Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, डिसेंबर १६, २०१७

दीनदयाल थाली रुग्णसेवेचा पुढचा टप्पा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


नागपूर : ‘दीनदयाल थाली’ हा अत्यंत चांगला प्रकल्प आहे. हा प्रकल्प रुग्णसेवेतील पुढचा टप्पा ठरणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय परिसरात युवा झेप प्रतिष्ठानच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या स्वस्त भोजन योजनेच्या प्रकल्पाचे लोकार्पण आज केंद्रीय सडक परिवहन, जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात मुख्यमंत्री बोलत होते.


  • या कार्यक्रमास नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, महापौर नंदा जिचकार, खासदार अजय संचेती, आमदार सुधाकर कोहळे, ना.गो.गाणार, अनिल बोंडे, कृष्णा खोपडे व रुग्णालयाचे अधिष्ठाता अभिमन्यू निसवाडे तसेच युवा झेप प्रतिष्ठानचे व मनपा सत्ता पक्ष नेता संदीप जोशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
  • गोरगरिबांच्या सेवेसाठी राज्य शासन कटीबद्ध आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, महात्मा फुले जनआरोग्य मोहिमेअंतर्गत हजार आजारांवर मोफत उपचार राज्यात उपलब्ध करुन देण्यात आले आहे. विविध ठिकाणी होत असणाऱ्या आरोग्य शिबिरांमधूनही लाखो जणांची उपस्थिती दिसते. या सर्वांची केवळ तपासणी न करता त्यांच्या आजारांवर उपचार करुन त्यांना आरोग्यसंपन्न स्थितीत घरांपर्यंत पोहचविण्याचे काम शासन करीत आहे.
  • मेयो रुग्णालयासाठी देखील याच स्वरुपात प्रकल्पाचा प्रस्ताव आलेला आहे. याच प्रकारे राज्यात रुग्णांच्या नातेवाईकांना कमीत-कमी दरात जेवण उपलब्ध करुन देणाऱ्या स्वयंसेवी संस्था समोर आल्यास त्यांना जागा उपलब्ध करुन देण्याचा विचार आरोग्य विभागाने करावा, असेही फडणवीस म्हणाले.
  • 5 लाखांची देणगी
  • या लोकोपयोगी उपक्रमास मदत करणारे हजारो हात समाजातून समोर येतील, अशी मला खात्री आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले.
  • ज्या दीनदयालजींच्या नावे हा प्रकल्प सुरु होत आहे. त्यांचा अंत्योदयाचा विचार म्हणजे शेवटच्या गरजू माणसांपर्यंत सेवा पोहोचविणे हे खूप मोठे सामाजिक आर्थिक चिंतन आहे. त्यात अन्नदान ही आपली संस्कृती राहिलेली आहे, असेही गडकरी यावेळी म्हणाले.
  • या प्रकल्पासाठी नितीन गडकरी यांनी 5 लाख रुपये देण्याची घोषणा केली.
  • अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी आपल्या भाषणात प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या. अन्न व नागरी पुरवठा खात्यातर्फे नियमात शक्य आहे त्या पद्धतीची मदत देण्यात येईल, असेही ते म्हणाले.
  • दीनदयाल लंच बॉक्स/थाली
  • शहरात एक कुटूंब शेजारील राज्यातून आले असताना त्या पत्नीपैकी पतीला हृदयविकाराचा झटका आला, अशा स्थितीत आठवडा भराने पैसे संपल्यावर त्या गरजू महिलेचा काही समाजकंटक गैरफायदा घेत आहेत, असे कळल्यावर मदतीला धावून गेलो. तिथे दीनदयाल लंच बॉक्सची कल्पना सुचली व ती सुरु केली. आता येथे दीनदयाल थालीच्या माध्यमातून दररोज किमान 3 हजार रुग्णनातेवाईकांना 10 रुपयात भाजी पोळी आणि भात देणे शक्य होईल, असे युवा झेप प्रतिष्ठानचे संदीप जोशी यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
  • या परिसरात शासनाने या प्रतिष्ठानला 3 हजार चौरस फूट जागा उपलब्ध करुन दिली. 19 नोव्हेंबर 2017 ला पालकमंत्र्यांच्या हस्ते याचे भूमीपूजन झाले आणि एका महिन्यात याचे लोकार्पण होत आहे, याचा आनंद आहे, असे जोशी म्हणाले.
  • कोणतेही शुल्क न घेता आराखडा बनविणारे रचनाकार प्रशांत सातपुते, मातोश्री शांताबेन पटेल यांच्या स्मृतीमध्ये पूर्ण इमारत बांधकामाचा खर्च उचलणारे शहरातील बांधकाम व्यावसायिक सुरेश पटेल व त्यांचे भागीदार कांजीभाई सोडबडिया, चपाती मशीन दान देणारे विपूल पटेल आदींचा यावेळी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
  • कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रेणूका देशकर यांनी केले. मंत्री महोदयांनी पूर्ण प्रकल्पाचे कामकाज कसे चालणार याची येथे पाहणी केली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.