Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, ऑक्टोबर ०५, २०१३

नक्षलवाद्यांच्या नावावर खंडणी

अहेरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे गडचिरोली जिल्हा कार्यकारी अध्यक्ष जमीर ऊर्फ बबलू हकीम यांना १0 लाख रूपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अहेरी पोलिसांनी सात तोतया नक्षलवाद्यांना अटक केली आहे. यामध्ये एका मोठय़ा दैनिकाचा बामणी येथील बातमीदारासह एका शिक्षकाचाही समावेश आहे. 
१२ सप्टेंबर रोजी बामणी येथील भगवंतराव हायस्कूलचे मुख्याध्यापक तालुकदार यांच्या घरी तीन ते चार इसम तोंडावर काळी पट्टी बांधून आले. या लोकांनी आम्ही नक्षलवादी आहोत, ही चिठ्ठी बबलू हकीम यांना नेऊन द्या, असे सांगितले. नक्षलवाद्याच्या भीतीपोटी तालुकदार हे अहेरी येथे जमीर हकीम यांच्या घरी चिठ्ठी घेऊन गेले. त्यानंतर हकीम यांनी चिठ्ठी उघडून पाहिली. त्यात आम्ही खरे नक्षलवादी असून आम्हाला १0 लाख रूपये पार्टीच्या कामासाठी पाहिजे, असा मजकूर लिहिण्यात आला होता. १७ सप्टेंबरला बामणीजवळील बेजुरपल्ली फाट्यावर १0 वाजता १0 लाख रूपये घेऊन येण्यास सांगितले. मात्र बबलू हकीम १७ सप्टेंबरला गेलेच नाही. त्यानंतर १८ सप्टेंबर रोजी हकीम यांना मोबाईलवर एक फोन आला. तुला आमची चिठ्ठी मिळाली नाही की, पैसे द्यायचे नाही, नाहीतर जिवानिशी मारून टाकू. आम्ही खरे नक्षलवादी आहो. भारतीय माओवादी पार्टीचे लेटरपॅड बघून घे, असे सांगितले. त्यानंतर बबलू हकीम यांनी अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास बावचे यांना या संदर्भात तक्रार दिली. 
धमकी मिळालेल्या मोबाईल नंबरवरून तपासाची चक्रे फिरविण्यात आली. संबंधित मोबाईलच्या माहितीवरून सिरोंचा तालुक्यातील जाफ्राबाद येथील पोचम कोटा (४0) याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याने या प्रकरणात सत्यम कुमरे, एका वृत्तपत्राचा बामणी येथील बातमीदार तिरूपती चिट्टयाला, बामणी येथील मानवदयाल शाळेचे शिक्षक रवी कारसपल्ली, स्वामी राजन झाडी, मंगु मारा गावडे, राजा रामटेके, बंडू गावडे यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले. या प्रकरणातील मुख्य आरोपी पोचम कोटा हा पोलिसांच्या तावडीतून रात्री पळून गेला. पोचम कोटा व बंडू लक्का गावडे या दोघांनी o्रीमंत होण्याच्या नादात हे कारस्थान रचले, असे पोलीस तपासात उघड झाले आहे. तसेच बातमीदार असलेल्या तिरूपती चिट्टयाला माओवाद्यांचे लेटरपॅड छापण्यास सांगितले. त्याने रवी कारसपल्ली याच्याशी संधान साधून १५ ते २0 लेटरपॅड छापून घेतले. कारसपल्ली हा बामणी येथील मानवदयाल शाळेचा शिक्षक असून गावात त्याचा फोटो स्टुडिओ आहे. हकीम यांना पाठविलेल्या पत्राचा मजकूर याच लेटरपॅडवर लाल अक्षरात कोटा पोचम व बंडू गावडे यांनी लिहिला. या सर्व आठही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.