काळाची चक्रे अतिशय वेगाने फिरतात. काही घटना अशा घडतात की जणू कालच घडल्यात . रामदासजी रायपुरे आमच्यातून निघून गेल्याला एक वर्ष उलटत आहे. पण त्यांच्या स्मृती एवढ्या ताज्या आहेत की जणू कालचीच घटना असावी. गेल्यावर्षी१५ जानेवारीला रामदास रायपुरे यांचे निधन झाले. त्या अनुषंगाने त्यांच्या आठवणी जाग्या झाल्या .
रामदास रायपुरे यांच्या कार्याचा मानबिंदू
रामदास रायपुरे काका यांचा जन्म १६ ऑगष्ट १९३१ चा. एका सधन शेतकरी कुटुंबांत जन्मलेले रामदास रायपुरे सर्व जिवनावश्यक बाबींची पूर्तता झाल्याने निडर स्वभावाचे होते . पुरेसे शैक्षणिक पाठबळ मिळाले की माणूस निडर बनतोच . त्या काळात रामदास रायपुरे यांनी नागपुरातील मॉरिस कॉलेज मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले . सुदैवाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा झंझावात चहुबाजुंनी वाहत असतांना दलित समाजात त्यावेळी एक वेगळेच आत्मभान आले होते . नवचैतन्य निर्माण झाले होते . चंद्रपूर जिल्ह्यातही बाबासाहेबांची चळवळ जोर धरत होती . त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी चळवळीत भाग घेतला. रामदास रायपुरे यांनीही चळवळीत उडी घेतली." शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे, ते प्राशन केल्यावर कोणताही मणुष्य गुरगुरल्या शिवाय राहणार नाही ." हे डॉ. आंबेडकरांचे विचार आहेत. दलित ' मागास समाजात शिक्षण म्हणजे जिवनाला मिळालेले मोठे टॉनिक होते . अनेकांनी ते प्राशन केले अन् त्यातून नवनवे समाजनेतृत्व उभे झाले. रामदास रायपुरे यांनीही शिक्षणाचा आपल्या समाजाला फायदा करता यावा म्हणून चळवळीत उतरले. आरंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिपब्लिकन पक्षात त्यांनी कार्य केले. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा त्यांना सहवास लाभला होता. मात्र केवळ सामाजिक , राजकीय चळवळ पूरे नाही. शासन प्रशासनाने या चळवळीची दखल घेतली पाहिजे असे त्यांना वाटत असे म्हणून त्यांनीं पत्रकारितेच्या क्षेत्रात उडी घेण्याचे ठरवले. १९७१ साली वर्तमानपत्र काढले. सुरवातीला साप्ताहिक म्हणून सुरु झालेले हे पत्र लवकरच दैनिकात रूपांतरित झाले. तेच वृतपत्र दै चंद्रपूर समाचार आज एका वटवृक्षात परिवर्तित झाले आहे. . अर्थात वृतपत्र काढणे आज सोपे असले तरी त्यावेळी नव्हते. त्यातही ते निरंतर चालवत ठेवणे महाकठीण काम . मात्र रामदास रायपुरे , चंद्रपूर गडचिरोली सारख्या झाडीपट्टीच्या दलित आदिवासी बहुल लोकसंख्येच्या भागात वृतपत्र चालवणे किती जिकरीचे काम आहे हे जाणून होते . वृतपत्र चालवतांना घरादारावर तुळशीपत्र ठेवावी लागते. आर्थिक दिवाळखोरी , मानसिक खच्चीकरण हे वृत्तपत्राचे आऊटपूट असायचे . नफा नावाची गोष्टच नाही . मात्र यातून मिळायचे ते फक्त समाधान ! मुक्या बहिर्या ,दलित ,आदिवासी ,कष्टकरी, शेतकरी ,मोलमजूर यांच्या जिवनात असलेला अंधःकार , प्रश्न , अडचणी केवळ वृतपत्रातूनच मांडता येऊ शकतात , हे तेंव्हाही सत्य होते आणि आजही आहे . मात्र या वंचित घटकाच्या प्रश्नांची दखल घेणार कोण ? प्रस्थापित वृतपत्रे होती मात्र ज्या वर्गाच्या जगण्याचा हक्कच कुणी माणायला तयार नाही त्यांच्या प्रश्नाकडे कोणी ढुंकूनही पाहत नव्हते . अशातच राज्याचे तत्कालीन मुखमंत्री मा. सां . कन्नमवार यांच्या सहकार्य वजा पाठिब्यांतून दै. चंद्रपूर समाचार उदयास आले . यामुळे रामदास रायपुरे यांन आपले विचार समाजापुढे मांडता आले. .शोषित ' वंचितांच्या समस्या वर्तमान पत्रातून पुढे आणता आल्या . त्यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी माडिया समाजातील महिला शोषणाच्या प्रचंड शिकार असत . तेथे नोकरी उदयोग धंद्यासाठी जाणारे पांढरपेशे लोक या कुमारीकांचा गैरफायदा घेत असत. त्यांचेवर बळजबरीने मातृत्व लादून पळ काढत . या समस्येवर चंद्रपूर समाचार मध्ये सातत्याने लेखन करून हा प्रश्न राज्य विधिमंडळात उपस्थित करण्यास भाग पाडले.
राजकारण ही सर्व समस्यांची गुरुकिल्ली असते, हे रामदास रायपुरे बऱ्यापैकी समजून होते . डॉ. आंबेडकरांनी निर्माण केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ते सक्रिय कार्यकर्ते होते . या काळात वर्तमानपत्र चालवून रामदास रायपुरे थांबले नाहीत. तर चंद्रपूर शहरातील राजकारणात प्रवेश केला . ते चंदपूर नगरपालिकेचे उपाध्यक्ष झाले . शहरातील विविध नागरी समस्या सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला.त्यांचा जनसंपर्क फार मोठा होता . मागास समाजात त्यांचा जन्म झाला असला तरी शहरातील श्रीमंत प्रतिष्ठित घराण्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते , ते कोणत्याही जाती धर्मातील असो ! आजही रायपुरे कुटुंबांचे स्नेहाचे संबंध त्यांच्या पुढील पिढीने टिकवून ठेवले आहे.
रायपुरे काका यांचे राजकारणात फार काळ मन रमले नाही, कारण त्यांच खरा पिंड समाजकारणाचा होता . त्यामुळे पुढील काळात त्यांना वृतपत्रासोबतच अनेक सामाजिक उपक्रम आरंभिले . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला बौद्ध धम्मात आणून सोडले. त्यामुळे आपले, खासकरून महार जातीचे कल्याण झाले . पूर्वाश्रमीचे महार व आजचे बौद्ध केवळ धम्म स्विकारल्या मुळे उन्नत झाले स्वाभीमानी बणले. मात्र मागास वर्गातील असंख्य जाती आजही विपन्नावस्थेत जीवन जगत आहेत. त्या वर्गाने बौद्ध धम्माची कास धरावी असे रामदास रायपुरे काका याना नेहमी वाटायचे . माझ्याजवळ याबाबत त्यांनी अनेकदा चर्चा विनिमय केला होता . याच विचारातून आपण बौद्ध धम्म कार्यात काही तरी ठोस करावे या भावनेतून ते पुढे सरसावले .डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली भारतीय बौद्ध महासभा होती. .मात्र जिल्ह्यातच काय पूर्ण पूर्व विदर्भात मरणासन्न अवस्थेत भारतीय बौद्ध महासभा होती. रामदास रायपुरे यांनी चंद्रपूर जिल्ह्यांचे नेतृत्व आपल्या हाती घेतले. ते भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाअध्यक्ष झाले आणि धडाकेबाज कार्यक्रम घेण्यास सुरवात केली. त्यावेळी रायपुरे काका यांचे ओपन हार्ट सर्जरी नुकतेच झाले होते .तरीही बौद्ध महासभेच्या कार्याला त्यांनी अक्षरशः झोकून दिले .
वार्डा , वार्डातील बुद्धविहारात भेटी दिल्या. स्वतःची मारुती ओमनी कार सोबत देऊन मी आणि दिवंगत मोहन रायपुरे शहरातील विविध विहारात जावून डॉ. आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे आम्ही वाचन करत असू . उपस्थित धम्म उपासक उपासिकांना धम्म समजावून सांगणे हा साधा उद्देश असला तरी आगळा वेगळा उपक्रम रायपुरे काका यानी सुरु केला होता . त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. लोक जुळू लागली .धम्माकडे आकृष्ठ होऊ लागली . पुढे चंद्रपूर शहरात भारतीय बौद्ध महासभेचे भव्य शिबीर त्यांनी आयोजित करून दाखवले. या शिबीराला भारतीय बौदध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा मीराताई आंबेडकर हजर राहिल्या होत्या .
रामदास रायपुरे यांच्या कार्याचा मानबिंदू राहिले ते चंद्रपूर ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्य. चंद्रपरात ज्येष्ठांच्या हक्काचे विचारपीठ उपलब्ध करून देण्यात रायपुरे काका यांचा सिंहाचा वाटा . आज येथील मध्यवर्ती भागात असलेले ज्येष्ठ नागरिक भवन रायपुरे काकांच्या कामाची मोठी पावती आहे म्हटले तर कोणीही ही बाब नाकारू शकत नाही . ज्येष्ठ नागरिक संघासाठी परिसरात जागा मिळाली होती पण पुढे काय? रायपुरे काका यानी चंदपूर जिल्हा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्षपद स्विकारल्या नंतर अक्षरशः पायाला भिंगरी लावल्या प्रमाणे लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. सदस्य संख्या वाढवली . सदस्यांना क्रियाशिल बणवले. राजकारणी लोकांच्या भेटी घेतल्या .
प्रशासनातील अधिकाऱ्यांना भेटले . ज्येष्ठांच्या अस्तित्वाचा प्रश्न समोर ठेवला . आपले अधिकार मागितले. आमदार खासदार यांना भेटले. फंड गोळा केला. अनेक कार्यक्रम घेतले. मी स्वतः अनेक कार्यक्रमात हजर होतो . जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघासाठी रायपुरे कांकांनी खूप मेहणत घेतली. आज रामनगर रेव्हून्यू कॉलनी परिसरात ज्येष्ठ नागरिक संघाची टूमदार इमारत व परिसरात बसलेले ज्येष्ठ नागरिक असे वातावरण पाहून रायपुरे काका सदैव स्मरणात राहतात .
एवढयावरच न थांबता रामदास रायपुरे काका यांनी पत्रकारांच्या प्रश्नासाठी प्रशासनाशी, राज्यकत्याशी दोन हात केले .शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न देखील गंभीर होता. या प्रश्नावरून प्रशासनाला जागे करून शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न सोडवला . वृक्षारोपण हा त्यांचा आणखी एक आवडीचा कार्यकम . शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण आयोजित केले. किंवा हजर राहिले. येथील शांतीधाम स्मशानघाटावर जी झाडे दिसतात ,त्यात रायपुरे काका यांनी स्व . .यशोधरा देवी बजाज यांच्या वाढदिवसानिमित घेतलेलय मोठ्या वृक्षारोपण कार्यक्रमातील अनेक झाडे साक्ष देतील.
रामदास रायपुरे गेल्यावर्सी वयाच्या ९१ व्या वर्षी इहलोक सोडून आपल्यातून गेले. मात्र आपल्या कार्याचा मोठा झंझावात त्यांनी लोकांच्या मनात कायम ठेवला . आजच्या स्मृतीदिनी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !
नाना चालखुरे