Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑगस्ट ३०, २०१०

चंद्रपूर जिल्ह्यात साथीच्या रोगाचे थैमान

Tags: chandrapur, diseases, vidarbha

Monday, August 30, 2010 AT 12:00 AM (IST)

सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर - जिल्ह्यातील नागरिक सध्या साथीच्या रोगाने ग्रासले असून, उपचारासाठी आरोग्य केंद्र आणि रुग्णालयात मोठ्या संख्येने भरती होत आहेत. मात्र, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातच औषधांचा तुटवडा आहे. डायरिया प्रतिबंधक औषधे आणि सलाईन नसल्याने रुग्णांना खासगी औषधालयातून खरेदी करावे लागत आहे. शहरातील सर्व खासगी दवाखाने ताप आणि साथीच्या रोगाने हाउसफुल्ल आहेत. शिवाय आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीच्या दवाखान्यात रुग्ण दिसून येत आहेत.
पावसाची उघडीप सुरू असतानाच वातावरणात झालेल्या बदलाचा परिणाम नागरिकांवर होऊ लागला आहे. रस्त्यावरील खड्डे, घरासमोरील घनकचरा आणि नाल्यातील सांडपाण्यातून डासांची उत्पत्ती होऊन पावसाळा रोगराईस आमंत्रण देत आहे. जिल्ह्यात सध्या साथीच्या रोगाचे थैमान असून, रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रात उपचार घ्यायला खाट उपलब्ध नाहीत, इतकी गर्दी झाली आहे.
पावसाळा सुरू झाला की, हळूहळू साथीचा रोग पाय पसरू लागतो आणि मलेरिया, ग्रॅस्टो, हगवण, उलटी, कावीळ यांसारखे रोग अख्ख्या कुटुंबाला आपल्या कवेत करतात. त्यामुळे कुटुंबच्या कुटुंबे रुग्णालयात हलविण्याची पाळी येत आहे. चंद्रपूर शहरातही हगवण, उलट्यांचे रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले आहेत. दररोज 300 ते 400 रुग्ण तपासणीसाठी येत असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांची तारांबळ उडत आहे. रुग्णालयात 200 ते 300 खाटांची व्यवस्था आहे. मात्र, येथे साडेचारशे रुग्ण भरती झाल्याने उर्वरित रुग्णांना खाली झोपून उपचार घ्यावा लागत आहे.
नागभीड तालुक्‍यातील अनेक गावांत कावीळ रोगाची लागण झाली असून, रुग्णालये हाउसफुल्ल झाली आहेत. तालुक्‍यातील आरोग्यसेवा सुरळीत ठेवण्यासाठी नवेगाव पांडव, मौशी, बाळापूर, तळोधी, वाढोणा येथे रुग्णालये आहेत. परंतु, मागील अनेक दिवसांपासून येथे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी गैरहजर राहत असल्याने रुग्णांची हेडसांळ होत आहे. तालुक्‍यातील मोहाळी, मांगली, कोरंभी आणि अन्य गावात काविळीची लागण झाली आहे.
मूल पावसाने दडी मारल्यानंतर वातावरणात बदल झाला असून, मलेरिया, कावीळ आणि ग्रॅस्टोची साथ पसरत आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची मोठ्या संख्येने गर्दी झाली आहे. उपजिल्हा रुग्णालयात 50 खाटांची व्यवस्था आहे. त्या संपूर्ण हाउसफूल असून, रुग्णांना बाहेरून उपचार घ्यावा लागत आहे. रुग्णांना भरतीसाठी आता जागा उपलब्ध नसल्याने खाली गादी टाकून उपचार घेताना रुग्ण दिसत आहेत. दुसरीकडे स्थानिक रुग्णांना घरूनच ये-जा करून उपचार घ्यावा लागत आहे. शहरात आणि ग्रामीण भागात उघड्यावरच्या घाणीमुळे ही साथ पसरली असून, डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी फवारणी केली जात नाही. दूषित पाण्यामुळेही हगवण, उलटी, कॉलरा, ग्रॅस्टोची लागण होत आहे.

मादी डास घातक
गाढ झोप लागते तेव्हा थव्याने येऊन गुणगुणत झोपेचे खोबरे करणाऱ्या मादी डासांमुळे तापाचा संसर्ग पसरतो. "सॅण्डफ्लॉय' माशी चावल्यानंतरच चंडीपुरा मेंदूज्वर होतो. "एडीस इजिप्टाय' ऍनाफेलीस, क्‍यूलेक्‍स डासाची मादी चावल्यानंतर डेंग्यूची शक्‍यता बळावते. फायलेरियामध्ये हीच स्थिती असते.



ताप येण्यास कारणीभूत घटक
-सॅण्डफ्लय
-एडीस इजिप्टाय
-ऍनाफेलीस
-क्‍यूलेक्‍स



जिल्हा सामान्य रुग्णालय

खाटांची संख्या-300


सध्या रुग्ण-340


साथीचे रुग्ण-20


आतापर्यंत मृत्यू-सात


जुलैअखेरपर्यंत चंडीपुरा रोगाचे 133 नोंद झाली होती.



प्रशासनाची बेपर्वाही
ग्रामीण भागात आजही शुद्ध पाणी मिळत नाही. त्यामुळे रोगांचा फैलाव प्रामुख्याने होतो. घनकचरा आणि नाल्यांची साफसफाई करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची आहे. मात्र, तसे काहीही केले जात नाही. आरोग्य यंत्रणेच्या इमारती गावोगावी आहेत. मात्र, औषधांचा साठाच नाही. त्यामुळे गरिबांच्या वाट्याला रोगराईचा सामना कायम आहे.

"पावसाळ्यामुळे डबक्‍यांमध्ये पाणी साचून अळ्या निर्माण होतात. त्याचे रुपांतर डासांमध्ये होते. मागील 15 दिवसांपासून साथीचा आजार दिसून येत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात 20 रुग्ण भरती आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. औषधांचा साठा संपला असून, वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू आहे.''


-डॉ. रमेश बांडेबुचे, जिल्हा शल्यचिकित्सक, चंद्रपूर

http://www.esakal.com/

लाच प्रकरणातील शल्यचिकित्सकजिल्हा सामान्य रुग्णालयाची प्रतिमा रुग्णांच्या गैरसोयीसोबतच आर्थिक गैरव्यवहाराने डागाळलेली आहे. सुमारे 25 वर्षांपूर्वी डॉ. खुरपे यांना लाचप्रकरणात अटक करण्यात आली होती. 1990 नंतर डॉ. गोटेफोडे यांना तीन हजार रुपये घेताना, तर 2004 मध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उमाकांत अणेकर यांना 25 हजार रुपयांची लाच घेताना वरोरा येथे पकडण्यात आले होते. त्यानंतर तब्बल सहा वर्षांनी डॉ. रमेश बांडेबुचे हे दोन हजार 800 रुपये घेतल्याप्रकरणी लाचप्रकरणात अडकले आहेत. रुग्णालयाच्या इतिहासात डॉ. स्वामी, डॉ. अय्यर या अधिकाऱ्यांनाही अटक करण्यात आली होती.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.