Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

छ.शिवाजी महाराज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
छ.शिवाजी महाराज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ऑक्टोबर १९, २०२०

छत्तपती  शिवाजी महाराज  यांचा मृत्यू

छत्तपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू

 छत्तपती  शिवाजी महाराज  यांचा मृत्यू 

फेसबुक लिंक http://bit.ly/2HepOYv
रायगडाने अनेक सुखद आणि दुखद क्षण अनुभवले. त्यापैकीच एक म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचे आकस्मिक निधन! १६७४ ला राज्याभिषेक झाल्यानंतर कुणाला वाटले पण नसेल की अवघ्या ६ वर्षात हा महान राजा हे जग सोडून जाईल म्हणून पण नियतीचा फेरा कुणास चुकतो का! ३ एप्रिल १६८०, चैत्र पौर्णिमा,शालिवाहन नृप शके १६०२ या दिवशी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारा माझा राजा निधन पावला! त्यानंतर हा लढा पुढे संभाजी महाराज, मग राजाराम महाराज, ताराराणी, शाहू महाराज आणि नंतर पेशवे असा सर्वांनी यशस्वीपणे चालवला आणि थोरल्या राजांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करून त्याचे रूपांतर विशाल मराठा साम्राज्यात केले.

केवळ ५० वर्षे आयुष्य लाभलेला हा राजा अचानक मरण कसा पावला हा संशोधनाचा भाग आहे. काही म्हणतात थकव्यामुळे आजार होऊन ज्वर झाला, तर काही म्हणतात गुडघे रोगाने मरण पावला तर काही जण अष्टप्रधान मंडळातील लोकांवरच विष पाजल्याचा आरोप करतात. तर यामागे कोणते सत्य आहे हे ऐतिहासिक पुरावे पहिले की कळून येते. यातील काही पुरावे हे अगदी समकालीन आहेत, काही उत्तरकालीन आहेत, काही बखरी मधले आहेत, काही आपल्या लोकांनी लिहिलेले आहेत तर काही इंग्रजांनी लिहिलेले आहेत. मात्र या पुराव्यांमधून केवळ २ प्रकारची माहिती पुढे येते. एक म्हणजे ज्वर झाला होता अशी जी बहुतांश पुरावे थोड्या फार फरकाने सांगतात आणि दुसरी म्हणजे विषप्रयोग झाला अशी. यांमुळे या सर्व पुराव्यांची चिकित्सा करणे हे फार महत्वाचे ठरते. आपण प्रथम एका खाली एक लिखित पुरावे काय सांगतात ते पाहू म्हणजे त्यानंतर आपल्याला निष्कर्ष काढणे सोपे जाईल.

सभासद बखरीचे प्रथम पृष्ठ

📖 १.सभासद बखर-

कृष्णाजी अनंत सभासद या महाराजांच्या सल्लागाराने ही बखर राजाराम महाराजांच्या आज्ञेवरून लिहिली. हा सभासद महाराजांच्या पदरीच कामाला असल्याने त्याने लिहिलेल्या बखारीची विश्वासार्हता ही इतर अनेक बखरीपेक्षा कैक पटीने जास्त आणि सर्वमान्य आहे. सभासद असे सांगतो की, “मग काही दिवसांनी राजास ज्वराची व्यथा जाहाली.राजा पुण्यश्लोक.कालज्ञान जाणे.विचार पाहाता आयुष्याची मर्यादा झाली.असें कळून जवळील कारकून व हुजरे लोक होते त्यामध्ये सभ्य,भले लोक बोलावून आणिले.”

छत्तपती  शिवाजी महाराज  यांचा मृत्यू

सभासद पुढे कुणा कुणाला बोलावले त्या माणसांची नावे सुद्धा देतो. ” बितपशील- कारकून - निळोपंत प्रधानपुत्र, प्रल्हादपंत, गंगाधरपंत [हे] जनार्दनपंताचे पुत्र, रामचंद्र निळकंठ, रावजी सोमनाथ, आबाजी महादेव, जोतीराव, बाळप्रभू चिटणिस हुजरे लोक - हिरोजी फरजंद, बाबाजी घाडगे, बाजी कदम, मुधोजी सरखवास, सुर्याजी मालुसरा, महादजी नाईक पानसंबळ.” या सर्व जाणत्या माणसांना राजांनी काही उपदेश केला, “त्यास सांगितले की आपली आयुष्याची अवधी जाली. आपण कैलासास श्रीचे दर्शनास जाणार. शरीर क्षीण देखून पन्हाळियावरि संभाजी राजे वडील पुत्र यांस सांगितले [होते] की 'तुम्ही दोघे पुत्र आपणास यांस राज्य वाटून देतो. आणि उभयता सुखरूप राहणे. म्हणोन सांगितले. परंतु वडील पुत्र संभाजी राजे यांनी ऐकिले नाही. शेवट आपला तो निदानसमय दिसताहे.” राजांचे अंत्यसंस्कार हे पुढे राजाराम महाराजांनी केले असा उल्लेख सभासद करतो. 

२. याशिवाय इंग्रजांनी लिहिलेल्या पत्रात  सुद्धा राजांच्या मृत्यूबद्दल मृत्यूबद्दल माहिती मिळते. इंगलीश रेकॉर्ड्स मधील २८ एप्रिल १६८० रोजीचे हे पत्र, हे पत्र समकालीन आहे.

“Wee have certaine news that Sevajee Rajah is dead. It is now 23 days since he deceased, it's said of a bloody flux, being sick 12 days. How affaires goes in his country wee shall advise as comes to our knowledge. At present all is quiett, and Sombajee Rajah is at Pornollah.”

३. 📖 जेधे शकावली

जेधे शकावली ही कान्होजी नाईक जेधे यांच्या वंशजांकडून मिळवून छापण्यात आली. एक विश्वासाचे साधन म्हणून ही शकावली मानली जाते. त्यात लिहिले आहे,

“शके १६०२ रौद्र संवछर चैत्र शुध पौर्णिमा शनवारी दोप्रहरां दिवसां रायगडी सिवाजी राजे यांनी देह ठेविला”

_______________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
_______________________
४.   📖  मराठ्यांची बखर
ग्रांड डफ, मराठी अनुवाद डेव्हिड केपन

डफने ही बखर अनेक पत्रांचा आधार घेऊन लिहिली असल्याने अनेक जण याचा संदर्भ ,म्हणून वापर करतात परंतु ही तितकी विश्वासार्ह नाही. डफ म्हणतो,

“यानंतर शिवाजीचा अंतकाळ समीप आला. तो प्रकार असा, शिवाजी रायगडी असतां त्याला गुढघी म्हणून रोग झाला. तो प्रतिदिवशी वृध्धींगत होत चालला. मग त्याच्या योगेकारून मोठा ज्वर झाला. ज्वर आल्यापासून सातव्या दिवशी तो मृत्यू पावला.”

५. 📖  श्रीमंत महाराज भोसले (शेडगांवकर) यांची बखर- मराठी रुमाल भाग १

“शके १६०२रौद्रनाम संवत्सरे फसली सन १०९० राज शके ७ या साली शिवाजी महाराज छत्रपती हे रायगडीच होते.तेथेच महाराज छत्रपती यांस व्यथा ज्वराची जाहाली,ते समई महाराज पुण्यश्लोकी व त्रिकालज्ञानी सर्व जाणते याणी आपला विचार पाहता तो औक्षमर्यादा जाहाली असे जाणोन जवळील अष्टप्रधान व सरकारकून व कारकून व कारभारी व सरदार व हुजरे वगैरे मंडळी यांस बोलावून आणिले.”

६.   📖    ९१ कलमी बखर (भारतवर्ष)

वाकसकर यांनी छापलेल्या या बखरीचा सुद्धा एक महत्वपूर्ण साधन म्हणून उपयोग केला जातो. त्यात लिहिले आहे की,
““नंतर राजे स्वामीस नवज्वर प्राप्त झाला. शके १६०२ रुद्र नाम संवत्सरे चैत्र शुद्ध १५ दोन प्रहरा, राजेस्वमी कैलासवासी झाले. सावधपणे संस्कार करून हरिदास कीर्तन करीत असता देह ठेवला.”

७.    📖   Storia Do Mogor (असे होते मोगल-मराठी अनुवाद,ज.स. चौबळ)

निकोलाओ मनुची हा इटालीयन प्रवाशी होता. त्याने आपल्या पुस्तकात शिवाजी राजांची तसेच संभाजी राजांची व त्यांच्या कारकीर्दिची टिपणे काढून ठेवली आहेत. तो म्हणतो,

“तो(शिवाजी)सारखा मोहिमेवर चहुकडे फिरे या दगदगीने तो थकून गेला आणि रक्ताच्या उलट्या होऊन १६७९ मध्ये मरण पावला.”

८.    📖   मासिरे आलमगिरी-

साकी मुस्तैदखान हा मनुष्य औरंगजेबाच्या पदरी होता. त्याने मासिरे अलामगिरी हा ग्रंथ लिहिला. त्यात तो म्हणतो की,

“आमदानीचे २३वे वर्ष १०९१ हि.(मे १६८०) घोड्यावरून रपेट करून आल्यावर त्याला(शिवाजीला) उष्णतेमुळे दोनदा रक्ताची उलटी झाली”


९.   📖    शिवकालीन पत्रसारसंग्रह खंड २,लेखांक-२२८६, डाग रजिस्टर १६८०

ज्या डाग रजिस्टर मधील संदर्भ देऊन विषप्रयोग केला असा आरोप केला जातो तिथे विषप्रयोगाचा उल्लेख जरूर आहे परंतु तो सोयराबाई यांनी केला असा उल्लेख आहे.
“गोवळकोंड्याहून असे लिहून आले आहे की, शिवाजीराजाला त्याच्या दुसऱ्या बायकोकडून (म्हणजे सोयराबाई यांच्याकडून) विषप्रयोग झाला असावा”

१०.  📖  तारीखे शिवाजी (सर जदुनाथ सरकार प्रकाशित, अनुवाद वि. स. वाकसकर (९१ कलमी बखर) 

“as the maharajah's destined period of life had come to its end the queen's heart changed and she did an act (poisoning ?) Which made Shivaji give up his life”

११.  History of Aurangzib (Vol. IV, Ssouthern India 1645-1689) -Jadunath Sarkar


सर जदुनाथ सरकार यांनी केलेला उल्लेख हा इंग्रजांच्या पत्रावरूनच केलेला दिसून येतो.

“On 23rd. of March 1680,the Rajah was seized with fever and blood dysentery. The illness continued for twelve days. Gradually all hopes of recovery faded away, and then after giving solemn charges and wise counsels to his nobles and officers ....the maker of Maratha nation performed the last rites of his religion and then fell into trance, which imperceptibly passed into death.”

आता या सर्व उल्लेखांमधून निष्कर्ष काय निघतात ते पाहू,

१.    वर दिलेल्या ९ संदर्भांपैकी ८ संदर्भ हे सांगतात की राजांचा मृत्यू हा आजारी पडूनच झाला होता. अर्थात नेमक्या कोणत्या आजाराने याबद्दलच्या तपशिलात फराज जाणवतो हे नक्की. परंतु त्यावेळी असलेले वैद्यकीय ज्ञान आणि दळणवळणाची साधने लक्षात घेता हा फरक होणे साहजिक आहे. दळणवळणाची साधने यासाठी की महाराष्ट्रात असणाऱ्या तत्कालीन परदेशी व्यापारांची पत्रे पहिली तर असे लक्षात येते की मृत्यू झाला का नाही याच्या बद्दलच त्यांच्या मनात शंका होती. जे इच्छूक आहेत त्यानी शिवकालीन पत्रसारसंग्रह खंड-२ मध्ये लेखांक २२४९ ते २२५३,२२५८ ते २२६१ ,२२७५,२२८१,२२८६,२३०२,२३०७ इत्यादी पत्रे जरूर वाचावी.

२. अनेक जण हा मृत्यू विष पाजल्यामुळे झाला असा बिनपुरावी आरोप करतात आणि त्याचे खापर अष्टप्रधान मंडळातील लोकांवर करतात. यासाठी पुरावा म्हणून ते डाग रजिस्टरचा उल्लेख करतात. आता वर त्या पत्रातील उल्लेख आहे. ते पत्र सांगते की विषप्रयोग हा सोयराबाई यांनी केला. अर्थात हा तपशील सुद्धा चूकच आहे. कारण एक तर ही बातमी गोवळकोंडा येथून आली होती त्यामुळे तिची विश्वासार्हता किती असेल याबद्दल शंकाच आहे आणि दुसरे म्हणजे इतर कोणतीही साधने विष पाजल्याचा उल्लेख करत नाहीत. उलट ते हेच सांगतात की राजांनी मृत्यूशय्येवर असताना जाणत्या लोकांना बोलावून घेतले आणि चार उपदेशाचे शब्द सांगितले. यासाठी संदर्भ म्हणून सभासद बखर,चिटणीस बखर,९१ कलमी बखर व भोसले घराण्याची बखर इत्यादी पाहू शकता.

३.   तिसरा आरोप असा केला जातो की विषप्रयोग केला म्हणून संभाजी राजांनी अष्टप्रधान मंडळातील काही लोकांना जीवे मारण्याची शिक्षा दिली. या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे की संभाजी राजांनी जानेवारी १६८० मध्ये स्वतःस राज्याभिषेक करून घेतला. यावेळी अष्टप्रधानात त्यांनी जुन्या सर्व लोकांना जागा दिली होती. पुढे अण्णाजी दत्तो आणि काही लोकांनी पुन्हा संभाजी राजांविरुद्ध कट केला म्हणून त्यांना मृत्युदंड सुनावला. त्यामुळे जर शिवाजी राजांना विषप्रयोग झाला असता तर राजांचा मृत्यू झाल्यानंतर संभाजी राजांनी या सर्वांना देहदंड लगेचच का नाही सुनावला आणि त्यावर कडी म्हणजे अष्टप्रधान मंडळात पुन्हा सर्वांना का जागा दिली हा प्रश्न पुढे उभा राहतोच.

४.  भोसले बखर तसेच सभासद बखर यांमध्ये तर यादीच आहे की राजांच्या अंत्यसमयी कोण कोण उपस्थित होते अशी. ती वाचल्यावर दिसून येते की मोरोपंत, हंबीरराव मोहिते, अण्णाजीपंत दत्तो हे सर्व जण रायगडाच्या बाहेर होते. मृत्यूची वार्ता समजल्यानंतर ते रायगडी आले. अष्टप्रधान मंडळात ही तीन महत्वाची माणसे होती तीच अंतसमयी किल्ल्याच्या बाहेर स्वारीवर होती. त्यामुळे कट झाला असल्यास कधी झाला आणि कुणी केला हा एक प्रश्न पुढे उभा राहतो.

५.सभासदाने ही बखर राजाराम महाराजांच्या सांगण्यावरून लिहिली असा उल्लेख तो करतो. आता महाराजांचे जेव्हा निधन पावले तेव्हा राजाराम महाराज रायगडावरच होते त्यामुळे सभासदाने लिहिलेले जर चूक असते तर मग राजाराम महाराजांनी त्याला विरोध नक्की केला असता.

६. याव्यतिरिक्त सुद्धा अनेक पत्रे तसेच लेखक या घटनेचा उल्लेख त्यांच्या लिखाणात करतात. मात्र विस्तार भयास्तव ती सर्व साधने इथे देणे शक्य नाही परंतु जे जिज्ञासू आहेत त्यांनी ‘History of Sevagi and his successor, recent Conquerors in India by Father Pierre Joseph d'Orleans’, शिवकालीन पत्रसारसंग्रह खंड-२ मधील वर उल्लेख केलेली पत्रे, चिटणीस बखर, तारीखे शिवाजी, मराठी साम्राज्याची छोटी बखर, इत्यादी ऐतिहासिक पुरावे वाचूनच निष्कर्ष काढावा.

७.   छत्रपती शिवाजी राजांचा मूत्यू ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे हे खरी आणि अशा घटनेवरून राजकारण केले जात आहे ही हे तर अतिशय धक्कादायक आहे. वर नमूद केलेल्या सर्व साधनांचा आणि पुराव्यांचा विचार करता हेच कळून येते की राजांचा मृत्यू हा अति थकव्यामुळे आजार होऊन झाला होता. त्यामुळे सोयराबाई यांनी विषप्रयोग केला किंवा अष्टप्रधान मंडळातील लोकांनी त्यांना मारले या बाजारगप्पांना काही अर्थ उरत नाही हेच खरे.
बहुत काय लिहिणे, आपण सुज्ञ आहात त्यामुळे आपण पुरावे वाचून निष्कर्ष काढाल असे वाटते.

📖. संदर्भ साधने-

१.       एक्याण्णव कलमी बखर-वि.स.वाकसकर
२.       सभासद बखर- कृष्णाजी अनंत सभासद
३.       मराठी दप्तर,रूमाल पहिला(श्रीमंत महाराज भोसले यांची बखर)-वि.ल.भावे
४.       जेधे शकावली
५.       शिवकालीन पत्रसारसंग्रह
६.       English records on Shivaji
७.       History of Aurangzeb (vol. IV, southern India 1645-1689) -Sir Jadunath Sarkar
८.       History of the Marathas-Grant Duff (मराठी अनुवाद- कॅ.डेव्हीड केपन साहेब)
९.       Storia Do Mogor or Mogul India-Niccolao Manucci
१०.    मासिरे आलमगिरी – साकी मुस्तैदखान

शंतनू  पराजंपे

गुरुवार, ऑक्टोबर १५, २०२०

छ. शिवाजी महाराज शाकाहारी होते की मांसाहारी होते ?

छ. शिवाजी महाराज शाकाहारी होते की मांसाहारी होते ?

छ. शिवाजी महाराज शाकाहारी होते की मांसाहारी होते ?

________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
________________________
छ. शिवाजी महाराज शाकाहरी होते की मांसाहारी होते हा प्रश्न ब-याचजणांना पडतो. शिवाजी महाराज हे मिताहारी म्हणजेच शाकाहारी होते असा संदर्भ त्यांचे समकालीन कवी परमानंद यांच्या “श्री शिवभारत “या चरित्रात मिळतो.

आपल्या स्वराज्याच्या ध्येयाला गाठण्यासाठी अहोरात्र झटणा-या मावळ्यांनाही शाकाहार घेणे सक्तीचे होते. शिवरायंच्या गडकिल्ल्यांवर मांसाहार करण्यास प्रतिबंध होता. इतकेच नव्हे तर गडांवरील मुदपाकखान्यामध्ये मांसाहार बनवणेही निषिद्ध होते.

छ. शिवाजी महाराज शाकाहारी होते की मांसाहारी होते ?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीची नोंद आपल्याला तत्कालीन पुस्तके, प्रवासनोंदी व चरित्रांमध्ये मिळते.
इंग्रज प्रवासी आणि डॉ. जॉन फ्रायर, महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी रायगडावर उपस्थित होता. त्याने आपल्या प्रवासाचे वर्णन करून ठेवले आहे. त्यात मराठ्यांच्या खाण्याबाबतचा मजकूर आढळतो. तो लिहितो की,

"रायरी (रायगड ) वरील आमच्या मुक्कामादरम्यान घडलेला एक प्रसंग मी येथे सांगू इच्छितो . इथल्या लोकांचे जेवण अत्यंत साधे आहे आणि ते तयार करण्यासाठी फारसा खर्च देखील येत नाही. इथल्या लोकांचा परमोच्च आवडीचा पदार्थ म्हणजे खिचडी ( फ्रायर या पदार्थाला cutchery असे म्हणतो ! ) हा खिचडी नावाचा पदार्थ तांदूळ आणि डाळ एकत्र करून , हे मिश्रण लोण्यामध्ये शिजवून तयार केला जातो. या खिचडीवरच या लोकांचे देह पोसलेले असतात. परंतु आमच्या सारख्या तिन्हीत्रिकाळ मांस खाण्याची सवय असलेल्या इंग्रजांचा फार काळ पर्यंत मराठयांची ही खिचडी खाऊन निभाव लागणे अशक्य होते , त्यामुळे आम्ही राजाला ( शिवाजी महाराजांना ) आमच्या समूहातील लोकांना पुरेल एवढे मांस रोज देण्याची विनंती केली. आमची ही विनंती मान्य करून शिवाजी महाराजांनी , गडावर थोड्याफार प्रमाणात असलेल्या मुसलमानांसाठी (फ्रायर Moors असा शब्द वापरतो . Moors म्हणजे मुसलमान ) मांस पुरवणाऱ्या खाटकाला , आम्ही गडावर असे पर्यंत आम्हालाही लागेल तेवढे बोकडाचे मांस (दुसऱ्या कोणत्याही प्राण्याचे मांस गडावर येत नसल्यामुळे ) पुरवत जावे अशी आज्ञा केली.

शिवाजी महाराजांच्या या आज्ञेप्रमाणे हा खाटीक आम्हाला रोज बोकडाचे मांस पुरवू लागला . आम्हाला प्रत्येक दिवसाला साधारण पणे अर्धा बोकड लागत असे . आमच्या या दररोजच्या मागणीमुळे या खाटकाचा धंदा फारच जोमाने चालू लागला ! त्याला या गोष्टीचे एवढे आश्चर्य वाटले की , " एवढे मटण रोज खातंय तरी कोण ? " हे पाहण्याकरता वृद्ध असलेला हा खाटीक , गड चढण्याचे कष्ट सोसून एके दिवशी आम्हाला पाहायला आला ! गेल्या काही वर्षात त्याच्याकडून इतके मांस कोणीच विकत घेतले नव्हते ! याचे कारण म्हणजे या प्रदेशातील लोक फारच कवचित मांसाहार करतात; शिवाय हिंदू लोक ( फ्रायर येथे Gentiles असा शब्द वापरतो . Gentiles याचा अर्थ यहुदी नसलेले लोक असा होतो, सामान्यपणे इतिहासामध्ये हिंदूंना हा शब्द वापरतात ) अजिबातच मांस खात नाहीत आणि मुसलमान किंवा पोर्तुगीज लोक मांस चांगल्याप्रकारे उकडल्याशिवाय किंवा शिजवल्याशिवाय खात नाहीत . आपल्याप्रमाणे ( इंग्रजांप्रमाणे ) मांस फक्त भाजून असे क्वचितच कोणी खात असेल ! पण मला असे वाटते की मांस खाण्याची आपली ही पद्धत चुकीची आहे. खास करून या उष्ण देशामध्ये मांस नीट शिजवून खाल्ल्यास त्याचा पोटाला त्रास होणार नाही , परंतु आपला स्वभाव सतत धावपळ करण्याचा असल्यामुळे , आपण हे मांस शिजवण्याबीजावण्याच्या भानगडीत पडत नाही . पण माझ्या मते आपली पोटं बिघडण्यामागचे हेच कारण असावे हे अनुभवी लोकांच्या लक्षात येईल !"
यावरून आपल्याला असे वाटू शकेल की मराठे/शिवाजी महाराज अजिबात मांसाहार करत नव्हते. पण तसे वाटणे चुकीचे ठरेल. हिंदू सुद्धा थोड्याप्रमाणात मांसाहार करत होते परंतु युरोपिअन लोकांच्या मांसाहार करण्याच्या तुलनेत ते नगण्य होते.मांसाहार हा क्षत्रियांचा आहार आहे. अर्थात महाराज आई भवानीचे भक्त होते,आणि देवीला बोकडाचा नैवेद्य लागतो. म्हणून छत्रपती शिवराय व संभाजी महाराज हे देखील मांसाहार करत असावेत ? असे वाटते.
दुसरा मतप्रवाह पाहु:
राज्याभिषेकाच्या १५ दिवस पूर्वी महाराज्यांनी हा संपूर्ण सोहळा लेखीस्वरूपात मांडावा म्हणून दोन इंग्रज अधिकाऱ्यांना रायगडावर बोलावून घेतले त्याची नावे थॉमस निकोलस आणि हेन्री ऑक्सिनेंन. ज्यावेळी ह्या दोन्ही अधिकाऱ्यांना मांसाहार करायची इच्छा व्हायची तेंव्हा गडाच्या पायथ्यावरुन तो मांसाहार शिजवून आणला जायचा.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,गडावर कधीही कोणी मांसाहार करत नसे इतकेच नव्हे तर गडावर तो शिजवलाही जात नसत अशी नोंद आहे.छत्रपती शिवाजी महाराज हयात असताना कवी परमानंद यांनी ‘श्री शिवभारत’ हे समकालीन चारित्र लिहलं. ह्या चरित्रात कवी परमानंदाने असं लिहलंय कि शिवाजी महाराज हे “मितआहारी” आहेत.मित म्हणजे कमी व आहारी म्हणजे खाणारे . त्यामुळे शिवाजी महाराज हे शाकाहारी होते हे सिद्ध होते.इतकेच नव्हे तर शिवाजी महाराज्यांचे गुरु संत तुकाराम महाराज यांनी शिवाजी महाराज्यांच्या मावळ्यांना प्रेरणा म्हणून ज्या ओव्या आणि अभंग रचले त्यातही असा उल्लेख आहे कि मावळ्यांनी निर्व्यसनी आणि शाकाहारी असायला हवे.
आणखी एक पुरावा पाहु:
बूधभूषणम् ह्या छत्रपती संभाजी महाराजांनी रचलेल्या ग्रंथाच्या तिसऱ्या प्रकरणातील ४१ वा श्लोक यासंदर्भात आहे. यात शंभुराजे म्हणतात –

द्युतं च मांसं च सुरां च वेश्या पापर्दभिचौर्यं परदारसेवा ।
एतानि सप्तं व्यसनानि सप्तं नरं सुघोरं नरकं नयन्ति ।।

अर्थात – जुगार खेळणे, मांस भक्षण करणे, मद्यपान करणे, वेश्यागमन करणे, भ्रष्ट मार्गाने संपत्ती गोळा करणे, चोरी करणे आणि परस्त्रीची सेवा करणे (तिच्याशी संबंध ठेवणे) ही नरकात नेणारी सात दारे आहेत. ह्या श्लोकात छत्रपती संभाजी महाराजांनी स्पष्टपणे मांसाहार करणे हे नरकाचे द्वार असल्याचे म्हटले आहे. मग असे असताना छत्रपती मांसाहार करत होते, असे मानणे धाडसाचे वाटते.
एकुण काय तर ,हिंदू धर्मामध्ये सर्वांनाच कायमस्वरूपी शाकाहाराचे बंधन नाही. ब्राह्मण सोडता अन्य वर्णांना मांसाहाराची मुभा आहे. फक्त काही विशिष्ट दिवसांमध्ये किंवा देवकार्यामध्ये मांसाहार केला जात नाही. महाराज क्षत्रिय होते. दुष्ट, अन्यायी आणि परकीय लोकांविरुद्ध लढणे हे क्षत्रियाचे कर्तव्य आहे. त्यामुळे बलोपासना हे क्षत्रियांच्या कर्माचे एक अंग आहे - त्यामुळे ते कायमस्वरूपी शाकाहारी असण्याचे काहीच कारण नाही.