Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मार्च २६, २०२२

नवेगावबांध आता झाले पुस्तकाचे गाव.योजनेत नागपूर विभागातून निवड.



संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.२६ मार्च:-
येथील सुप्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान, नवेगाव नागझिरा व्याघ्र संरक्षण प्रकल्प या नावाने राज्य, देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती प्राप्त गाव नवेगावबांध आता पुस्तकाचे गाव म्हणून ओळखला जाणार आहे. राज्य शासनाच्या पुस्तकाचे गाव या योजनेत यांचा समावेश करण्यात आला आहे. आज दिनांक २५ मार्चला पुस्तकाचे गाव योजनेत समाविष्ट करण्यात आल्याचा शासन निर्णय क्रमांक पुगांव-२०२२/प्र.क्र.२३/भाषा-३ मंत्रालय मुंबई ३२ दिनांक २५ मार्च २०२२ नुसार,आज दिनांक २५ मार्च ला राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाने काढला आहे. पुस्तकाचे गाव या योजनेत गावाचा समावेश झाल्याची वार्ता नवेगावबांध येथे कळल्याबरोबर ग्रामवासियांनी आनंद व्यक्त केला आहे.

वाचन चळवळ वाढावी, मराठी भाषेतील नवे-जुने लेखक, संत साहित्य, कथा, कादंबरी, कविता, ललित, चरित्र-आत्मचरित्र, स्त्री साहित्य, क्रीडा, बालसाहित्य यांच्या फुललेल्या बहारदार विश्वात वाचन आनंद घ्यावा. यासाठी महाराष्ट्र शासनाने हा प्रकल्प राबवला आहे. राज्यातील सुप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर येथून, जवळच असलेले भिलार गाव पुस्तकाचे गाव म्हणून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे.
याच आगळ्यावेगळ्या उपक्रमाचा विस्तार पुस्तकाचे गाव या योजनेत केला जात आहे.
पुस्तकाचे गाव या योजनेची व्यापकता वाढविण्याच्या दृष्टीने तसेच राज्याचे मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने, प्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तकाचे गाव सुरु करून योजने चा विस्तार करणेबाबत चा निर्णय ४ जानेवारी ला शासन निर्णयानुसार घेण्यात आला आहे. सदर निर्णयानुसार राज्यातील पुस्तकांचे गाव ही योजना विस्तारित स्वरूपात सुरू करताना, सहा महसूल विभागात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने आज दिनांक २५ मार्च रोज गुरुवारला आदेशित केले आहे. संचालक राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेले प्रस्ताव मराठी भाषा विभाग मंत्री यांच्या अध्यक्षतेखालील समिती समोर ठेवण्यात आले होते. सदर समितीच्या निर्णयानुसार सहा महसूल विभागातील गावांना पुस्तकाचे गाव या योजनेची मंजुरी देण्यात आली आहे.
त्यात नागपूर विभागातून गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध ची निवड करण्यात आली आहे. पुस्तकाचे गाव या योजनेचा विस्तार सहा महसूल विभागाततील गावात करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. समितीने घेतलेल्या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात नागपूर विभागातून गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गावाची निवड करण्यात आली आहे. संयुक्त वन व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, नवेगावबांध फाउंडेशन नवेगावबांध या संस्थान द्वारा ही योजना गावात राबविण्यात येणार आहे. याबरोबरच औरंगाबाद विभागातून औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील वेरूळ कोकण विभागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पोंभुर्ले, पुणे विभागातून सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील अंकलखोप(औदुंबर) या गावात पुस्तकाचे गाव ही योजना राबविण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.

येथील नवेगावबांध फाउंडेशन, ग्रामपंचायत, संयुक्त वनव्यवस्थापन समिती नवेगावबांध यांना संयुक्तरीत्या ही योजना राबवायाची आहे.याकरिता मागील  महिन्यात संचालक राज्य मराठी विकास संस्था मुंबई विभागामार्फत प्रतिनिधी नवेगावबांध येथे आले होते.व नवेगाव बांध फाउंडेशनच्या सहकार्याने सदर नवेगाव बांध येथील पर्यटन स्थळाची पाहणी करून हे ठिकाणी उपयुक्त असल्याचे नमूद करून तसा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला. आज त्याला मान्यता देण्यात आली. याकरिता प्रा. डॉ. प्रमोद मुनघाटे, प्रा. डॉ. शरद मेश्राम, सरपंच अनिरुद्ध शहारे, ठाणेदार जनार्दन हेगडकर, नवेगावबांध फाऊंडेशनचे सचिव रामदास बोरकर, अध्यक्ष विजय डोये, संजीव बडोले, एकनाथ बोरकर, सुनील तरोणे ,किशोर शंभरकर यांचे सहकार्य लाभले. नवेगावबांध येथे पुस्तकाचे गाव योजनेत समावेश झाल्याने नवेगाव बांध येथील पर्यटनाला येणाऱ्या पर्यटकांना विविध पुस्तके वाचण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच गावकरी, विद्यार्थी व युवकांना देखील विविध विषयांवरील पुस्तके वाचण्याचा आनंद द्विगुणित होईल. पुस्तकाचे गाव योजनेत नवेगावबांधचा समावेश झाल्याने गावात आनंद व्यक्त केल्या जात आहे.

कोट
गावाचा राज्य शासनाच्या वतीने पुस्तकाचे गाव या योजनेत समावेश केला आहे. ही गावासाठी अभिमानाची बाब आहे. याचा आनंद माझ्या बरोबर सर्व गावाला झाला आहे. राष्ट्रीय उद्यान, व्याघ्र संरक्षण प्रकल्प या साठी प्रसिद्ध असलेले माझे गाव, आता पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाणार आहे. गावात मराठी भाषेचा विकास, लोकात वाचनाची आवड, तसेच वाचन संस्कृती ला चालना मिळेल. गावकरी, विद्यार्थी, पर्यटक व युवकांना याचा लाभ होईल.

- अनिरुद्ध शहारे, 
सरपंच,ग्रामपंचायत नवेगावबांध.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.