नागपूर : जिल्हा क्षयमुक्त करण्यासाठी सर्वस्तरातून खाजगी वैद्यकीय व्यावसायिक, खाजगी केमिस्ट व ड्रगिस्ट, खाजगी पॅथलॉजी लॅब, खाजगी एक्सरे सेंटर, क्षयरुग्ण यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवून राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमास सहकार्य अपेक्षित आहे. त्याचबरोबर सर्व शासकीय योजनांचा लाभ देवून नागरिकांच्या सहकार्यातून जिल्हा क्षयमुक्त करु या. यासाठी आरोग्य यंत्रणेस सहकार्य करण्याचे आवाहन आरोग्य सेवेचे उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल यांनी केले.
जागतिक क्षयरोग दिनाचा कार्यक्रम 31 मार्च पर्यंत साजरा करण्यात येत आहे. या दिनानिमित्त 24 मार्च ते 13 एप्रिल असे 21 दिवसांच्या कालावधीत ‘क्षयरोग मुक्त भारत अभियान’ राबविण्यात येत आहे. हा अभियान सर्व उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील आरोग्य वर्धिनी केंद्र व नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रस्तरावर राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील जोखिमेच्या क्षेत्राकरीता तयार केलेल्या कृती आराखडयाद्वारे आरोग्या कर्मचारी, आशा स्वयंसेविका, क्षेत्रीय स्तरावरील आरोग्य कर्मचारी यांनी दररोज आपल्या क्षेत्रातील क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना शोधणे, त्यांची थुंकी नमुने तपासणी, एक्स-रे तपासणी आवश्यकतेनुसार सीबीनेट तपासणी व इतर तपासणी करुन क्षयरोगाचे निदान करणे व क्षयरोग औषधोपचारावर आणणे आदी सेवा अभियानात देण्यात येणार आहे.
सार्वजनिक आरोग्य संस्थेचे संचालक डॉ. नवाडे, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य गोगुलवार, एसटीडिसीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय डोईफोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधूरी थोरात, कुष्ठरोग विभागाचे संचालक डॉ. मडके, जागतिक आरोग्य सल्लागार डॉ. स्वर्णा रामटेके, जिल्हा क्षयरोग अधिकारी ममता सोनसरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा बांगर आदी यावेळी उपस्थित होते.
या अभियानाच्या यशस्वीतेसाठी शंभर टक्के क्षयरोगाची जनजागृती करणे आवश्यक असून निदान, उपचाराची खात्री, क्षयरुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना मानसिक आधार देणे अत्यंत आवश्यक असल्याचे डॉ. जायस्वाल यांनी सांगितले.
एखाद्या व्यक्तीस दोन आठवडे होऊन अधिक कालावधीसाठी खोकला, ताप असणे व वजनात लक्षणीय घट, भूक न लागणे, मानेवर गाठ येणे यापैकी कोणतेही लक्षण असल्यास हा संशयित रुग्ण समजावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी थोरात यांच्या द्वारे करण्यात आले.
पॅथॉलाजी, मायक्रोबायोलॉजी, प्रयोगशाळा, रेडिओलॉजी. सर्व खाजगी केमिस्ट, ड्रगिस्ट यांनी क्षयरुग्णांची नोंदणी करणे आवश्यक असल्याचे सांगून असे न केल्यास कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे क्षयरोग अधिकारी यांनी सांगितले.
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत नागपूर जिल्हा क्षयरोग केंद्र (ग्रामीण) ला राज्यस्तरावरुन उतकृष्ट कार्यासाठी दुसरा क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील, सहसंचालक डॉ. राम आडकेकर व राष्ट्रीय अधिकारी डॉ. किरण राडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमास नियमित सहकार्य करण्यासाठी सहआयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग व अध्यक्ष व सचिव जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोशिएशन यांना प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.
00000