चंद्रपूर, जिल्ह्यात दारूबंदी करण्याबाबतच्या मागणीसंदर्भात शासनाने पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने जिल्ह्यात दारूबंदी करावी, अशी शिफरस केली असून, समितीने सादर केलेल्या अहवालाची छाननी सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कमंत्री गणेश नाईक यांनी दिली.
१५ मार्च २०१३ रोजी विधानसभेत भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यांनी वरील माहिती दिली आहे. चंद्रपूर जिल्हयातील ८४७ पैकी ५८८ ग्रामपंचायतींनी दारूबंदीचा ठराव केला असल्याचे दारूबंदी समितीच्या अहवालात नमुद असल्याची माहिती लेखी उत्तरात राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यांनी दिली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्याच्या मागणीबाबत समितीने शासनाला सादर केलेल्या अहवालावर शासनाने कोणती कार्यवाही केली आहे, अशी विचारणा मुळ प्रश्नाच्या माध्यमातुन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली.