चंद्रपूर: कुत्रा पाळणाऱ्यांवर चक्क टॅक्स लावण्याचा निर्णय चंद्रपूर पालिकेने घेतला आहे. कुत्रा त्याच्या इमानदारीमुळे माणसाचा सगळ्यात जवळचा मित्र मानला जातो. पण कुत्र्याची ही दोस्ती चंद्रपूर पालिकेच्या स्थायी समितीच्या डोळ्यावर आली. त्यामुळे पालिकेनं कुत्रा पाळणाऱ्यांना वर्षाला चक्क 500 रुपये टॅक्स लावला आहे.
कुत्र्यांमुळे होणारी घाण, त्रास कमी व्हावा म्हणून चंद्रपूर पालिकेनं ही शक्कल लढवली आहे. २७८ कोटीच्या पहिल्याच अर्थसंकल्पात करवसुलीसाठी पालिकेनं पाळीव कुत्र्यांनाही रडारवर घेतलं आहे. त्यासाठी पालिकेनं भटक्या कुत्र्यांची संख्या कमी व्हावी, लोकांना मनस्ताप सहन करावा लागू नये अशी अफलातून कारणं दिली आहेत. पालिकेच्या निर्णयाला चंद्रपूरकरांनी मात्र कडाडून विरोध केला आहे. गाई, म्हशींप्रमाणे कुत्र्यापासून कुठलंही उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यावर कर लावणं चुकीचं असल्याचं लोकांचं म्हणणं आहे. तसंच जर कुत्र्यांवर कर आकारणार असाल तर त्यांचा बाकीचा खर्चही करा असा खोचक सल्लाही दिला आहे. कुत्र्यांवर करवसुलीचा विरोधकांनीही समाचार घेतला आहे. सत्ताधाऱ्यांनी प्रॉपर्टी टॅक्स, गुंठेवारी आणि अनधिकृत बांधकामांना चाप लावला तर अशी वेळ येणार नाही असा टोला लगावला आहे. कुत्र्यांच्या मुद्यावरून चंद्रपूर पालिकेत याआधीच मोठं नाट्य रंगलं आहे. मोकाट कुत्र्यांना पकडण्यासाठी गाडी घेतली नाही म्हणून महापौर संगीता अमृतकर यांनी महापौरांसाठी घेतलेल्या नवीन गाडीत बसण्यास नकार दिला होता. त्यामुळे पाळीव कुत्र्यांना करमुक्त करण्यासाठी पालिकेत पुढं काय-काय होतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.