चंद्रपूर/प्रतिनिधी:
शेतकऱ्यांना राज्यसरकारच्या विविध योजनांसह विविध पीक पद्धतीची माहिती व्हावी, शेतकरी आधुनिक शेतीकडे वळावे यासाठी कृषी आणि सरस महोत्सवात प्रात्यक्षिकातून जनजागृती करण्यात येत आहे. मुख्य आयोजन स्थळाच्या बाजुला असणाऱ्या मंडपात योजनांचे प्रात्यक्षिक लक्षवेधी ठरले आहे.
जलयुक्त शिवार, ठिंबक सिंचन योजना, राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत पिकपद्धतीची माहिती कृषी महोत्सवातून प्रात्यक्षिकासह दिली जात आहे. येथील चांदा क्लब ग्राउंडवर शुक्रवारपासून जिल्हास्तरीय कृषी व सरस महोत्सवाला सुरुवात झाली आहे. या महोत्सवात शासकीय योजनांची माहिती देणारे विविध स्टॉल्स लावण्यात आले आहेत. कृषी विभागाने येथे वेगवेगळे स्टॉल्स लावले आहे. कृषी विभागाद्वारे हरितगृहाची माहिती, त्याचे फायदे सांगणारे स्टाल्स येथे लावले आहे. हरितगृह कसे उभारावे, यासाठी कोणती योजना आहे. त्याचे स्वरुप, अनुदान मर्यादा याची माहिती या स्टॉल्सवरून दिली जात आहे.
राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास घटकातील पीकलागवडीची माहिती, यात पीक आधारित शेती पद्धती, दुग्धोत्पादन पशुधन आधारित, इतर पशुधन आधारित शेती पद्धती, तसेच शेडनेट, मधुमक्षिका पालन, मुरघास युनिटची माहिती या स्टॉलवरून देण्यात येत आहे. यासाठी कृषी विभागाचे तज्ज्ञ अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक स्टॉलमध्ये उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहे. शेतकऱ्यांना या योजनांबाबत माहिती जाणून घेण्यासाठी या स्टॉल्सना भेट देण्याचे आवाहन कृषी विभागाकडून केले जात आहे.
चांगल्या उत्पादनासाठी कीड नियंत्रण गरजेचे : देशपांडे
'एकात्मिक कीड व्यवस्थापन'वर चर्चासत्र
उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि चांगल्या उत्पादनासाठी कीड नियंत्रण करणे गरजेचे असल्याचे मत कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाहीचे शास्त्रज्ञ प्रा. डॉ. प्रवीण देशपांडे यांनी व्यक्त केले. जिल्हा कृषी व सरस महोत्सवात शनिवारी दुपारी 1 वाजता आयोजित 'एकात्मिक कीड व्यवस्थापन'वर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी कृषी पर्यवेक्षक वरभे, तालुका कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक जे. व्ही. कावळे उपस्थित होते.
कीड व्यवस्थापनासाठी काही कमी खर्चातील उपाय आहेत. शेतकऱ्यांनी हे उपाय केल्यास कीडीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविता येते. शेतात उभी-आडवी जमीन नांगरून एप्रिल, मे महिन्यात जमीन चांगली तापू द्यावी, जेणेकरून जमिनीतील विषारीद्रव्य किंवा कीटक, कोषाअवस्थेतील किडीचा नाश करता येऊ शकतो आणि पिकांवर किडीचे प्रमाण कमी करता येतात. धान उत्पादक शेतकऱ्यांनी पऱ्हे लागवडीपूर्वी धान मिठाच्या पाण्याने धुवून घ्यावे, त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून उन्हात चांगले धान वाळू द्यावे आणि नंतर पऱ्हे टाकल्यास किडीचे प्रमाण कमी करता येऊ शकते, असे प्रवीण देशपांडे यांनी मार्गदर्शन करताना शेतकऱ्यांना सांगितले.
एका अंडीपुंज मध्ये अडीचशे ते 280 अंडी असतात. शेतकऱ्यांनी हे अंडीपुंज नष्ट केल्यास बऱ्यापैकी कीडनियंत्रण करता येऊ शकते. तसेच विविध सापळ्याच्या माध्यमातून किडीवर नियंत्रण मिळविता येते, प्रकाशसापळा, कामगंध सापळा, नरसाळा सापळा अशाप्रकारच्या सापळ्याचा शेतकऱ्यांनी वापर करावा. कमी खर्चात सापळे उपलब्ध होतात. किंवा घरीसुद्धा ते तयार करता येतो, असे ते म्हणाले.