समाज सेवक अण्णा हजारे
संयुक्त वन व्यवस्थापन कार्यशाळेचे उदघाटन
चंद्रपूर दि.16- महात्मा गांधीच्या स्वप्नातील गाव निर्माण करण्याची क्षमता संयुक्त वन व्यवस्थापन कार्यक्रमात असून या व्दारे गावाची अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होणार असल्याचे मत जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. वनविभागाच्या वतीने वनराजिक महाविद्यालय चंद्रपूर येथे आयोजित प्रशिक्षण व कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. वन विभागाचे प्रधान सचिव प्रविण परदेशी, मुख्य वनसंरक्षक बी.एस.के.रेड्डी, वन विभागाचे अधिकारी विनयकुमार सिन्हा, शामसुंदर मिश्रा व नितीन कोटेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
लोकांच्या कामात सरकारचा सहभाग हा संयुक्त वन व्यवस्थापनाचा उद्देश असून महाराष्ट्र शासनाने देशात या विषयी चांगले काम केल्याचे मत हजारे यांनी व्यक्त केले. वन व्यवस्थापनातून ग्राम विकास ही कल्पना विकासाला चालना देणारी आहे. पृथ्वीचे होणारे शोषण थांबविण्यासाठी संयुक्त वन व्यवस्थापन अतिशय उत्तम कार्यक्रम असून गावक-यांनी या माध्यमातून ग्राम विकासाला हातभार लावावा असेही ते म्हणाले.
पावसाळयाच्या पाण्याने जमिनीवरील माती मोठया प्रमाणात वाहून जात असल्याचे खंत व्यक्त करुन राज्यातील धरणात मोठया प्रमाणात गाळ साचलेला आहे असे ते म्हणाले. भविष्यात धरणांची स्थिती अतिशय बिकट होणार असून संयुक्त वन व्यवस्थापन कार्यक्रमाअंतर्गत गवत संवर्धन हा कार्यक्रम राबविल्यास माती वाहून जाण्याचे प्रमाण रोखता येईल. हा प्रयोग राळेगण सिध्दी व हिवरेबाजार या ठिकाणी यशस्वीपणे राबविला असून त्या माध्यमातून ग्रामसभेला आर्थिक मदत झाली.
संयुक्त वन व्यवस्थापन म्हणजे लोकांच्या कामात शासनाचा सहभाग असून याव्दारे ख-या अर्थाने प्रजासत्ताक व्यवस्था निर्माण होत आहे. ही चांगली सुरुवात असून ग्रामसभेने निट व्यवस्थापन करुन गावाचा विकास साधावा. विशेष म्हणजे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी संयुक्त वन व्यवस्थापन हाच कार्यक्रम उपयुक्त असून ख-या अर्थाने सत्तेचे विकेंद्रीकरण करणारा आहे असे अण्णा हजारे म्हणाले.
राज्यात एकूण 15 हजार गावे वनक्षेत्रात असून त्यापैकी 12 हजार 500 गावात संयुक्त वन व्यवस्थापन समित्या स्थापन केल्या आहेत. त्यापैकी काही समित्या अतिशय कार्यक्षम आहेत. ज्या समित्यांनी उत्कृष्ठ कार्य केले अशा समित्यांच्या सदस्यांना प्रशिक्षित करुन त्यांच्या माध्यमातून इतर समित्यांना सक्षम बनविण्यासाठीच आजची कार्यशाळा असल्याची माहिती वनविभागाचे प्रधान सचिव प्रविण परदेशी यांनी दिली. अशा कार्यशाळेच्या माध्यमातून ट्रेनर व मास्टर ट्रेनर तयार करुन ते इतर 20 गावांना एप्रिल, मे व जून मध्ये प्रशिक्षण देतील.
जंगल माझा आहे व जंगलाचा मालक मी आहे ही भावना गावक-यांमध्ये निर्माण झाली पाहिजे त्यासाठी वनविभाग प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. वनाव्दारे मिळणा-या उत्पन्नावर संयुक्त वन व्यवस्थापन समितीचा 50 टक्के अधिकार आहे. या योजनेतून चंद्रपूर जिल्हयातील गिलबिली, सातारा तुकूम व आसेगांव या गांवाना अण्णा हजारे यांचे हस्ते धनादेश वितरीत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक विनयकुमार सिन्हा यांनी केले. तर संचलन वनअधिकारी कुळकर्णी यांनी केले. या कार्यक्रमात गडचिरोली जिल्हयातील कोंढाळा, चंद्रपूर जिल्हयातील कळमना व वर्धा जिल्हयातील आमगांव येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीने केलेल्या उत्कृष्ठ कार्याचे समिती अध्यक्षांनी सादरीकरण केले. या कार्यक्रमास वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी व संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.