Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, ऑक्टोबर २८, २०१७

प्रश्नचिन्ह' समाजाला प्रेरणादायी उत्तरे देणारी धडपड - सचिन कलंत्रे; समाजसेवक डाँ.गिरीधर काळे सामाजिक संस्थेचा उपक्रम

चंद्रपूर/प्रतिनिधी :
            अनाथ व उघड्यावरच्या 450 फासेपारधी समाजातल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांच्या जगण्याचा प्रश्नचिन्ह सोडवणारे तसेच भटक्या विमुक्त समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी 'भिक मांगो आंदोलन' करणारे अमरावती येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मतिन भोसले यांनी सुरु केलेली 'प्रश्नचिन्ह' ही आश्रमशाळा समाजाला प्रेरणादायी उत्तरे देत आहेत. त्यासाठी त्यांची धडपड महत्वपुर्ण असल्याचे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनी केले. कोरपना तालुक्यातील समाजसेवक डाँ.गिरीधरभाऊ काळे सामाजिक संस्था बिबी च्या माध्यमाने यंदापासून राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांसाठी दिला जाणारा 'जीवन गौरव पुरस्कार' मतीन भोसले यांना प्रदान करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार अँड.वामनराव चटप, समाजसेवक डाँ.गिरीधर काळे,  सविता काळे, सिमा भोसले, डाँ.अरुण कुलकर्णी, ठाणेदार रोकडे, संतोषकुमार पावडे, अंजना काळे, विकास प्रकल्प अधिकारी संजय पेटकर, उपसरपंच आशिष देरकर, पोलीस पाटील राहूल आसुटकर, तंटामुक्त समितीचे शंकर आस्वले उपस्थित होते.
मागील 5 वर्षापासून बिबी येथे दिवाळी ही फटाकेमुक्त व ग्रामस्वच्छता मोहीमेने साजरी करण्यात येते. 'दिव्यग्राम 2017' या महोत्सवात हा पुरस्कार रोख पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह, शाल व सन्मानपत्र देवून  सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आला.

शासनाचे कुठलेही अनुदान नसतांना ताटव्यांच्या शाळेत महाराष्ट्र व परप्रांतातील उघड्यावरच्या भिक मांगणा-या अनाथ पोरांच्या हातात मतिनने पाटी व पुस्तक दिले आहे त्यांची जिद्द समाजाला आशावादी ठेवण्याचे सुचक आहे असे मत माजी आमदार अँड.वामनराव चटप यांनी व्यक्त केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मतिन भोसले यांनी 'प्रश्नचिन्ह' या आश्रमशाळेची निर्मीतीप्रकिया कथन केली. उघड्यावरच्या भिक मांगणा-या मुलांसाठी 6 वर्षापासून आपण स्वत: 'भिक मांगो आंदोलन' करत असून हे करतांना लोकांनी गुन्हे दाखल केले. तुरुंगवासाची शिक्षा भोगली. आज 'प्रश्नचिन्ह' ची अनाथ मुले उत्तराच्या शोधात शिक्षणाने मोठी होत आहे. शासनापेक्षा सामान्य जनतेची मदत मोठी असल्याचा मनोदय मतिन भोसले यांनी व्यक्त केला. यावेळी उल्लेखनिय कार्याबद्दल चंदा झुरमुरे, हबीब शेख, शुभम ढवस, नामदेव घुगूल, नथ्थू घुगूल यांचाही सत्कार करण्यात आला. गावातील युवकांनी मान्यवर व गावक-यांच्या उपस्थितीत व्यसनमुक्तीची शपथ घेवून नवा आदर्श निर्माण केला.

कार्यक्रमाचे संचालन मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक अविनाश पोईनकर यांनी केले. मानपत्राचे वाचन सुरज लेडांगे, प्रास्ताविक रत्नाकर चटप, तर आभार चंदू झुरमुरे  यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सतिश पाचभाई, गणपत तुम्हाणे, राजेश खनके, स्वप्निल झुरमुरे, महेश नाकाडे, शुभम डाखरे, हिराचंद्र कुमरे, इराणा तुम्हाणे, शंकर मडकाम, आकाश उरकुडे, समीर शेख, अकलेश येडमे, संदीप पिंगे, आकाश चटपल्लीवार, विठ्ठल अहिरकर, निलेश पानघाटे, प्राची लेडांगे यांनी परिश्रम घेतले.


 डाँ.गिरीधर काळे यांची समाजसेवा जगणे शिकवणारी - मतिन भोसले
समाजसेवक डाँ.गिरीधर काळे मानवी शरिरातील तुटलेल्या, लचकलेल्या हाडांवर निशुल्क उपचार करुन समाजाला आपले जगणे अर्पण करत आहे. समाजसेवक डाँ.गिरीधर काळे यांची समाजसेवा जगणे शिकवणारी आहे. यामुळे हा पुरस्कार मला नेहमी प्रेरणा देईल.

युवकांचे 'भिक मांगो आंदोलन'
मतिन भोसले यांच्या 'प्रश्नचिन्ह' शाळेतील अनाथ मुलांसाठी गावातील युवकांनी 'भिक मांगो आंदोलन' केले.  बिबी ग्रामस्थांनी योग्य प्रतिसाद देत सढळ हाताने मदत केली. गोळा झालेली मदत सामाजिक कार्यकर्ते मतिन भोसले यांना युवकांनी सुपूर्द केली.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.