Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, सप्टेंबर १९, २०१३

नक्षलवादाला पोलिसाचे चोख प्रत्युत्तर

संजय तुमरामचंद्रपूर

ओडिशामध्ये १४ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्याची घटना ही जशी पोलिसांचे मनोधैर्य वाढवणारी आहे, तशीच ती लोकशाहीला नवे बळ देणारी आहे. नक्षलवादासारखा विघातक विचार समूळ नष्ट करणे, हे आजचे लोकशाहीपुढचे मोठे आव्हान आहे. देशविरोधी विचार संपले, तरच लोकशाही सुखाने नांदू शकते. या पाश्र्वभूमीवर ओडिशाची घटना सुखद म्हटली पाहिजे. अर्धाधिक देश आज नक्षलवादाने पोखरून गेला आहे. परकीय आतंकवाद्यांशी देश लढत असतानाच स्वकियांच्याही घातकी कारवायांना तोंड द्यावे लागत आहे. अशा दोन भिन्न अराजक विचारांशी देश लढत आहे. ही लढाई लढत असताना जेव्हा लोकशाहीला निर्भेळ यश मिळते, तेव्हा प्रस्थापित व्यवस्था अधिक बळकट होत असते.
नक्षलवादाच्या झळा गडचिरोलीसारख्या मागास आणि आदिवासीबहुल जिल्ह्यालाही मोठ्या प्रमाणात बसत आहेत. सर्वच क्षेत्रांत मागे असलेल्या या जिल्ह्याचा विकास केवळ आणि केवळ याच समस्येमुळे खुंटला आहे. सर्वदृष्टीने संपन्न अशा या जिल्ह्याला नक्षलवादाच्या अराजक विचाराचे कृतिशील कवच असल्याने मागासलेपणाच्या गर्तेतून अजूनही हा जिल्हा बाहेर पडू शकला नाही. मात्र, आता हे कवच भेदण्यात पोलिसांना यश येऊ लागले आहे. देशांतर्गत चकमकीत पोलिसांना जेव्हा यश मिळते, तेव्हा इथल्याही पोलिसांचे मनोधैर्य वाढत असते. त्यातून नव्याने लढण्याचे बळ पोलिसांना मिळत असते. अलीकडे गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या चकमकींवर नजर टाकली, तर हे चित्र ठळकपणे दिसून येते. मागील आठ महिन्यांत गडचिरोली पोलिसांनी जे यश मिळवले, तसे यश आजवर कधीच मिळाले नव्हते. त्यामुळे नक्षलवादावर लोकशाही व्यवस्था कशी आरुढ होत चालली, हे स्पष्ट होते. गडचिरोली पोलिस कधी नव्हे एवढे आक्रमक झाले आहेत. घरात घुसून मारण्याची आक्रमक योजना ते आखत आहेत आणि त्यात त्यांना यशही मिळत आहे. याचाच दुसरा अर्थ असा की, नक्षलवादी आता पोलिसांसमोर कमी पडू लागले आहेत. अहेरी तालुक्यातील गोqवदगाव असो की भामगरागड तालुक्यातील भटपर असो, पोलिसांनी तिथे जाऊन नक्षल्यांचा खातमा केला. मागील आठ महिन्यांत २३ नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश मिळाले. विशेष म्हणजे या सर्वांचे शवही पोलिसांनी मिळवले. युद्धनीतीमध्ये अमुलाग्र बदल केल्यामुळे पोलिसांना हे यश मिळाले. गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक सुवेझ हक हे कल्पक अधिकारी आहेत. प्रत्येक कारवाईचे काटेकोर नियोजन करून या अधिकाèयाने नक्षलवाद्यांना सळो की पळो करून सोडले. त्यामुळे या आठ महिन्यांच्या कालावधीत एखादा अपवाद सोडता एकही मोठी कारवाई नक्षलवाद्यांना करता आलेली नाही. यापूर्वी ज्या चकमकी व्हायच्या त्या बहुतांशी पोलिस गस्तीवर असताना व्हायच्या. त्यात अनेकदा पोलिसच मारले गेले. मरकेगाव, लाहेरी, हत्तीगोटाच्या चकमकी त्याची उदाहरणे आहेत. मात्र, हक यांनी आता युद्धनीतीच बदलून टाकली. घरात घुसून मारण्याची आक्रमक भूमिका त्यांनी घेतली. त्यासाठी त्यांनी जे उपाय योजले, ते खरेतर देशपातळीवर राबवण्याची गरज निर्माण झाली आहे. खबèयांचे नेटवर्क त्यांनी मजबूत केले. आज त्यांना जी माहिती मिळते, ती शंभर टक्के खरी मिळते. त्यामुळेच हल्ला करण्याचे योग्य नियोजन ते करू शकतात. नक्षलवादी बेसावध असताना त्यांच्यावर वार करण्याची कला हक यांनी विकसित केली. त्याला योग्य साथ मिळाली, ती स्थानिक नक्षलविरोधी अभियानातील जिगरबाज पोलिसांची. गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत पोलिस नक्षलवाद्यांशी जेवढा सहज लढू शकतो, तेवढी कला केंद्रीय बलांकडे नाही, हे दंतेवाडाच्या हत्याकांडानंतर दिसून आले होते. त्यामुळं गडचिरोली जिल्ह्यात केंद्रीय बलाच्या तुकड्या तैनात असल्या, तरी नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी स्थानिक पोलिसच सक्षम आहेत, हे यावर्षातील तीन मोठ्या चकमकींवरून दिसून आले. आता परिस्थिती अशी आहे की, पोलिसांना पाहताच नक्षलवादी जंगलात पळून जातात. पूर्वी हेच नक्षलवादी पोलिस दिसताच गोळीबार सुरू करायचे. गडचिरोली जिल्ह्याचे हे बदललेले सुखद चित्र असेच कायम राहिल्यास नक्षलवादाला ठेचून काढणे कठिण होणार नाही.

(सदर लेखाचे लेखक हे चंद्रपूर - गडचिरोली जिल्हाचे साम मराठी वाहिनीचे प्रातिनिध आहेत. )
मो. ९९२२९०३२९२

साभार सकाळ 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.