Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, सप्टेंबर २२, २०१३

ताडोबा व्याघ्र प्रकल्पासाठी आता होणार ऑनलाईन रिझर्व्हेशन!

चंद्रपूर- ताडोबातील वाघ बघण्यासाठी थेट चंद्रपूरात येउन परवानगीचे सोपस्कार करण्याची प्रतिक्षा संपली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनानं आगाऊ आरक्षणाची सोय उपलब्ध करून दिलीये. जगभरातील पर्यटक आता ताडोबा दर्शनाच्या परवानगीसाठी इंटरनेटवर आरक्षण करु शकतात.

गेल्या वर्षभरात सुमारे १ लाख पर्यटकांनी ताडोबाला भेट दिली. हा आकडा आता दुपटीनं वाढण्याची शक्यता आहे. कारण ताडोबातील परवानगीसाठी रेल्वे आरक्षणाच्या धर्तीवर इंटरनेटवरुन आगाऊ आरक्षणाची सोय उपलब्ध करुन देण्यात आलीये. आता घरबसल्या ताडोबाच्या वाघांचं दर्शन नक्की करण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. याआधी चंद्रपूर शहरातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यालयात तास न तास उभं राहून प्रवेशाचे कंटाळवाणे सोपस्कार पार पाडल्यावर मग वाघोबा भेटतील का याची प्रतिक्षा करावी लागायची. आता या वाघाला बघण्यासाठी सहज-सोपी व्यवस्था झालीये.

सुमारे ६२५ चौ. किमी पसरलेल्या या जंगलात वाघ, बिबटे, रानकुत्रे, गवे, नीलगाय, अस्वल, सांबर, चितळ, भेकर, गरुड, मोर, टकाचोर, निळकंठ, मगर, घोरपड यासह इतर वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. देशात वाघांवर संकट ओढविलं असताना चंद्रपुरकरांनी मात्र या पट्टेदार, ऐटबाज प्राण्याला प्रसंगी हल्ले सोसूनही नुसतं संरक्षित केलं नाही तर त्यात वाढ होईल असंच सहकार्य केलंय.

देशातील अन्यत्र असलेल्या वन्यजीव अभयारण्यांप्रमाणं ताडोबाही पावसाळ्यात अंशतः बंद आहे. येत्या १५ ऑक्टोबरपासून व्याघ्रदर्शन सुरु होईल. रोज ६ द्वारांच्या माध्यमातून दोन सत्रात एकूण ५२ वाहनं ताडोबात प्रवेश करू शकणार आहेत. अशी आहे व्याघ्रप्रेमींच्या ताडोबा दर्शनाची नवी सोय. सो फ्रेंड्स उचला माऊस अन करा बुक तुमची ताडोबा व्हिजीट mahaecotourism.gov.in या संकेतस्थळावर. तुम्ही दोन महिने अगोदर तुमचं बुकींग करु शकता. ताडोबातील वाघोबा आपली वाट बघतो आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.