Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, फेब्रुवारी २८, २०१९

बिबी ग्रामपंचायतचा जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मान

चाळीस लाखांच्या पुरस्काराचे मानकरी

आवाळपुर/प्रतिनिधी :- 

कोरपना पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या  बिबी ग्रामपंचायतने ग्रामविकास विभागाचा जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कार पटकावला. नुकतेच जिल्हा परिषद चंद्रपूरच्या वतीने प्रियदर्शनी सभागृह चंद्रपूर येथे आयोजित सत्कार सोहळ्यात स्मार्ट ग्राम योजनेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गावकऱ्यांना सन्मानित करण्यात आले.

राज्याचे वित्त मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, आमदार बाळू धानोरकर, आमदार नाना शामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ग्रामविकासाची ग्रामवासीयांना असणारी तडप, सातत्य, पारदर्शकता, निर्हेतुक प्रयत्न, जिद्द, जन्म गावावरील प्रेम असलं म्हणजे गावाचा कायापालट होऊ शकतो. हे बिबी या गावाने केलेल्या अत्याधुनिक विकासावरून कळते. ‘गाव करी ते राव न करी’ या म्हणीचा प्रत्यय या गावात प्रवेश करता क्षणी येते. तंत्र युगाची चाहूल लक्षात घेऊन या गावाने आपली वाटचाल पूर्णत्वाकडे सुरू केलेली आहे.

 बिबी ग्रामपंचायतने २०१७-१८ चा कोरपना तालुका स्मार्ट ग्राम व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता व संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तसेच जिल्हास्तरावरील संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता व संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. जिल्हा स्मार्ट ग्राममध्ये स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. ग्रामपंचायतने गेल्या २ वर्षात अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या मदतीने जवळपास ३ हजार वृक्षांची लागवड केली. तर अनेक ठिकाणी लोकसहभागातून ट्री-गार्ड लावण्यात आले. दोन वर्षात नव्याने जवळपास १२०० मिटर बंद नाल्यांचे बांधकाम करण्यात आले. गावात स्पिकरद्वारे दिवंडी दिली जाते व जनजागृती केल्या जाते. ग्रामपंचायतला नुकतेच आयएसओ मानांकन मिळाले असून जिल्ह्यातील पहिली आयएसओ मानांकन प्राप्त पेसा ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतच्या वतीने दरवर्षी दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून प्रोत्साहन दिले जाते. गावात चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. “ग्राम कि बात” या कार्यक्रमातून गावकऱ्यांचे प्रबोधन केल्या जाते

    ग्रामपंचायतमध्ये वाय-फाय सुविधा उपलब्ध असून ग्रामपंचायतची स्वतंत्र वेबसाईट, ब्लॉग व फेसबुक पेज आहे. ग्रामपंचायतचा सर्व कारभार ऑनलाईन असून ग्रामपंचायत पेपरलेस आहे. गावात ठिकठिकाणी कचराकुंडीची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामपंचायतकडून लोकांना स्वतंत्र शोषखड्डे व सार्वजनिक शोषखड्डे उपलब्ध करून दिले आहे. थंड व शुध्द पाण्याचे एटीएम, सुसज्ज व्यायामशाळा, सुसज्ज ग्रंथालय व वाचनालय, सर्वत्र एलईडी बल्ब, सौर उर्जा पंपाद्वारे पाणीपुरवठा, गाव १०० टक्के हागणदारी मुक्त, दुग्धव्यवसायात गावाची प्रगती, स्वयंरोजगारातून महिला बचत गटांची आर्थिक समृद्धी व दशसूत्रीचा अवलंब, लोकसहभागातून सामाजिक प्रबोधन, स्वतंत्र क्रीडांगण, महिलांकडून घर व परिसराची नियमित स्वच्छता असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जात असून  शाश्वत स्वच्छतेमुळे आजपर्यंत गावात कधीही साथीचे रोग आलेले नाहीत.

दर मंगळवारी अल्ट्राटेकच्या माध्यमातून आरोग्य तपासणी शिबीर व औषध वितरण, पशुचिकित्सा व औषधोपचार शिबीर, सार्वजनिक इमारतींमध्ये रेन वाटर हार्वेस्टिंग, ग्रामपंचायत अंतर्गत ३ जि.प. शाळा आयएसओ आहे. ४ अंगणवाड्या आयएसओ मानांकित आहे. ग्रामपंचायत पेसामध्ये असून ३० आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत MSCIT प्रशिक्षण ड्रायविंग प्रशिक्षण व परवाना मिळवून दिला, गावातील सर्व नागरिकांची वैयक्तिक माहिती आधार क्रमांक, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, जनधन खाते क्रमांक ग्रामपंचायतकडे उपलब्ध आहे. गावाने लोकसहभागातून लाखो रुपयांची कामे केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रीन आर्मीमध्ये गावातील तीन हजार लोकांची नोंदणी झालेली आहे. गावात दर रविवारी स्वच्छता टीमकडून स्वच्छतेची पाहणी करून प्रबोधन केल्या जाते.

 स्मार्ट ग्राम स्पर्धेमुळे गावागावांमध्ये विकासाबाबत स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे लोकसहभाग सुद्धा वाढला असून लोकसहभागातूनच गावाचा विकास शक्य आहे. गावाचा शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांमध्ये दूरदृष्टी व काम करण्याची इच्छा असणे गरजेचे आहे.

प्रा. आशिष देरकर

उपसरपंच, जिल्हा स्मार्ट ग्राम, बिबी


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.