Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, सप्टेंबर २५, २०१३

'इको-प्रो' च्या पत्राची पर्यावरणमंत्र्यांनी घेतली दखल


                                       
चंद्रपूर- महाऔष्णिक विद्युत केंद्रातील प्रदूषणामुळे या जिल्हय़ाच्या नावाची नोंद जागतिक पातळीवर प्रदूषित शहर म्हणून घेण्यात आली. १९८३ ला सुरू झालेल्या या प्रकल्पात आणखी हजार मे. वॅ. च्या संचाला मंजुरी देण्यात आली. या संचाला पाचशे मायक्रोग्रॅम प्रती घनमीटर पर्यंतचे प्रदूषण मान्य करण्यात आले. असे होत असताना जुन्या संचातून दीडशे मायक्र ोग्रॅम प्रती घनमीटरपेक्षा अधिक प्रदूषण होत असल्याचे इको-प्रो या सामाजिक संस्थेने शासनाला लक्षात आणून दिले. त्यामुळे हे संच बंद करण्यात यावे, यासंदर्भातील पत्र इको-प्रोचे संस्थापक बंडू धोतरे यांनी एप्रिल महिन्यात पर्यावरण व सांस्कृतिक कार्यमंत्री तसेच जिल्हय़ाचे पालकमंत्री संजय देवतळे यांना दिले. या पत्राची दखल पालकमंत्र्यांनी घेतली असून, निवेदनातील विनंतीच्या अनुषंगाने आवश्यक ती कारवाई करण्याची विनंती उपमुख्यमंत्र्यांना केली आहे.

संपूर्ण आशिया खंडात सुप्रसिद्ध असलेले चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र आता चंद्रपुरकरांच्या विनाशासाठी कारणीभूत ठरत आहे. या विद्युत केंद्रातील सात संचापैकी चार संच कालबाहय़ झाले असून, ३८ हजार मे. टन कोळशातून केवळ १५00 मे. वॅ. विजनिर्मिती होत असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. एवढेच नव्हे तर या विद्युत केंद्रातून निघणार्‍या राखेमुळे चंद्रपुरकरांचे जीवन धोक्यात आले आहे. चार संचाचे आयुष्य संपल्यानंतरही ते सुरूच ठेवण्याचे निर्देश शासनाने दिले. त्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्राला प्रकाश देण्यासाठी चंद्रपुरकरांचा विनाश होतोय, अशी ओरड नागरिकांची असून, नागरिकांनी आता याविरोधात आंदोलनाची तयारी चालविली आहे.
पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राज्याच्या विकासासाठी चंद्रपुरात औष्णिक विद्युत केंद्राची मुहूर्तमेढ किमान तीन दशकापूर्वी केली. त्यावेळी टप्याटप्याने चार संच सुरू करण्यात आले. पहिला संच १९८३ ला तर चौथा संच १९८६ ला उभा झाला. प्रत्येक संचातून २१0 मे. वॅ. वीजनिर्मितीचे लक्ष ठेवण्यात आले. जिल्हय़ात उपलब्ध असलेला कोळशाचा साठा लक्षात घेता विद्युत निर्मिती संचाची संख्या नंतर सात करण्यात येऊन २,३४0 मे. वॅ. वीजनिर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले. परंतु, हे लक्ष्य आजपर्यंत शासनाला गाठता आले नाही. पाहता-पाहता सुरुवातीला उभारण्यात आलेल्या संचाचे आयुष्य दहा वर्षापूर्वीच संपले. परंतु, त्यानंतरही या संचातून वीजनिर्मिती केली जात आहे. ३४ हजार मे. टन कोळशाचा व ३५ हजार घन मीटर प्रती तास पाण्याचा वापर होत असतानाही निव्वळ १५00 मे. वॅ. वीजनिर्मिती केली जात आहे. वास्तविक पाहता एवढय़ा मोठय़ा प्रमाणात कोळशाचा वापर होत असताना ३ हजार मे. वॅ. वीजनिर्मिती होऊ शकते, असे जानकारांचे मत आहे. शासनाने काही वर्षापूर्वी या जिल्हय़ात उर्जानिर्मिती प्रकल्पांना मंजुरी दिली. त्यात वर्धा पॉवर, धारीवाल पॉवर यासारख्या मोठय़ा कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्या कमी खर्चात जास्त वीजनिर्मिती करीत असून, त्यांचे हवेतील प्रदूषणही अत्यल्प व निर्देशांकानुसार आहे. हीच बाब मात्र चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या बाबतीत नसल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ करते तरी काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या औष्णिक केंद्रातील जुने संच व इलेक्ट्रोस्टेटीक प्रेसीप्रीपेटर(इएसपी) हे कोळशातून २५ टक्के राख असेल या तत्वावर तयार करण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र चंद्रपूर परिसरातील कोळसा चाळीस टक्के राख असलेला आहे. त्यामुळे चंद्रपुरातील ईएसपी नेहमी बंद पडताना आढळतात. यामुळे हवेतील राखेचे प्रमाण प्रचंड वाढत चालले आहे. औष्णिक विद्युत केंद्रातून हवेत सोडण्यात येणार्‍या राखेमध्ये सल्फर गॅस, कार्बनडायऑक्साईड, नायट्रोजनडायऑक्साईड, पारा यासारखे धातू हवेत सोडले जातात. त्यामुळे मज्जातंतूचे आजार फोफावताना दिसतात. मूळात २00 ते ४00 पार्टीक्यूलेटपर मीटर(पिपिएम) इतके प्रदूषण मानकानुसार व्हायला हवे. परंतु, हे प्रमाण आता चार ते पाच हजार पीपीएम पर्यंत पोहचले आहे. त्यामुळे चंद्रपूर शहरावर राखेची एक मोठी 'लेअर' तयार झाली असून, त्याचा विपरित परिणाम काही दिवसांपूर्वी बघायल मिळाला. नासाने चंद्रपूर शहरावर नायट्रस ऑक्साईडचे ढग असल्याचा अहवाल काही वर्षापूर्वी शासनाला दिला होता. त्यानंतरही शासन जागे झाले नसून, चंद्रपुरातील कालबाहय़ झालेले विद्युत निर्मिती संच केवळ पश्‍चिम महाराष्ट्राला वीज पुरविता यावी, म्हणून सुरू ठेवण्यात आले आहे. हे संच त्वरित बंद करण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.