Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जून १०, २०१३

टायर फुटला : तीन जण ठार

मुलचेरा : चौडमपल्ली ते आष्टी रस्त्या दरम्यान असलेल्या महाकाली मंदिराजवळच्या वळणावर ट्रकचा समोरचा टायर फुटून ट्रक अनियंत्रित झाल्याने ट्रकची एस..टी बसला सामोरासमोर धडक बसली. या भीषण अपघातात ३ जण ठार झाले तर ४ जण गंभीर असून ३१ प्रवासी किरकोळ जखमी झाले. सदर अपघात आज दुपारी १.३0 वाजताच्या सुमारास घडला.
अहेरी आगाराची नागपूर - अहेरी बस एम.एच.-१४ बि.टी.-0८१६ आष्टीवरून अहेरीकडे जात असताना विरूद्ध दिशेने आलापल्लीवरून तेंदूचे पोते भरून महालक्ष्मी ट्रान्सपोर्ट्रचा ट्रक एम.एच-३३ ४१३८ येत होता. सदर ट्रक महाकाली मंदिरासमोरच्या वळणावर येताच ट्रकचा समोरचा टायर अचानक फुटला. त्यामुळे समोरून येणार्‍या एस.टी बसला ट्रकची जबर धडक बसली. यात ट्रकचालक बंडु घटनास्थळीच ठार झाला. एस.टी. बसचा चालक अजय कहाते व चौडमपल्ली येथील बसमधील प्रवासी कमला मंथनवार यांना तत्काळ आष्टी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्या दोघांचाही मृत्यू झाला.
एस.टी बसमधील ३१ प्रवसी किरकोळ जखमी आहेत. अपघाताची माहिती मिळताच अहेरी आगाराचे तिकीट निरीक्षक राज वैद्य, तिकीट संग्रहक आय.एस पठाण व आगार प्रमुख घटनास्थळी पोहोचले. दुपारनंतर रिमझिम पाऊस येत असतानासुद्धा आष्टी ग्रामीण रूग्णालयात नागरिकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी जमलेली होती.
दरम्यान, राज्य परिवहन महामंडळातर्फे किरकोळ जखमींना ५00 रुपये तर मृतकांच्या कुटुंबीयांना अंत्यसंस्कारासाठी पाच हजार रूपये सानुग्रह मदत देण्यात आली.
अपघातग्रस्त ट्रक आलापल्ली येथील अमोल रापेल्लीवार यांच्या मालकीचा असून ओव्हरलोडमुळे ट्रकचा टायर फुटल्याची चर्चा घटनास्थळी होती. सायंकाळी ५.३0 वाजेपर्यंत ट्रकचालकाचा मृतदेह ट्रकमध्येच फसुन होता.
वाहनचालक गुरूदास गेडाम व वाहक पठाण यांनी अहेरीवरून नागपूरला जाणारी बस क्र. ८९५८ मध्ये जखमीेंना उपचारासाठी आष्टी ग्रामीण रूग्णालयात आणले. किरकोळ जखमींना उपचारानंतर सुटी देण्यात आली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.