Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, फेब्रुवारी २३, २०१८

‘युथ एम्पॉवरमेंट समीट’ला दुसऱ्या दिवशीही गर्दी

अनुदान मिळविण्याची मानसिकता बदलविण्याची गरज : विकास गेडाम
नागपूर,ता.२३ : ऋण घेऊन व्यवसाय करताना जे लोक अनुदानाच्या मागे लागले, त्यांचे व्यवसाय खालावल्याचे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. त्यामुळे अनुदानाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन बदलविण्याची आवश्यकता असल्याचे मत महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे प्रबंध संचालक प्रशांत गेडाम यांनी व्यक्त केले.
नागपूर महानगरपालिका समाजकल्याण विभाग व फॉर्चुन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युथ एम्पावरमेंट समिटच्या दुस-या दिवशीच्या सत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, अनुदान हे व्यवसायासाठी पाठबळ देण्याच्या दृष्टीने देण्यात येते. त्या अनुषंगाने मन:स्थिती बदलवली तर आपली परिस्थिती देखील आपसूकच बदलेल, असा हितोपदेशही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. जागतिक सर्वेक्षणानुसार जगातील केवळ दोन टक्के नागरिकांना जीवनात कार्य करावयाचे आहे, हे ठाऊक आहे. मात्र, इतरांचे ध्येय अर्जुनासारखे निश्चित नाही. जीवनात यश मिळविण्यासाठी ध्येय निश्चिती आणि त्यादृष्टीने प्रयत्नांना पर्याय नसल्याचे मतही यावेळी प्रशांत गेडाम यांनी व्यक्त केले. तंत्रज्ञानात बदल होत असताना तो स्वीकारण्यासाठी आपण तयार आहोत का, असा सवाल स्वतःला विचारण्याचे आवाहन गेडाम यांनी उपस्थित युवकांना केले.


  • बँकांमध्ये वाईट अनुभव आले तरी थांबू नका :विजय कांबळे
युवक बँकेकडे ऋण घेण्यासाठी आवेदन करताना अनुदान किती मिळेल, कुठल्या गोष्टींसाठी ऋण मिळेल, तसेच कर्ज थकले तर ते कसे वसूल कराल, असे प्रश्न विचारतात. त्यामुळे हा कर्ज थकवेल, अशी एक मानसिकताच बँक व्यवस्थापकांच्या मनात तयार होते. त्यामुळे ऋण घेण्यासाठी आवेदन करताना स्वतः आपल्या व्यवसाय क्षेत्रातील संपूर्ण अभ्यास करावा. बँकांमध्ये वाईट अनुभव आले तरी थांबू नये, असे मत महाराष्ट्र बँकेचे उपमहाव्यवस्थापक विजय कांबळे यांनी व्यक्त केले. मुद्रा बँकिंग संदर्भातील माहिती देताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष प्रा. अनिल सोले, ईसीपीएचे सचिव कुणाल पडोळे, नवनितसिंह तुली, आशिष वांदिले उपस्थित होते.
ऋण मागताना काय अभ्यास करावा याची माहिती देताना विजय कांबळे पुढे म्हणाले, अनुदान मिळते म्हणून व्यवसाय करू नका. व्यवसायासंबंधीची माहिती कागदावर उतरवून त्याचे सर्वसाधारण अंदाजपत्रक तयार करावे. हे सांगताना त्यांनी सीएची आवश्यकता नसल्याचेही विशेषत्वाने सांगितले.
आपल्यातील आत्मविश्वास बँकेच्या व्यवस्थापकांची मानसिकता बदलवून त्यांना ऋण देण्यास भाग पाडेल, असा विश्वासही व्यक्त केला. कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन मिळविण्याच्या दृष्टीने बँक ऑफ महाराष्ट्र आणि आपल्या कॅबिनचे दरवाजे खुले असल्याचेही विशेषत्वाने नमूद केले.

  • फ्लायअ‍ॅशच्या व्यवसायातून रोजगाराच्या संधी : सुधीर पालीवाल
वीज प्रकल्पामधून मोठ्या प्रमाणात फ्लाय अ‍ॅश (राख) निर्माण होते. ती मानवाच्या स्वास्थासाठी हानीकारक असते. मात्र, त्याद्वारे बांधकामाशी संबंधित वस्तूंची निर्मिती होऊ शकते. त्यामुळे त्याद्वारे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊन प्रदुषणालाही आळा बसेल, असे मत महाराष्ट्र स्टेट फ्लाय अ‍ॅश कौन्सिलचे तज्ज्ञ सदस्य सुधीर पालीवाल यांनी व्यक्त केले. फ्लाय अ‍ॅशच्या माध्यमातून रोजगार निर्मितीबद्दल त्यांनी तरुणाईला मार्गदर्शन केले.
नव्या दमाच्या उद्योजकांनी फ्लाय अ‍ॅशद्वारे निर्मिती वस्तूंच्या निर्मितीच्या क्षेत्रात येण्याची गरज बोलून दाखवताना त्यांनी नव्या तंत्रज्ञानाची आवश्यकता असल्याचेही मत व्यक्त केले.

  • सीडबी ऋण मिळवून देण्यास कटीबद्ध : मुकेश कुमार
सीडबी विशेषतः लघु उद्योग क्षेत्रात कार्य करते. देशाच्या विकासासाठी लघु उद्योग सक्षम असावे. त्या अनुषंगाने उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी सीडबी ऋण मिळवून देण्यास कटीबद्ध असल्याचे मत सीडबीचे मुकेश कुमार यांनी व्यक्त केले. सीडबीच्या विविध योजना त्यांनी संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर मांडल्या. पुढे त्यांनी एमएसएमई अर्थात लघु व मध्यम उद्योगांची माहिती दिली.

  • छोट्या गोष्टींमधूनच मोठी गोष्ट आकारास येते : कैलास कणसे
आजचा युवक भरकटला आहे. काय करावे हे त्याला माहित नाही. अनेकदा संधी चालून येते, पण त्याकडे तो दुर्लक्ष करतो. कारण त्याला मोठे काहीतरी करावयाचे आहे. पण छोट्या-छोट्या गोष्टींमधूनच मोठ्या गोष्टी आकारास येतात, असे मत बार्टीचे महासंचालक कैलास कणसे यांनी व्यक्त केले.
त्यांनी अगदी लहान-लहान गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता बोलून दाखविली. त्याशिवाय विदर्भात मागास जिल्ह्यांमध्ये रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील, यावर विचार करीत महिला बचत गटांना आर्थिक सक्षम करण्याचे उपक्रम बार्टीद्वारे प्रभावीपणे राबविण्याचे प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

  • गुणपत्रिका म्हणजे गुणवत्ता नव्हे : बाळ कुळकर्णी 
आजच्या काळात कमी गुण मिळविणारा विद्यार्थी म्हणजे ‘ढ’ आहे, असे म्हणू शकत नाही. अनेकदा कमी गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांच्या हाताखाली हुशार मुले काम करताना बघितले आहेत. आपली गुणपत्रिका ही गुणवत्ता नव्हे, असे ठाम मत ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी यांनी व्यक्त केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.