Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, ऑगस्ट ०८, २०१०

सात लाखांच्या गुंतवणुकीत 15 लाखांची कमाई

सकाळ वृत्तसेवा
Friday, May 14, 2010 AT 12:15 AM (IST)

देवनाथ गंडाटे - सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर - कुष्ठरोग्यांचे नंदनवन असलेल्या आनंदवनात श्रमाचे मोल शिकायला मिळते. ज्येष्ठ समाजसेवक स्व. बाबा आमटे यांच्या स्वप्नातून साकारलेल्या या गावाची यशोगाथा जगापुढे आहे. त्याच आनंदवनात "आमच्या गावात आम्ही सरकार'च्या माध्यमातून गावकऱ्यांनी सात लाखांच्या गुंतवणुकीतून 15 लाखांची कमाई केली. सिमेंट, मातीच्या विटा आणि रोपविक्रीतून हा आदर्श घडविला आहे.

जलस्वराज्य प्रकल्पाच्या वतीने "आमच्या गावात आम्ही सरकार' या योजनेंतर्गत जिल्ह्यातील 14 गावांची निवड करण्यात आली होती. यापैकी आनंदवन ग्रामपंचायतीने ही योजना यशस्वीरीत्या राबविली. एप्रिल 2004 पासून या योजनेच्या कामांना सुरवात झाल्यानंतर सहा वर्षांमध्ये विविध उद्योगांतून यश मिळविले आहे. ग्रामपंचायतीला प्रोत्साहन क्षमता निधी 50 हजार रुपये वितरित करण्यात आल्यानंतर ग्रामसभा घेण्यात आली. गावनिहाय विकास समिती, सामाजिक लेखा परीक्षण समिती गठित करण्यात आली. या समितीने यवतमाळ जिल्ह्यातील जामगाव, सेंद्रिय (डोलारी) या हागणदारीमुक्त गावांना भेटी दिल्या. बुलडाणा जिल्ह्यातील दत्तापूर येथील दूधसंकलन केंद्राची पाहणी करण्यात आली. या अभ्यासदौऱ्यातून गावकऱ्यांना उद्योगविषयक माहिती मिळाली. अभ्यासगटाची चमू गावात परतल्यानंतर गावविकास आराखडा आणि पंचायत विकास आराखडा तयार करण्यात आला. यात गाव विकासासाठी सात लाख रुपये आणि पंचायत विकासासाठी एक लाख 74 हजार 200 रुपये मिळाले. लोकवाट्यातून दीड लाख रुपये जमा झाल्यानंतर एकूण 10 लाख रुपयांच्या निधीतून विकासकामांना सुरवात झाली. गावविकास आराखड्यात सिमेंट वीटभट्टी आणि सिमेंट खांब निर्मितीचा उद्योग सुरू झाला. यात दोन लाख 48 हजार 400 रुपयांची गुंतवणूक करून उद्योगाची पायाभरणी करण्यात आली. 100 विटांना दोन हजार रुपये असा खर्च यायचा. तयार झालेला माल आनंदवन संस्थांसाठी दोन हजार 200 रुपयांना, तर अन्य लोकांसाठी दोन हजार 200 रुपयांना 100 विटांप्रमाणे विक्री करण्यात आली. आठ मजुरांच्या भरवशावर एक दिवसात आठ हजार विटांची निर्मिती होते. आतापर्यंत पाच लाख 12 हजार 432 रुपयांचे उत्पन्न झाले आहे. सिमेंटशिवाय मातीच्या लाल विटाही तयार करण्यात आल्या. यासाठी तीन लाख 50 हजार 600 रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. एक हजार विटांसाठी एक हजार 200 रुपये खर्च यायचा. त्याची विक्री एक हजार 600 ते दोन हजार रुपयांपर्यंत करण्यात आली. उद्योगात 25 मजूर कामाला आहेत. डिसेंबर ते मे अखेरपर्यंत सहा लाख 13 हजार 603 रुपयांचे उत्पन्न मिळाले. चार मजुरांच्या भरवशावर रोपविक्री केंद्र सुरू झाले. यात एक लाखांची गुंतवणूक होती. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या काळात तीन लाख 94 हजार 840 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. रोपविक्री केंद्रातून सायपाम, एरिकापॉम, विद्यालहान, टेबलपॉम, आवळा, जाम, डाळिंब, फणस, अशोका मोठा, चाफा, सुपारीपॉम, ड्रेसिनया, सदाफुली, गुलाब आदी फुलाफळांच्या जाती घेण्यात आल्या.

पंचायत विकास आराखड्यात एक लाख चार हजारांच्या गुंतवणुकीतून झेरॉक्‍स मशिन सुरू करण्यात आली. अवघ्या चार महिन्यांत 29 हजार रुपयांचे उत्पन्न झाले. या कामाशिवाय गावाच्या विकासासाठी सांडपाणी नालीद्वारा तलावात सोडून मत्स्यपालन, चारा उत्पादन, भाजीपाला घेण्यात आला. मासेमारीतून तीन लाख, तर भाजीपाल्यातून दीड लाखापर्यंत उत्पन्न मिळाले आहे. मिळालेल्या एकूण नफ्यातील 80 हजार रुपये खर्चून आनंदवन येथे पथदिवे लावण्याचा संकल्प ग्रामपंचायतीने केला आहे

प्रतिक्रिया
On 5/14/2010 5:57 PM sarang said:
या बातमी मुले लोकांमुळे समूह भावना निर्माण होऊन गाव विकासाची वाट शोधण्यास मदत झाली आहे. अशाच प्रकारे शाशकीय योजनामध्ये यशस्वी झालेल्या कामांना प्रशिद्धी दिल्यास लोकांमध्ये विकासाची भावना जागृत झाल्याशिवाय राहणार नाही. कृष्णकांत खानझोडे -९८५०६१२९१३ सारंग काकडे जलस्वराज्य प्रकल्प जिल्हा परिषद -चंद्रपूर

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.