Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, डिसेंबर १८, २०१३

अशोक पवार यांना अमेरिकेच्या महाराष्ट्र फाऊडेशनचा पुरस्कार

चंद्रपूर - येथील कादंबरीकार अशोक पवार यांना अमेरिकेच्या महाराष्ट्र फाऊडेशनचा ललित ग्रंथ साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या ११ जानेवारी रोजी पुणे येथे गीतकार गुलजार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण केले जाईल.

अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशन संस्थेचे यंदाचे 11 पुरस्कार मंगळवारी जाहीर झाले.  ‘दिव्य मराठी’चे मुख्य संपादक कुमार केतकर साहित्य जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. न्यायमूर्ती हेमंत गोखले यांच्या हस्ते 11 जानेवारी रोजी पुण्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. सामाजिक कार्यासाठीचा जीवनगौरव रयत शिक्षण संस्थेला जाहीर झाला. वरील दोन्ही पुरस्कार प्रत्येकी दोन लाखांचे आहेत. पत्रकार संध्या नरे पवार, अमिता नायडू, अशोक पवार यांना साहित्य, तर सामाजिक कार्यासाठी गजानन खातू, डॉ. अशोक बेलखोडे (नांदेड) व धनाजी गुरव यांना पुरस्कार जाहीर झाले. जालना येथील राजकुमार तांगडे यांना ‘शिवाजी अंडरग्राऊंड.’ नाटकासाठी पुरस्कार मिळाला. यंदापासून सुरू झालेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्काराचे मानकरी संगणकतज्ज्ञ विवेक सावंत ठरले.

सामाजिक कार्यासाठीचा जीवनगौरव पुरस्कार या वर्षी व्यक्तीला न देता कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेला (सातारा) जाहीर झाला. साहित्य जीवनगौरव आणि सामाजिक जीवनगौरव हे दोन्ही पुरस्कार प्रत्येकी दोन लाख रुपयांचे आहेत.

साहित्य विभागात पत्रकार संध्या नरे-पवार (मुंबई) यांच्या ‘डाकीण’ या पुस्तकाला वैचारिक ग्रंथ पुरस्कार, अमिता नायडू यांच्या ‘प्लॅटफॉर्म नंबर झिरो’ या पुस्तकाला आपारंपरिक ग्रंथ पुरस्कार तर अशोक पवार यांच्या ‘पडझड’ या कादंबरीला ललित ग्रंथ पुरस्कार देण्यात येणार आहे. हे तीनही पुरस्कार प्रत्येकी 25 हजार रुपये रकमेचे आहेत.

सामाजिक कार्य विभागात व्यक्तींना कार्यकर्ता पुरस्कार दिले जातात. त्यात प्रबोधन कार्यासाठी गजानन खातू (मुंबई), ‘सामाजिक प्रश्न’ विभागासाठी डॉ. अशोक बेलखोडे (नांदेड) आणि ‘असंघटीत कष्टकरी’ विभागासाठी धनाजी गुरव (निपाणी) यांना निवडण्यात आले आहे. हे तीनही पुरस्कार प्रत्येकी 50 हजार रकमेचे आहेत.

नाट्य विभागात राजकुमार तांगडे (जालना) यांना ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ नाटकासाठी 25 हजार रुपये रकमेचा तर मकरंद साठे (पुणे) यांना ‘मराठी रंगभूमीच्या तीस रात्री‘ या त्रिखंडात्मक ग्रंथासाठी 50 हजार रुपये रकमेचा पुरस्कार दिला जाणार आहे. भारतातील निवड समित्यांनी प्रत्येक पुरस्कारासाठी तीन नावांची शिफारस केली होती. अमेरिकेतील महाराष्ट्र फौंडेशनच्या निवड समित्यांनी त्या तीनमधून एक नाव निश्चित केले. या पुरस्कारासाठी अर्ज करावे लागत नाहीत. निवड समितीचे लोक स्वत:हून पुरस्कारयोग्य व्यक्तींचा शोध घेत असतात. महाराष्ट्र फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने 1994 पासून साहित्य व सामाजिक कार्यासाठी पुरस्कार दिले जातात. या पुरस्काराचे संयोजन पुणे येथील साधना ट्रस्टच्या वतीने केले जाते.

यंदापासून दाभोलकर पुरस्कार : या वर्षीपासून एक लाख रुपये रकमेचा डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. पहिला पुरस्कार ‘एमकेसीएल’चे संस्थापक संगणतज्ज्ञ विवेक सावंत (पुणे) यांना देण्यात येणार असून हा पुरस्कार एक लाख रुपये रकमेचा आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.