Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

प्रशिक्षण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रशिक्षण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, जून ०८, २०१८

 चंद्रपुरात उभे राहणार मत्स्य संशोधन व प्रशिक्षण केंद्र

चंद्रपुरात उभे राहणार मत्स्य संशोधन व प्रशिक्षण केंद्र

चंद्रपूर/प्रतिनिधी:
महाराष्ट्राला दूध अंडी आणि मासळी या आवश्यक खाद्यपदार्थांसाठी स्वयंपूर्ण बनविण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. त्यासाठी पूर्व विदर्भातील भूजलसाठ्याचा वापर करण्यात येणार आहे. विदर्भातील पारंपारिक मत्स्यव्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाचा, संशोधनाचा व अद्ययावत सुविधांचा हातभार लावत राज्याची या क्षेत्रातील स्वयंपूर्णता वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार व राज्याचे पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर आज चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायिकांनपुढे व्यक्त केला.
चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात गुरुवारी गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायकाची ची बैठक आयोजित करण्यात आली होती. राज्य शासन दर महिन्याला 450 कोटी रुपयांचे दूध, अंडी आणि मासळी अन्य राज्यातून आयात करत असल्याचे महादेवराव जानकर यांनी सांगितले. मात्र ही आयात बंद करून राज्याच्या तिजोरीला आणि स्वयंपूर्णतेला विदर्भातील मत्स व्यवसायिक व शेतकरी मदत करू शकतात. त्यामुळेच गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायाला गती देण्यासाठी अनेक प्रयोग आगामी वर्षभरात केले जाणार आहेत. 
चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या भागांमध्ये तलाव व जलसाठे मोठ्या प्रमाणात आहेत.या भागामध्ये गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायाला चालना मिळू शकते. या पद्धतीच्या व्यवसायाची पाळेमुळे या ठिकाणी रुजलेली आहे. त्याला आधुनिक स्वरूप देऊन. आवश्यक मदत देऊन. प्रशिक्षण व संशोधन उपलब्ध करून आणखी गती देण्याचा राज्य शासनाचा मानस असून त्यासाठी या दोन जिल्ह्यांमध्ये या व्यवसायाला मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आज या दोन्ही नेत्यांनी मत्सव्यवसायिकांची चर्चा करताना आगामी काळात मत्स्यबीज निर्मिती ते मासळीची निर्यात या दोन्हीही घटकांना साध्य करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू करण्याबाबत घोषणा केल्यात. 
दुपारी एक वाजता सुरू झालेल्या बैठकीमध्ये राज्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्त अरुण विधळे, महाराष्ट्र पशुसंवर्धन व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे कुलगुरू आशितोष पातुरकर, चंद्रपूर जिल्हा मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनील जांभुळे, चंद्रपूर बांधकाम विभागाचे अभियंता जुनारकर यांनी विदर्भातील मत्स्यव्यवसाय, मत्स्यव्यवसाय संशोधनाची विदर्भातील गरज, चंद्रपूर जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायिकांची सद्यस्थिती व फिश मार्केट उभारण्याची आवश्यकता आदींबाबत सादरीकरण केले. या सादरीकरणसोबतच याठिकाणी उपस्थित असणार्‍या मत्स व्यवसायिकांची मत्स तथ्‍यांबद्दल घेण्यात आली. कोणतेही प्रकल्प उभारताना स्थानिक व्यावसायिकांच्या मतांचा आदर करा ,असे निर्देश यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. या सादरीकरणामध्ये महाराष्ट्रातील पहिले गोड्या पाण्यातील मत्स्य संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारणीबाबत महाराष्ट्र पशुसंवर्धन व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्यामार्फत प्राप्त झाला असून याठिकाणी या केंद्राची आवश्यकता असल्याचे निष्कर्ष आजच्या बैठकीत विद्यापीठाचे कुलगुरू आशिष पातुरकर यांनी मांडले. 
पाण्याची उत्तम सुविधा असणाऱ्या आणि संपर्काची साधने उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी काही हेक्टर परिसरात राज्यातील हे पहिले केंद्र उभे राहणार आहे. या केंद्रामध्ये मत्स्यबीज निर्मिती, शोभिवंत माशांच्या प्रजातींची निर्मिती प्रजनन केंद्र व्यवसाय संशोधन कमी पाण्यातील मत्स्यबीज निर्मिती याबाबतचे संशोधन व विकास कार्य चालणार आहे. उभय नेत्यांनी या प्रकल्पासाठी तत्वतः मान्यता आज दिली आहे. तथापि, योग्य जागा शोधण्याची निर्देश पालकमंत्र्यांनी या बैठकीत दिले. 
आजच्या बैठकीमध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायिकांच्यावतीने जिल्ह्यातील काही समस्या महादेव जानकर यांच्या लक्षातआणून दिल्या. या भागातील मत्स्य व्यवसायाला गती देण्यासाठी या विभागातील रिक्त पदांची भरती करण्यात यावी, दोनशे विद्यार्थ्यांना जेवण व राहण्याच्या व्यवस्थेसह प्रशिक्षित करण्यात यावे, मत्स्यखाद्य निर्मितीला चालना द्यावी, आधुनिक व स्वस्त दराच्या बोटी मासेमारीसाठी उपलब्ध करण्यात याव्यात, बंद पडलेले मत्स्य बीज निर्मिती केंद्र पुनर्जीवित करण्यात यावे, तलावाचे खोलीकरण करण्यात यावे,बोगस संस्था बंद करण्यात याव्यात,लघु मत्स खादय कारखाना निर्मितीसाठी अनुदान देण्यात यावे व मत्स्यबीज ते मार्केटिंग असा प्रकल्प जिल्ह्यात कार्यान्वित व्हावा अशी सूचना केली. 
यावेळी महादेव जानकर यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्रालयाला वाढीव निधी मिळालेला असून विभागाच्या बळकटीकरणासाठी त्यांचा हातभार व आशीर्वाद मिळाल्याचे विनम्रपणे सांगितले. त्यामुळे मुनगंटीवार यांनी केलेल्या सर्व सूचना महिनाभराच्या आत अंमलात येतील. पुढच्या बैठकीला आपण स्वतः उपस्थित राहून याबाबतची वस्तुस्थिती जाणून घेऊ असे आश्वासन महादेव जानकर यांनी दिले.26 जुलै रोजी यासंदर्भातली बैठक होणार असून पुढील एक वर्षाच्या नियोजनबद्ध कालावधीत चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यांमध्ये मत्स्यव्यवसायाला पूरक असणाऱ्या यंत्रणांची निर्मिती,आवश्यक मनुष्यबळ व अधिकाऱ्यांची नियुक्ती, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गोड्या पाण्यातील मत्स्य संशोधन व प्रशिक्षण केंद्राची निर्मिती, चंद्रपूर, भद्रावती, ब्रह्मपुरी, गडचांदूर याठिकाणी फिश मार्केटची उभारणी, जलाशयाच्या ठेका देण्याच्या रकमेमध्ये कपात करण्याचा अध्यादेश काढणे, आदी महत्त्वपूर्ण निर्णयाची पूर्तता करण्याबाबत निर्णय होणार आहे. 
आजच्या या महत्त्वपूर्ण बैठकीला दोन्हीही मंत्र्यांसोबत चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे,महापौर अंजली घोटेकर, गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती भांडेकर, आमदार देवरावजी होळी, जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले, विदर्भ मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष प्रकाश लोणारे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनोहर पउनकर, महाराष्ट्र पशुसंवर्धन व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे कुलगुरू आशिष पातुरकर, सहआयुक्त मत्स्यव्यवसाय विनोद नाईक, प्रादेशिक आयुक्त मत्स्यव्यवसाय रवींद्र वायडा,आदींसह चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय, मत्स्यव्यवसाय संबंधातील विविध संघटनांचे पदाधिकारी, पारंपारिकरित्या मत्स्यव्यवसाय करणाऱ्या समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
यामध्ये प्रामुख्याने नगरसेवक राजू गोलीवार,माजी नगरसेवक बंडू हजारे, डॉ. शिवरकर,दामोदर रूयारकर व चांदा जिल्हा मत्स्यव्यवसाय सहकारी संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी जितेश केशवे यांनी केले.

मंगळवार, फेब्रुवारी १३, २०१८

विदर्भातील पहिले डायमंड कटिंग केंद्र चंद्रपुरात

विदर्भातील पहिले डायमंड कटिंग केंद्र चंद्रपुरात

चंद्रपूर/प्रतिनिधी:
 हिऱ्याला पैलू पाडून त्याला आकर्षक आकार देण्याचे प्रकार देणारे प्रशिक्षण केंद्र बल्लारपुरात साकार झाले आहे. हे प्रशिक्षण केंद्र विदर्भातील बेरोजगार तरुणांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. या डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन रविवारी राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले.
उदघाटनीय कार्यक्रमात बोलताना ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यातील तरूणांना मोठया प्रमाणावर रोजगार उपलब्ध करणे ही आपली प्राथमिकता आहे. त्यादृष्टीने रोजगाराभिमुख विविध उपक्रम आपण सुरू करीत आहोत. बल्लारपुरात डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून दर महिन्याला प्रशिक्षणार्थ्याला २० हजारावर रोजगार देण्याचा व तीन वर्षात तीन हजार तरूण त्या माध्यमातून प्रशिक्षित करण्याचा आमचा मानस आहे. प्रतिवर्ष एक हजार तरूण या प्रशिक्षण केंद्रातून बाहेर पडतील.
तरूणांसाठी आर्थिक स्वातंत्र्याच्या अभियानाला सुरूवात आम्ही या जिल्ह्यात केली आहे. चांदा ते बांदा हा उपक्रम रोजगाराभिमुख आहे. याचे कौतुक निती आयोगाने सुध्दा केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा येथे विमानतळ विकासासाठी १२०० एकर जागा उपलब्ध झाली आहे. बल्लारपूर येथे पोलीस प्रशिक्षण केंद्रसुध्दा सुरू होणार आहे. हिंगणघाटचे मोहता यांच्या मदतीने बल्लारपूर येथे महिलांना कापड निर्मिती करण्याचे प्रशिक्षण व त्यांना रोजगार देण्याचा करार करण्यात आला आहे, असेही ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.
यावेळी मंचावर महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, उपाध्यक्षा मिना चौधरी, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, शिवचंद द्विवेदी, भय्याजी येरमे, रेणुका दुधे, एन.डी. जेम्स या संस्थेचे प्रमुख निलेश गुल्हाने आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी निलेश गुल्हाने म्हणाले, डायमंड उद्योगामध्ये मी गेले १५ वर्षे काम करीत आहे. डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्र उभे करण्याची माझी तीव्र इच्छा होती. सुरत, मुंबईमध्ये हिऱ्यांचे व्यापारी मोठया संख्येने आहेत. मात्र त्यांना प्रशिक्षित तरुण मिळत नाही. रोजगारांची शंभर टक्के हमी असून किमान २० हजार रुपये वेतनाचा रोजगार मिळू शकतो. ना. सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रक्रियेत मला दिलेल्या पाठिंब्यामुळे व सहकायार्मुळे हे केंद्र उभे राहू शकले.
बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा म्हणाले, गेल्या तीन वर्षात १३८ कोटीहून अधिक निधी बल्लारपूरच्या विकासासाठी ना. मुनगंटीवारांनी खेचून आणला आहे. आरोग्य सेवा बळकट करण्यावर त्यांनी प्रामुख्याने बळ दिले आहे. संचालन काशिनाथ सिंग यांनी केले तर आभार स्वप्ना पंचलवार यांनी मानले.
काय आहे डायमंड कटींग ?
डायमंड कटींग आणि प्रोसेसिंग याबाबतचे रहिवासी प्रशिक्षण चार महिन्यात देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणादरम्यान भोजन व निवास व्यवस्था नि:शुल्क आहे. एन.डी. जेम्स ही कंपनी मुलांना हिऱ्यांना पैलू पाडण्याचे प्रशिक्षण देणार आहे. सोबतच या ठिकाणी प्रशिक्षण घेतल्यानंतर सुरत तसेच मुंबई येथे रोजगार देण्याची हमीसुध्दा देणार आहे. पुढील तीन वर्षात तीन हजार मुलांना प्रशिक्षण व रोजगार देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारे हमी देऊन प्रशिक्षण देणारा हा पहिलाच प्रयोग आहे.