Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, फेब्रुवारी २२, २०१४

कॉंगे्रसची यादी ठरली, चंद्रपूर- देवतळे कि वडेट्टीवार

मुंबई - कॉंगे्रस पक्षाने महाराष्ट्रातील आपल्या कोट्यातील २६ उमेदवारांच्या नावांची यादी निश्‍चित केली आहे.  विद्यमान खासदार विलास मुत्तेमवार यांचा पत्ता कट केला आहे. त्यांच्या जागी राजेंद्र मुळक यांचे नाव टाकले आहे. तर चंद्रपूर येथून माजी खासदार नरेश पुगलिया ऐवजी संजय देवतळे यांना उमेदवारी देण्याचा विचार सुरु आहे. तसे न झाल्यास माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांना उमेदवारी मिळू शकते. 

 आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रदेश कॉंगे्रस समितीने आपल्या कोट्यातील २६ पैकी बहुतांश जागांसाठी उमेदवारांची नावे निश्‍चित केली आहेत. गेल्या निवडणुकीतील १७ विजयी उमेदवारांपैकी ५ जणांची नावे यंदा यादीतून गळाली असल्याचे दिसून येत आहे. सुरेश कलमाडी यांच्या नावावर पक्षाने फुली मारल्याने बहुचर्चित ठरलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघातून विनायक निम्हण किंवा विश्‍वजित कदम यांची नावे आघाडीवर आहेत. अकोल्याची जागा भारिपचे प्रकाश आंबेडकर यांच्याकरिता सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तर दक्षिण-मध्यमधून एकनाथ गायकवाड यांना पुन्हा उमेदवारी द्यावी की डॉ. भालचंद्र मुणगेकरांना तिकीट द्यायचे, यावरून पक्षात खल सुरू आहे.
सिंधुदूर्गमधून नीलेश राणे, सांगलीतून प्रतिक पाटील, दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा, उत्तर-मध्य मुंबईतून प्रिया दत्त, उत्तर मुंबईतून संजय निरूपम,उत्तर-पश्‍चिम मुंबईतून गुरुदास कामत,रामटेकमधून मुकुल वासनिक,शीर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे, नंदूरबारमधून माणिकराव गावित,  सोलापुरातून सुशीलकुमार शिंदे, जालन्यातून कल्याण काळे, भिवंडीतून मुझफ्फर हुसेन, औरंगाबादमधून उत्तमसिंह पवार, नांदेडमधून अशोक चव्हाण, नागपूरमधून राजेंद्र मुळक, गडचिरोलीतून मारोतराव कोवासे, वर्धा येथून सागर मेघे, वाशिम-यवतमाळमधून जीवनराव पाटील आदी नावे निश्‍चित झाली असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
 सोबतच, काही जागांवर इच्छुकांनी आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी पक्षश्रेष्ठींकडे प्रयत्न सुरू केले आहेत. यात वर्धा येथून तिकीट मिळावे म्हणून कॉंग्रेसच्या दिवंगत नेत्या प्रभा राव यांची कन्या चारूशीला टोकस, यवतमाळमधून माणिकराव ठाकरेंनी आपले चिरंजीव राहुल यांच्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे धाव घेतली आहे.  अकोल्यातून प्रकाश आंबेडकर यांना, तर पालघरमधून बळीराम जाधव यांना संपुआत राहण्याच्या अटीवर कॉंग्रेसने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. लातूरचा घोळ अजूनही सुरूच आहे. पक्षश्रेष्ठींनी डॉ. नरेंद्र जाधवांचे नाव निश्‍चित केले आहे. 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.