Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जानेवारी १६, २०१३

खाद्य पदार्थावर चंद्रपूरकर खुष


प्रदर्शनीमध्ये महिला बचत गटांची 35 लाखाची आर्थिक भरारी

                   अनेक उत्पादनांना ग्राहकांची पसंती
           
      चंद्रपूर दि.16- जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने स्थानिक चांदा क्लब येथे चार दिवस चाललेल्या तेजस्वीनी स्वयंसहाय्यकता बचत गट प्रदर्शनीमध्ये महिला बचत गटांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंची 35 लाखाची विक्रमी विक्री झाली असून अनेक उत्पादनांना ग्राहकांनी भरभरुन पसंती दिली.  140 स्टालवर विविध उत्पादन ग्राहकांना मोहित करीत होते. 
      या प्रदर्शनीत कापडी बॅगा, मेनबत्ती, शिल्प कला, मूर्ती कला, बांबूच्या वस्तू , घोंगडी, पर्स, साबण, शांपू, आयुर्वेदिक वनऔषधी, खाद्य पदार्थ व पेय यांचे एकूण 140 स्टाल लावण्यात आले होते.  केवळ चंद्रपूर जिल्हयातील नवे तर भंडारा, गडचिरोली, वर्धा व नागपूर येथील महिला बचत गटांनी सहभाग नोंदविला. चंद्रपूर जिल्हयातील 15 ही तालुक्यातील बचत गटांनी चार दिवसात विविध उत्पादने विकूण एकूण 31 लाख 66 हजाराचा व्यवसाय केला तर भंडारा, गडचिरोली, वर्धा व नागपूर येथील बचत गटांनी 3 लाख 24 हजाराचा व्यवसाय केला.
      यात प्रामुख्याने खाद्य पदार्थ 6 लाख 36 हजार, मसाले पदार्थ 2 लाख 57 हजार, कारागीरी 2 लाख 45 हजार, चर्मवस्तू 17 हजार, सौदर्य प्रसाधन 20 हजार, आयुर्वेदिक वनऔषधी 30 हजार, नैसर्गिक धान्य व मसाले 22 लाख 86 हजार रुपयाची विक्री झाली.
      अनेक महिला बचत गटांनी अप्रतिम उत्पादने या प्रदर्शनीत ठेवली होती.  काष्ट शिल्प तसेच हस्तकला या उत्पादनांना ग्राहकांना मोठया प्रमाणात पसंती दिली तर खाद्य पदार्थावरही ग्राहकांनी उडया घेतल्या होत्या.  देवाडा खूर्द येथील अष्टविनायक बचत गटाने श्रीराम तांदुळाच्या माध्यमातून 1 लाख 25 हजाराचा व्यवसाय केला. तर या ब्रांड तांदूळाची 25 हजाराची अगाऊ विक्री नोंदविल्या गेली आहे.  रेणूका माता बचत गटाच्या खाद्य पदार्थाला पसंती देत ग्राहकांनी 32 हजाराचा व्यवसाय दिला.  अन्नाभाऊ साठे या माढेळी येथील बचत गटाने लांब रोटया व झुनका भाकर विकूण 28 हजार रुपये  कमाविले. 
      केवळ धान्य व खाद्य पदार्थ यांनाच नाही तर बांबू पासून बनविलेल्या शोभेच्या वस्तूंची सुध्दा ग्राहकांनी भरभरुन खरेदी केली. संतोष बजाईत  यांच्या ग्रामोदय संघ भद्रावती यांनी तयार केलेल्या बांबूच्या छोटया झोपटया व बैल गाडयांची 30 हजाराची विक्री झाली. संजिवनी महिला बचत गटाच्या मालिश तेल, अडूळसा, शतावरी, वेदनाशक बाम व च्यवनप्राश या उत्पादनांनी सुध्दा चांगला व्यवसाय केला.  विशेष म्हणजे ग्रामीण भागात प्रसिध्द असलेल्या घोंगडी ने सुध्दा या प्रदर्शनीत आपला ठसा उमटविला. नवरगांव येथील राणी लक्ष्मीबाई बचत गटाने 50 हजार रुपयाची गादी व घोंगडी विकून आजही पारंपारीक घोंगडीला मागणी असल्याचे सिध्द केले. 
      चिमूर येथील गौतमी बचत गट व वरोरा येथील वाल्मीकी बचत गटाने  हळदीची अनुक्रमे 50 हजार व 18 हजार रुपये किंमतीची विक्री केली.  या प्रदर्शनीच्या माध्यमातून बचत गटांना आर्थिक सक्षमता मिळाली असून महानगराच्या बाजार पेठेचा रस्ताही गवसला आहे. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.