Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जून १६, २०१५

दुर्मिळ "ग्रासिली" पालीची नोंद

चंद्रपूर- शहरापासून लगतच असलेल्या तिरवंजा गावाजवळ असलेल्या माळरानात दुर्मिळ "ग्रासिली" जातीची पाल वन्यजीव अभ्यासक दिनेश खाटे यांना आढळली असून,सरपटनाऱ्या प्राण्यांमध्ये आणखी एका दुर्मिळ पालीची नोंद झाली आहे. मागील ७ वर्षापासून सरपटनाऱ्या प्राण्यांचे अध्ययन सुरु असून त्यांच्या प्रयत्नांना या कार्यामुळे यश मिळाले आहे. भारतातील सर्वात लहान पालींमध्ये "ग्रासिली " ह्या पालीचा समावेश होतो,पाल खूप छोटी असल्याने नजरेस दिसून पडत नसल्याने दुर्मिळ मानण्यात येते.

पाली बद्दल माहिती देतांना वन्यजीव अभ्यासक दिनेश खाटे म्हणाले कि चौरस पृष्ठीय पाल ही भारतात आढळणाऱ्या पालींच्या जातीतील एक छोट्या आकाराची पाल आहे. या पालीची सरासरी लांबी ७ ते १० सेमी. असते. साधारणतः ही पाल कोरडवाहू शेतमळे, उघडे माळरान, खडकाळ मैदानी प्रदेश तसेच खुरटीच्या वनांमध्ये आढळून येते. पाठीवर चौरसाकृती ठिपक्यांच्या दोन रांगा डोक्यापासून अगदी शेपटी पर्यंत गेलेल्या असतात. या पालीचे मुख्य खाद्य झुरळ, छोटे नाकतोडे, पतंग असून स्वभावाने निशाचर आहे. या पालीचे इंग्रजीमधील नाव ‘स्क्वेयर स्पोटेड गेको’ असून शास्त्रीय नाव ‘हेमिडक्टीलस ग्रासिलीस’ आहे. इतर पालींसारखी ही भित्तीय पाल नसून जमिनीवर विचरण करते. महाराष्ट्रात ही जात अमरावती, वर्धा, नाशिक, जळगाव, यवतमाळ, बुलढाणा, जालना इत्यादी ठिकाणी आढळून येते. चौरस पृष्ठीय पालीचा शोध सर्वप्रथम आशियाटीक सोसायटीचे डब्ल्यू. टी. ब्लानफोर्ड यांनी १८७० मध्ये लावला. जातीच्या योग्य नोंदिकारिता सदर प्रजातीचा आद्य नमुना म्हणजे होलोटाईप हा तेव्हाच्या दक्षिण-पूर्व बेरार म्हणजे आजच्या अमरावती-यवतमाळ येथून निवडण्यात आला होता. ही जात अंडज असून मान्सून पूर्व दोन अंडी घालते, मादी अंडी सुरक्षित ठिकाणी देऊन निघून जाते. २८-४० दिवसा नंतर अंडीतून पिले बाहेर पडतात व शिकार करण्यास जन्मतः तत्पर असतात.
सरपटनाऱ्या प्राण्यांमध्ये काही दिवसांपूर्वी "कोलेगल" जातीच्या पालीची नोंद नुकत्याच झालेल्या अभ्यासात दिनांक १० मे ला करण्यात आली होती,सरपटनाऱ्या प्राण्याची यादी वाढतच चालली आहे,चंद्रपूर लगतच परिसर हा सरपटनाऱ्या प्राण्यांसाठी चांगला अधीवास असल्याने आणखी दुर्मिळ जातींचा शोध लागण्याची शक्यता आहे, सरपटनाऱ्या प्राण्यांच्या शोध मोहिमेत वन्यजीव अभ्यासक दिनेश खाटे,वनदीप रोडे,निखिल झाडे यांचे सहकार्य लाभले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.