Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जानेवारी २५, २०१४

विदर्भाच्या बाजूने ९७ टक्के कौल

मतदान      १,९५,0५५
बाजूने         १,८८,१९८
अवैध         १३२
तटस्थ       ३,१0१
विरोधात    २,६२४

चंद्रपूर : ज्येष्ठ नागरिक संघाच्या पुढाकाराने वेगळया विदर्भ राज्यासंदर्भात घेतलेल्या जनमत चाचणीतून चंद्रपूरकरांनी विदर्भाच्या बाजून कौल दिला. ९७ टक्के चंद्रपूरकरांनी वेगळ्या विदर्भ राज्याच्या बाजूने मतदान केले. अमरावती, नागपूर व त्यानंतर चंद्रपुरात जनमताचा कानोसा घेण्यासाठी हा उपक्रम राबविला होता. तो यशस्वी ठरल्याचे चित्र यातून पुढे आले आहे.
स्थानिक एफईएस गर्ल्स महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी ९ वाजेपासून मतमोजणीला सुरूवात झाली. तब्बल ११ फेर्‍यांनतर सायंकाळी ४.१५ वाजता ही प्रक्रिया पूर्ण झाली. चंद्रपूर महानगर पालिकेच्या हद्दीतील एक लाख ९२ हजार ५५ नागरिकांनी गुरूवारी झालेल्या जनमत चाचणी प्रक्रियेत भाग घेतला. आजच्या मतमोजणीत एक लाख ८८ हजार ८२२ मते वैध, तर १३२ मते अवैध ठरली. एक लाख ८८ हजार १९८ मतदारांनी विदर्भ राज्याच्या बाजूने कौल दिला. ही टक्केवारी एकूण मतदानाच्या ९६.९५ टक्के आहे. तर विरोधात २ हजार ६२४ मते पडली. ३ हजार १0१ मतदारांनी मतदान केले मात्र मतपत्रिका कोरी ठेवून या विषयावर तठस्थता दर्शविली.
ज्येष्ठ नागरिक संघाने या उपक्रमासाठी निवडणूक आयुक्त म्हणून अँड. विजय मोगरे, उपआयुक्त म्हणून डॉ. गोपाल मुंधडा तर, मतमोजणी प्रमुख म्हणून प्राचार्य प्रभू चोथवे यांची नियुक्ती केली होती. मतदानादरम्यान प्रा. योगेश दुधपचारे, बंडू धोतरे, अशोक मुसळे, प्रा. सुधाकर अडबाले, रत्नमाला बावणे यांची निवडणूक विभाग प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली होती. आज या सवारंची उपस्थिती होती.
मतमोजणीदरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना निवडणूक आयुक्त अँड. विजय मोगरे म्हणाले, सर्वारनी चोखपणे जबाबदारी बजाविल्याने हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडता आल्याचे सांगितले. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रामदास रायपुरे यांनी या उपक्रातील सहभागाबद्दल चंद्रपूरकरांचे आभार मानले.

1 गेल्या महिनाभरापासून या चाचणीसाठी तयारी सुरू होती. ज्येष्ठ नागरिक संघाने या कामी पुढाकार घेतला. त्याला शहरातील सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, युवक, विद्यार्थ्यांनी पाठिंबा देत ही चाचणी यशस्वी केली. त्यासाठी २३ जानेवारीला मतदान पार पडले.

2चंद्रपूर शहराच्या हद्दीत एकूण २७५ मतदान केंद्र उभारण्यात आले होते. मोबाईल बुथचीही व्यवस्था होती. एसएमएस पाठवून या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत एक हजार ३४३ जणांनी एसएमएस पाठवून मतदान केले. त्यातील फक्त एक मत विरोधातील होते.

3चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. डॉ. अशोक जिवतोडे, फिमेल एज्युकेशन सोसायटीचे अँड. विजय मोगरे यांनी विशेष पुढाकार घेतला. त्या पाठोपाठ डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचाही सहभाग महत्वाचा होता.

मतमोजणीलाही प्रचंड प्रतिसाद
एफईएस गर्ल्स महाविद्यालयात शुक्रवारी सकाळी ९ वाजता सुरू झालेली मतमोजणी सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू होती. यात ६0 शिक्षक-प्राध्यापकांसह २0 विद्यार्थी सहभागी होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.