्वला योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना दिलासा मिळत आहे. उजाला योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरात वीज पोहोचली आहे. ३२ लाख परिवार महिला बचतगटाद्वारे जोडण्यात आले आहेत.
सुमतीबाई सुकळीकर योजनेद्वारे महिला बचतगटांना कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून ५० कोटी लोकांना पाच लाख रुपयापर्यंतचे उपचार मोफत देण्यात येत आहेत. असंघटीत क्षेत्रातील कामगारांनाही पेंन्शन योजनेद्वारे लाभ पोहोचविण्यात येत आहे. ११ कोटी
लोकांना मुद्रा योजनेचा लाभ देण्यात आला असून यामध्ये सहा कोटी महिलांचा समावेश असल्याचे श्री फडणवीस यांनी सांगितले.

तिरोडा शहरातील पिण्याच्या पाण्याच्या योजनेला मान्यता देण्यात आली असून शहरातील भुयारी गटार योजनेसाठी तसेच नगरपालिकेची इमारत, नाटयगृहे यांच्या उभारणीसाठीही भरीव निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.अशी घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले, वन, खनिज आणि अन्य बाबतीतही विदर्भ संपन्न प्रदेश आहे. विदर्भाच्या सिंचनाचा अनुशेष भरुन काढण्यावर भर देण्यात येत आहे. जलयुक्त शिवार अभियान , प्रधानमंत्री सिंचन योजना यासारख्या योजनांच्या माध्यमातून या प्रयत्नांना गती देण्यात येत आहे.
यापुढे आता कॅनॉलऐवजी पाईपने पाणी देण्यात येणार आहे. सिंचन क्षेत्रात राज्य अग्रेसर आहे. देशात व राज्यात रस्तेविकासाची कामेही वेगात सुरु आहेत. गंगा नदी शुध्दीकरणाचे कामही युध्दपातळीवर सुरु असून आगामी वर्षात गंगा नदी पूर्णपणे शुध्दीकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी यापुढे पीक पध्दतीत बदल करण्याची आवश्यकता असून जैवइंधनासाठी आवश्यक पीके घेण्यावर शेतकऱ्यांनी भर देण्याचे आवाहनही श्री गडकरी यांनी केले.
पालकमंत्री राजकुमार बडोले म्हणाले , जिल्हयात रस्तेविकासाची कामे वेगात सुरु असून गरीबांपर्यंत विविध योजना पोहोचविण्यावर भर देण्यात येत आहे. जिल्हयातील विविध सिंचन प्रकल्पांच्या कामांना गती देण्यात आली असून हे सर्व प्रकल्प लवकरच पूर्ण होतील व शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळेल. शेतकरी व आदिवासी यांनाही विविध योजनांतर्गत लाभ देण्यात येणारअसल्याचे श्री बडोले यांनी सांगितले.

आमदार विजय रहांगडाले म्हणाले, धापेवाडा सिंचन प्रकल्पाची उभारणी येथील शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठी झाली असून टप्पा दोन व तीनच्या पूर्णत्वानंतर या परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होईल. सर्व रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या परिसरात जैव इंधनसाठी आवश्यक असणारी पीकेही घेण्यात येत आहेत. तिरोडा शहरातील नवी पाणी पुरवठा योजना लवकरच कार्यान्वित होऊन पूर्ण होईल असा विश्वासही आमदार रहांगडाले यांनी व्यक्त केला.

यावेळी धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा एक चे लोकार्पण , धापेवाडा उपसा सिंचन टप्पा दोन, बोदलकसा चोरखमारा पाईपलाईन व पम्प हाऊसचे भूमीपूजन, धापेवाडा उपसा सिंचन टप्पा एक खरबंदा जलाशयात पाईपलाईनद्वारे सोडलेल्या पाण्याचे पूजन, बाम्पेवाडा(एकोडी) - वडेगाव – तिरोडा ते खैरलांजी रस्ता
बांधकामाचे भूमीपूजन , तिरोडा – रामटेक – मन्सर रस्ता बांधकामाचे भूमीपूजन, गोंदिया – गोरेगाव(घोटी) रस्तेबांधकामाचे भूमीपूजन, तिरोडा शहर पाणीपुरवठा योजना नुतनीकरण व नवीनकरण भूमीपूजन , तिरोडा नगरपरिषद अंतर्गत रस्ते बांधकामाचे भूमीपूजन, गोरेगाव नगरपंचायत अंतर्गत रस्ते बांधकामाचे भूमीपजून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.