Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मे ०७, २०१५

डॉक्‍टर ठरले देवदूत

डॉ. प्रमोद गिरींमुळे मोहितला जीवदान
नागपूर - खासगी रुग्णालयातील वैद्यकीय सेवेबद्दल नेहमीच संताप व्यक्त होतो. मात्र, एका डॉक्‍टरने स्वत:हून पुढाकार घेत रुग्णाचा जीव वाचविल्याचा प्रसंग नुकताच प्रतापनगर चौकात घडला. एका वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार मोहित जयदीपकुमार रस्ता दुभाजकावर आदळला. यात तो गंभीर जखमी झाला. योगायोगाने त्या वेळी मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. प्रमोद गिरी हजर होते. त्यांनी आपले वाहन बाजूला उभे केले. त्या युवकाला उचलले. आपल्या वाहनात टाकले. ऑरेंज सिटी रुग्णालयात नेले. तातडीने त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया केली. उपचाराला विलंब झाला असता तर रक्तस्रावाने त्या पंचविशीतल्या तरुणाच्या जिवाला धोका निर्माण झाला असता. परंतु, डॉ. गिरी देवदूत ठरले.

रस्त्यांवरील अपघातग्रस्ताला पोलिस येण्यापूर्वी कुणी हात लावत नाहीत. खाकी वर्दीच्या भीतीपोटी जखमीला रुग्णालयात नेण्यापूर्वी पोलिसांना खबर देतात. परंतु, डॉ. गिरी यांनी त्याची तमा न बाळगता सामाजिक बांधीलकी जोपासली. रुग्णसेवेचा डॉक्‍टरधर्म पाळला. या वेळी उपस्थितांनीही त्या डॉक्‍टरसंदर्भात डॉक्‍टर असावा तर असा, असे उद्‌गार काढले. मंगळवारी (ता. पाच) सकाळी दहाच्या दरम्यान प्रतापनगरात रस्त्यावरील दुभाजकाला धडक बसल्याने दुचाकीस्वार जखमी झाला. या तरुणाकडे बघून सारेच हळहळत होते. मदतीला कोणीही पुढे आले नाही. रक्ताच्या थारोळ्यात तो युवक बेशुद्ध अवस्थेत पडून होता. याच रस्त्याने डॉ. प्रमोद गिरी जात होते. गर्दीतून वाट काढीत ते जखमीजवळ गेले. त्यांनी ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिली. जितेंद्र वर्मा या युवकाच्या मदतीने ऑटोतून जखमी युवकाला ऑरेंज सिटीत हलविले. दरम्यान, नातेवाइकांशी संपर्क साधण्यात आला. युवकाची ओळख पटण्यापूर्वीच सीटी स्कॅन करण्यात आले. डोक्‍याचा काही भाग फाटला होता. छातीच्या बरगड्या तुटल्या होत्या. संपूर्ण अंगावर खरचटले. मेंदूत रक्तस्राव सुरू होता. त्यामुळे तातडीने शस्त्रक्रिया करून रक्तस्राव थांबवला. मृत्यूच्या घटका मोजत असलेल्या त्या युवकाचा जीव वाचला. या तरुणांच्या नातेवाइकांचा शोध घेण्यासाठी ऑरेंज सिटीतील कर्मचारी कामाला लागले होते. अखेर त्या युवकाची ओळख पटली. मोहित हा त्रिमूर्तीनगरातील आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.