Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, सप्टेंबर १४, २०१३

‘गणपती बाप्पा मोरया' : ३०० वर्षांपासून भक्तांची वाट

चंद्रपूर- ‘गणपती बाप्पा मोरया' चा जयघोष करत विघ्नहर्त्यां गणरायाचे घरोघरी, तसेच सार्वजनिक गणेश मंडळाच्या मंडपात उत्साहात आगमन झाले आणि दहा दिवसीय गणेशोत्सवाला आनंदमय वातावरणात सुरुवात झाली .मात्र दुसरे  धक्कादायक वास्तव आहे .  शहरात एक गणपती ३०० वर्षांपासून भक्तांची वाट पाहतोय. 
गोंड शासकांची प्राचीन राजधानी. १७ व्या शतकात या नगराचे प्रधान रायप्पा वैश्य यांनी इथं एक भव्य शिवमंदिर बांधण्याचा संकल्प केला. त्यासाठी याच भागातील माना टेकडी परिसरातून एकसारखे पाषाण मंदिरस्थळी आणले गेले आणि रात्रीचा दिवस करून शिल्पकारांनी मंदिर परिसरात घडवल्या एकापेक्षा एक १६ सुबक मूर्त्या... ज्यात महागणपती, शिवलिंग, देवी दुर्गा, मत्स्यावतार, कुर्मावतार, दशावतार,नंदी, शेषनाग, हनुमान, गरुड़, हत्ती, कालभैरव यांचा समावेश होता. मात्र, हे काम सुरू असताना रायप्पांचा मृत्यू झाला आणि मंदिराचं काम बंद पडलं. तेव्हापासून चंद्रपूरचं कडक ऊन, धो धो पाऊस आणि प्रदूषण झेलत या मूर्त्या आहे त्याच जागी पडून आहेत, असं इतिहास संशोधक अशोकसिंग ठाकूर सांगतात.
या सोळा मूर्त्यांमध्ये सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आहे ती दहा फुटी महागणपतीची अखंड पाषाणातली मूर्ती... या गणेशाच्या मस्तकावर नागरूपी छत्र आहे. असा गणेश विरळाच... शिवाय या गणेशाची शिल्पकला कन्नड शैलीतील आहे. मंदिरच उभारलं गेलं नसल्यानं या गणेशाची कधी पूजाच झाली नाही. धर्मशास्त्रानुसार प्राणप्रतिष्ठा झाली नसल्यानं हा महागणपती काळाचा मारा सहन करत तब्बल ३००हून अधीक वर्षांपासून भक्तांच्या पूजेची प्रतिक्षा करतोय.
अत्यंत सुबक व शिल्पकलेचा वारसा सांगणाऱ्या या मूर्त्या चंद्रपूरकरांच्या दुर्लक्षित मानसिकतेचा इतिहास सांगताहेत. पुरातत्व विभागाने जागोजाग ढासळलेली एक संरक्षक भिंत बांधून आपली जबाबदारी झटकलीय. आजूबाजूचे लोक या परिसराचा वापर जुगार खेळण्यासाठी आणि त्याज्य विधींसाठी करत आहेत. हे दुर्दैवच म्हणावं लागले. हे मंदिर या मूर्त्यांसह उभे राहिले असते तर एक भव्य मंदिर चंद्रपूरचे आकर्षण बनले असते.
या जिल्ह्य़ात अठराशेवर गावे असून जवळपास १६०० सार्वजनिक गणपतींची स्थापना दरवर्षी होते. यंदाही एवढय़ाच सार्वजनिक गणपतींची स्थापना झाली. तसेच घरोघरीही विघ्नहर्त्यांचे उत्साहात आगमन झाले. एकटय़ा चंद्रपूर शहरात जवळपास २६० गणपतींची स्थापना झालेली आहे. शहर व रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या सर्व गणेशाची स्थापना झालेली आहे. मात्र, धर्मदाय आयुक्त कार्यालयात केवळ ५०० गणेश मंडळांची नोंदणी आहे. 
चंद्रपूरचा राजा म्हणवणाऱ्या जटपुरा गेटजवळील भव्यदिव्य मूर्ती आकर्षणाचा केंद्र बनली आहे. या मंडळाने व्दारकाधीशाची प्रतिकृती साकारली आहे. तसेच राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय, श्री साई अभियांत्रिकी महाविद्यालय व शहरातील मंदिरातही गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. विठ्ठल मंदिर वॉर्डातील पुरातन गणेश मंदिरात श्रीचे वाजतगाजत आगमन झाले. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.