Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, सप्टेंबर २४, २०१३

दोरीने गळा आवळून खून

गडचिरोली - पहिल्या बायकोच्या पोटगी प्रकरणात सायंकाळच्या सुमारास एका व्यक्तीला चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिपरीत अटक झाल्यानंतर रात्रीच्यावेळी दुसऱ्या बायकोच्या पोटच्या पाच वर्षीय मुलाचा गडचिरोली जिल्ह्यातील तुमडी गावात दोरीने गळा आवळून खून झाला. ही खळबळजनक घटना रविवारी (ता. 22) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. 

दरम्यान, या चिमुकल्याच्या मारेकऱ्याच्या शोधात असलेल्या घोट पोलिसांसमोर दोन बायकांमधील आरोप-प्रत्यारोपाची विचित्र परिस्थिती येऊन ठेपली. यामुळे मोठी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. यातून चिमुकल्याचा मारेकरी कोण, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

आदित्य विठ्ठल मुजुमकर (5) रा. तुमडी असे खून झालेल्या बालकाचे नाव आहे. चामोर्शी तालुक्‍यातील तुमडी येथील रहिवासी विठ्ठल मुजुमकर (45) याने 20 वर्षांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी येथील माया हिच्याशी विवाह केला. त्यांना 2 मुली व 1 मुलगा तीन मुले झाली. मात्र, सात वर्षांपूर्वी विठ्‌ठलने मायाशी फारकत घेतली. आणि अर्चना हिच्याशी विवाह केला. त्यामुळे विठ्‌ठल व माया या दोघांमध्ये पोटगीबाबत वाद सुरू होता. दरम्यानच्या काळात विठ्‌ठल आणि अर्चनाला दोन मुले झाली. यातील आदित्य हा 5 वर्षांचा, तर दुसरा 4 वर्षांचा मुलगा आहे. 

दरम्यान, रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास मायाच्या पोटगी प्रकरणात विठ्ठलला गोंडपिपरी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर रात्रीच्या सुमारास इकडे तुमडीत अर्चना व विठ्‌ठलचा मोठा मुलगा आदित्य याची गळा आवळून हत्या झाली. त्यामुळे तुमडीत मोठी खळबळ उडाली आहे. मुलाच्या हत्येबाबत अर्चनाने घोट पोलिस मदत केंद्रात तक्रार नोंदविली. यात तिने रात्रीच्या सुमारास आपल्या राहत्या घरी मायासह चार ते पाच व्यक्ती आले होते. त्यांनीच आदित्यचा खून केल्याचे सांगितले. तर, इकडे विठ्‌ठलची पहिली पत्नी मायाने या आरोपाचा इन्कार केला. अर्चनावरच पोटच्या मुलाचा जीव घेतल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे घोट पोलिसांसमोर आदित्यच्या मारेकऱ्याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आहे. घोटचे उपविभागीय पोलिस अधिकारी खंडेराव धरणे यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. आदित्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चामोर्शीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.