Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, नोव्हेंबर ०८, २०२१

आदिवासींचा संघर्ष ' जय भीम '

 आदिवासींचा संघर्ष ' जय भीम ' 

 जातीयतेची देण झोपडी व गरिबी. ती हमखास जाती, जमातींच्या नशीबी. पाठोपाठ  शोषण, अत्याचार येते. हे देशभरातील  उघड सत्य. यावर टॉलीवूडने चित्रपट काढला. हा प्रसंग 1993 मध्ये घडला. ते स्थळ तामीळनाडू . पेरूमल आदिवासी जमात. शेती नाही. संपत्ती नाही. शिकार हेच उपजीविकेचे साधन. त्या चित्रपटातील एक संवाद मेंदूला झणझणी आणतो.  आजादी को पच्चास साल हुये. फिरभी खूद की  पहिचान नही. ओळख सिध्द करण्याचे साधे कागद नाही. 2021 मध्ये सुध्दा आदिवासी जमातींतील लोकांची तिच अवस्था. या संवादातून व्यवस्थेवर सशक्त प्रहार आहे.  तामीळनाडूतील आदिवासी जमात. तिची आजीविका दाखवित. जय भीम चित्रपटाचे कथानक पुढे सरकते. तामीळ, तेलगू भाषेत आला. दोन नोव्हेंबरला हिंदीतून ओटीटी प्लेटफार्मवर प्रदर्शित झाला. अन् देशभर हिट झाला. त्या घटनेशी मिळत्या-जुळत्या अनेक घटना असतील. अशीच एक घटना आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कामतगुड्यातही.. ! 


आदिवासींचा आंबेडकरी लढा

 या चित्रपटात सामाजिक जाण आणि भान दिसते. कथानकाची नेहमीची चाकोरी नाही. आदिवासीं जमातींना आंबेडकरवादासोबत सशक्तपणे जोडले. दक्षिणेतील अनेक चित्रपटात आंबेडकरांचा विचार प्रभावीपणे मांडला जातो. हे अनेकदा दिसते. काला, कबाली , पेरिपेरम पेरूमल, कर्नन ही त्यांची उदाहरणं. जय भीम  चित्रपटानं त्या सर्वांवर मात केली. दृष्य अतिशय बोलके आहेत. दृष्यातून जातीय मानसिकतेवर प्रहार आहे. तसेच एक दृष्य. कारागृहाच्या बाहेर दिसते. कैद्यांची सुटका होते. जेलर प्रत्येक कैद्यांला जात विचारतो. जातीनिहाय दोन रांगा लावतो. एका रांगेत उच्चवर्णिय असतात. त्यांना लगेच सोडले जाते. दुसऱ्या रांगेत निम्न जातीतील असतात. त्यांना घेण्यास विविध ठाण्यातून पोलिस अधिकाऱ्यांच्या गाड्या येतात. ते त्यांना घेवून परत ठाण्यात जातात. पेंडींग असलेली प्रकरणं काढतात. त्यात त्यांना आरोपी बनविले जाते. एकेकाला दोन-तीन गुन्ह्यात आरोपी केलं जातं. हे करताना एकावर एकच गुन्हा लावा असं कुठं आहे.असा एक अधिकारी म्हणतो. अशा मानसिकतेवर प्रकाश टाकला जातो


अमानवी अत्याचार

गुन्हा सिध्द करण्यास तपासाची खानापूर्ती केली जाते. घरांची झडती. कुटूंबातील महिला,बालकांना अमाणूस मारहाण. गुन्हा कबूल करण्यास भाग पाडले जाते. तेव्हा पोलिस अत्याचाराने रक्तबंबाळ झालेला आदिवासी युवक उदगारतो. जो गुन्हा नही किया. उसकी कबुली कैसी देगें सर ! हे भावनिक उदगार प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतात. प्रेक्षक मनात पुटपुटतो. बेरहम पोलिस. प्रेक्षकांवर कधीतरी ठाण्यात कमीअधिक प्रसंग ओढावला असतो. अशा प्रेक्षकांच्या अंगावर शहारे येतात. काटे उभे राहतात.तो त्यात तल्लिन झालेला असतो. चित्रपटातील दृश्य आणि संवाद प्रभाव करतात. आता पुढे काय ही उत्सुकता शिंगेला पोहचते. 


उच्चभ्रूकडे  चाेरी

एक प्रकरण  उच्चभ्रूकडील चोरीचे असते. त्याच्याकडे एकदा  साप निघतो. त्याचा नोकर साप पकडणाऱ्या राजूकनूला बोलावण्यास जातो. त्याला मोपेडवर बसवतो. तेव्हा तोल सांभाळताना राजकनूचा नोकराच्या खाद्यांवर हात पडतो. त्या बरोबर नोकर चिडून मागे वळून बघतो. त्याच्या बोचऱ्या नजरेने तो चरकतो. लगेच हात बाजूला करतो. यातून  शतकानुशतके चालत आलेला उच्चनिच  भेदभाव दाखविला गेला.तो साप पकडतो. त्यांच्या सोबत कानातील सोन्याचा झुबका मिळतो.   तो ते इमानदारीने परत करतो. यातून त्या समाजाची प्रामाणिकता दाखविली जाते. पुढे त्याच उच्चभ्रूकडे दागिन्यांची चोरी होते. चोर स्वकीय असतात. पोलिसवाले त्याचा आळ आदिवासी राजकनूवर थोपतात. तिथे पोलिसांची इंट्री होते.अमानवी अत्याचार केला जातो. महिला, मुलांनाही सोडले जात नाही. हा अत्याचार बघतांना प्रेक्षकही संतापतो. व्यवस्थेवर चिडतो. तो स्तब्ध होतो. कथानक पुढे सरकत जाते. पोलिस लॉकअपमधून एक जण बेपत्ता होतो. बहुधा पोलिसी अत्याचाराचा बळी ठरला असावा असा निष्कर्ष काढला जातो.  पतीच्या शोधात गरोदर संगिनीचा संघर्ष आहे.हलाखीच्या स्थितीतही स्वाभिमानाने वावरते.यातून आदिवासींचा स्वाभिमान दाखविला. पतीच्या शोधात  भटकत असते. तिथे वकिलाच्या स्वरुपात हिरो दाखल होतो. या भूमिकेत सुपरस्टार सूर्या असतो. त्याचे बहुतेक सर्वच चित्रपट हिट झाले आहेत. चंद्रुच्या भूमिकेत सूर्याचा सशक्त अभिनय प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. त्याच्या घरात पेरियर , आंबेडकर, मार्क्स यांचे छायाचित्र दिसतात. तो मानवाधिकाराचे खटले लढविणारा वकिल.  न्याय, समता, संविधान , कायद्यांची भाषा करतो. आंबेडकरी विचाराने प्रभावित होतो.  कायद्याची लढाई लढताना व्यवस्थेच्या विरोधात रस्त्यावर उतरतो. आंदोलन करतो. धरणे देतो. त्याला लोकांची साथ मिळते. तसतसा कथानक रंगू लागतो. 


आंबेडकरी मार्ग...!

वकिल म्हणतो. गणतंत्र वाचविण्यास तानाशाही नको. कानूनही मेरा हथियार है. ' लॉ इंज वेरी पॉवरफुल वेपन '  हे उदगार ..! हा लढा नक्षलवादाकडे न नेता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराकडे नेते.  तिथे हिंसेला थारा नाही. कायदा आणि संविधानाचे महत्त्व सांगणारा हा जयभीम चित्रपट आहे. यातून राष्ट्रीय संदेश दिला जातो. सामान्य आदिवासींना कायद्यांचे महत्व पटवून दिले जाते.वकिल जेव्हा तणावात असतो. दडपणात दिसतो. तेव्हा उदगारतो. कानून अंधा है. वो गुंगा भी हो गया तो मुश्कील हो जायगी...! या उदगारातून  तो न्याय व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करतो.  न्याय न्याय असावा. तो प्रभावित होऊ नये. ही  त्याची पोटतिडक दिसते. 


पोलिसातही प्रामाणिक....

 न्यायालयातील युक्तीवादानंतर  वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यामार्फत चौकशी केली जाते. तिथे प्रकाश राज या गाजलेल्या कलाकाराचा खऱ्या अर्थाने 'डी.जी.' च्या रूपात प्रवेश होतो. पोलिस खात्याची  प्रतिमा मलीन दिसते. त्यासोबतच चांगले, प्रामाणिक अधिकारी आहेत असेही चित्र उभे केले जाते. त्या डीजीला वकील व सामाजिक कार्यकर्ते पिडितांच्या एका बैठकीत  निमंत्रित करतात. तिथे आदिवासी तरूण,वृध्द, महिला आपबिती सांगतात. अत्याचाराचे पाढे वाचतात. पुरूष मंडळींना कसे नेले. ते सांगतात. त्यात एक बारा-चौदा वर्ष वयाचा मुलगा त्यांच्या वडिलावर गुदरलेला प्रसंग सांगतो. तेव्हापासून त्याच्यासोबत असणारी पोलिसी वागणूक कथन करतो.   ह्रदयद्रावक प्रसंग ऐकताना डीजीचं ऊर भरून येतं. तो स्वत:ला रोखू शकत नाही. डोळ्यातून अश्रू टपकतात. तेव्हा तो स्टेजवरून उठून बाजुला जातो. अश्रू पुसतो. कसा तरी  सावरतो. हा भावनिक प्रसंग अतिशय ताकदीने मांडण्यात आला. हे दृश्य प्रेक्षकांना रडविते. भावनिक करते. असे अनेक प्रसंग आहेत. राजकानू याची गरोदर पत्नी पतीच्या सुटकेसाठी भटकत असते. तिची भेट चंद्रू या वकिलासोबत होते. तिथून संविधान व कायद्यांची लढाई आरंभ होते.  मद्रास हायकोर्टातील न्यायमूर्ती  के. चंद्रु हे वकिल असताना अशीच एक केस लढतात. त्या कथानकावर हे चित्रपट आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने या चित्रपटाचे महत्त्व अधिक  आहे.


हायकोर्टातील एक प्रसंग

या चित्रपटातील एक दृष्य कथानक आणखी स्पष्ट करते. हायकोर्ट असते. न्यायमूर्ती व मोजके वकिल दिसतात. बाकी खुर्च्या खाली असतात. आदिवासींचे प्रकरण नातेवाईक हजर राहण्याची शक्यताच नाही. एका आरोपीचा  वृध्द वडील ,एक समाजसेवक ,एक महिला तेवढी दिसते. निकालाच्या दरम्यान न्यायमूर्तीच्या आसनाच्या दिशेने जाताना एक आदिवासी बालक व बालिका दिसते. हे दृश्य अतिशय बोलके आहे. तत्पुर्वी सुनावणी होते. सरकारी वकिल संपाकडे लक्ष वेधत सुनावणी नसेल म्हणत न्यायमूर्तीचे लक्ष वेधतो. त्यावर न्यायमूर्ती समज देत अँड. चंद्रुला बाजू मांडण्यास सांगतात. सरकारी वकिल पोलिसांची बाजू मांडताना आरोपी सराईत चोर असल्याचे सांगत दोन गुन्ह्यांची माहिती देतो. उलट तपासणी करताना अँड.चंद्रु एफआयआर वाचण्यास सांगतो. त्यानंतर आरोपी 20 ऑक्टोंबर-1994 ला सायंकाळी 4 वाजता कडलर जेलमधून सुटतो. मग विरूध्दचलम पोलिसांनी त्याला दुपारी दोन वाजता अटक कशी केली . याकडे न्यायमूर्तीचे लक्ष वेधते.उलट तपासणीनंतर 12 जणांना जामीनावर सोडण्याचे न्यायालय आदेश देते.  त्यावर अँड. चंद्रु म्हणतात. लॉर्ड  ज्या ठाण्यात शंभरटक्के तपास झाले. त्यांना पदोन्नती मिळणार. त्यासाठी दहा दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात प्रकरणाचा तपास पुर्ण केला. त्यासाठी तामीळनाडू राज्यातील 7000  निरअपराध मुलांना जेलमध्ये डांबण्यात आले. ही कारवाई दहा दिवसात करण्यात आली. ही कारवाई करणाऱ्या सर्वांना पदोन्नती मिळणार. त्यावर सरकारी वकिल म्हणतो. पोलिसांनी काही नाही केले तर आक्षेप. काही केले तर आक्षेप. त्यावर अँड. चंद्रु सांगतो. दस दिन के मामले निपटाये गये. फिर दस साल से चल रहे मामलों का निपटारा क्यू नही ....!असा प्रश्न करून सर्वांच्या सुटकेची मागणी करतो. त्यावर न्यायमूर्तीचे उदगार असतात. मी काय. त्या सर्वांची बेल मंजूर करण्यास इंथे बसलो..! त्यावर चंद्रु म्हणतो, सात हो या सात हजार अदालत का फर्ज है. इन्साफ करना. न्यायमूर्तींना कर्तव्याची जाणीव करुन दिल्यावर न्यायमूर्ती हायकोर्टाच्या सेवानिवृत्त न्यायाधिशाची चौकशी समिती नियुक्त करतो. त्या अहवालावर  आदिवासींना दिलासा देणारा निर्णय येतो. असा अतिशय भावनाप्रधान  जय भीम चित्रपट आहे. त्यातून आंबेडकरवादाचा संदेश दिला. बालिका खुर्चीत बसून पायावर पाय ठेवून स्टॉईलने वृत्तपत्र वाचतानाचे दृष्य असते. त्यातून मुलींना शिक्षित व्हा. संघर्षासाठी तयार व्हा. संदेश दिला जाते. तेव्हा पलिकडच्या खुर्चीत निळ्या सुटाबुटात डॉ.  बाबासाहेब आंबेडकर बसले असल्याचे आभासी दृश्य दाखविले  जाते. त्या माध्यमातून शिका, संघटित व्हा. संघर्षचा नारा देण्याचे काम न बोलता या दृष्यातून साकारले.असे अनेक बोलके दृष्य. परिणामकारक संवाद आहे. त्यासाठी  चित्रपटच बघण्याची गरज आहे..


-भूपेंद्र गणवीर

..................BG....................






SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.