प्रिय वाचक
आपण मराठी असून अजून ज्ञानेश्वरी वाचली नाही?
आपण मराठी असूनही आपल्याला ज्ञानेश्वरी समजत नाही?
अमृतासारखी रसाळ भाषा अजून आपण अनुभवलीच नाही?
महाराष्ट्राचा मानबिंदू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि मराठीचा मानबिंदू म्हणजे संत ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरी म्हणजे प्रत्येक मराठी माणसाचा अभिमानाचा विषय.
पण होतं काय की कितीही म्हटलं तरी संपूर्ण अर्थ समजून ज्ञानेश्वरी वाचणं प्रत्येकाला जमतंच असं नाही. कारण तिची समजायला कठीण जाणारी प्राकृत भाषा. ती सहजासहजी समजतेच असे नाही. प्रयत्नपूर्वक समजली तरी ज्ञानेश्वरीच्या रसाळ काव्याची गंमत घेता येत नाही. ज्ञानेश्वरी हे एक सुंदर काव्य आहे. जितका गहन त्याचा विषय तितकीच सुंदर तिची मांडणी. तिची मजा काही और आहे.
दुसरे म्हणजे अनेकदा होतं काय की लोक ज्ञानेश्वरी, दासबोध आदी पुस्तकं ही निवृत्तीनंतरची पुस्तकं समजतात. खरे तर यांतले जे विचार आहेत ते तरुणांसाठी मार्गदर्शक आहेत. आयुष्य कसे जगावे हे सांगणारे आहेत. ज्ञानेश्वरीची खरी गरज आहे ती आयुष्याच्या सुरुवातीलाच हातपाय गाळून बसलेल्या असंख्य तरुणांना. निराशेच्या गर्तेत सापडलेल्या. अभ्यासाच्या आणि स्पर्धेच्या बोज्याखाली दबलेल्या तरुणांना. जीवनाचा आनंद न घेता एखाद्या ओझ्याप्रमाणे आयुष्याचा प्रत्येक क्षण पुढे लोटणार्या तरुणांनी ज्ञानेश्वरी वाचायला हवी. वर्तमानपत्रांत आत्महत्यांच्या बातम्या वाचल्या की हे अधिक जाणवते.
ज्ञानेश्वरीचे जे ई पारायण आम्ही गेल्यावर्षी चालवले त्याला वाचकांनी उदंड प्रतिसाद देऊन आम्हाला धन्य केले.
आज आम्ही पुन्हा एकदा आणली आहे श्री विजय पांढरे यांची २१व्या शतकातील मराठीतील ओवीबद्ध ज्ञानेश्वरी. आज सादर आहे पहिला अध्याय. जर आपल्याला पुढचे अध्याय हवे असतील तर कृपया कळवा.
गेल्यावर्षी आम्ही हीच ज्ञानेश्वरी लाखो लोकांपर्यंत नेली. विशेषतः तरुणांपर्यंत. आजही आम्हाला अशा असंख्य तरुणांची पत्रे येतात. ज्ञानेश्वरी वाचल्यामुळे आयुष्यात घडून येणार्या आमुलाग्र बदलाची. दृष्टिकोनात बदल झाल्यामुळे आयुष्याचा आनंद घेणार्या तरुणांची. काळजीचे अभ्र दूर झाल्यामुळे जीवनात प्रकाश पसरलेल्या तरुणांची. परदेशातून. खेड्यापाड्यातून. मुंबई पुण्यातूनही. हैद्राबाद, हरयाणातूनही.
ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरी भेट द्या. आपल्या आप्तांना द्या. ज्यांना काळजीत बघताना आपल्याला दुःख होते अशा तरुणांना द्या. नैराश्याने घेरलेल्या तरुणांना ज्ञानेश्वरी द्या. घरातल्या मोठ्या मंडळींना द्याच, पण लहान मुलांना द्या. ज्यांच्या आयुष्याचं सोनं व्हावं अशा तरूणांना द्या. वाचायचा आग्रह नका करू हवं तर. पण त्यांच्या डेस्कटॉपवर असू द्या. शेवटी ज्ञानाचा क्षण जेव्हा यायचा तेव्हाच येतो.
आज श्री. विजय पांढरे लिखित भावार्थ ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय पाठवीत आहोत. पुढील अध्याय हवे असतील तर कळवा. फ़क्त मागणीनुसारच पाठवले जातील. गेल्या वेळचा अनुभव असा की बहुतांश खाजगी कंपन्यांच्या मेलबॉक्समध्ये मेल्स पाठवताना अडचण येते. त्यामुळे gmail, yahoo, rediffmail अशा व्यक्तीगत मेल आयडींनाच या मेल्स पाठवण्यात येतील. कृपया नोंद घ्यावी व असे मेल आयडी कळवावे. हे सर्व अध्याय आम्ही आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या दरम्यान सर्व इच्छुक वाचकांना विनामूल्य पाठवणार आहोत.
दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे ज्ञानेश्वरीचे ऑडिओ खुप लोकांना आवडले. लोकांनी हे अध्याय आपल्या मोबाईलवर अपलोड करून त्यांचा आनंद स्वतः तर घेतलाच पण जातायेता अनेकांना दिला. तरी सर्व ज्ञानेश्वरी प्रेमींनीwww.ednyaneshwari.com या संकेत स्थळाला भेट देऊन या शब्दसंगीताचा आनंद घ्यावा.
या शिवाय सिडी स्वरूपातही संपूर्ण ज्ञानेश्वरी ( पुस्तक आणि ऑडिओ) उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी लिहा.