Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, नोव्हेंबर ११, २०२१

शिल्पकलेचं लेणं - कोप्पेश्वर मंदिर खिद्रापूर



शिल्पकलेचं लेणं - श्री  कोप्पेश्वर मंदिर खिद्रापूर


 मुर्ती आणि शिल्प संशोधन संस्था आौंरगाबाद आयोजित दि ९ नोव्हेंबर २०२१ रोजी "खिद्रापूर मंदिर" अभ्यास दौरा झाला.

शिल्पकलेचं लेणं - कोप्पेश्वर मंदिर खिद्रापूर
 क्रूष्णा नदीकाठी पहुडलेलं शांत रम्य असं खिद्रापूर गाव.या गावात कोप्पेश्वराचे शिलाहार कालीन शिल्पस्थापत्य शैलीचे मंदिर आहे.बेलूर, हळेबिडशी साम्य दर्शवणारे शिलाहार शिल्प-स्थापत्य शैलीचे दगडी मंदिर.

मंदिराची रचना विलोभनीय असुन मंदिरावर झालेल्या आक्रमण व तोडफोडी नंतर व नष्ट करण्याचा प्रयत्न करूनही या मंदिराचे सौंदर्य कमी झालेले नाही. 

मंदिरात गर्भगृहामध्ये दोन शाळुंका आहेत.त्यातील (कोपेश्वर म्हणजे शिव) तर दुसरा धोपेश्वर (म्हणजे विष्णु) होय. 

यामागे पौराणिक कथा अशी आहे की, शिवाने सती बरोबर विवाह केला हे तिच्या पित्याला, दक्ष राजाला आवडले नव्हते.श्री.शंकराला त्यांचे सासरे दक्ष राजाने आयोजित केलेल्या यज्ञ समारंभ कार्यक्रमास आमंत्रण दिले नाही म्हणुन पार्वती रूसली व नंदीबरोबर माहेरी गेली.यज्ञात दक्षाने शंकराचा अपमान केला. हे सहन न झाल्याने सतीने यज्ञात उडी मारून आत्मदहन केले, तेव्हा क्रोधित होऊन शंकराने, वीरभद्रास दक्षाचे डोके उडवण्यास सांगितले. नंतर इतर देवतांच्या विनंतीवरून दक्षाला अजमस्तक बसवण्यात आले. अज म्हणजे बोकडाचे मस्तक बसवले. आख्यायिका अशी सांगते  की  क्रोधाग्नीने ग्रासलेल्या शंकराला त्याचे क्रोध शमन करण्यासाठी या ठिकाणी आणल्याने या मंदिराला ‘कोपेश्वर मंदिर’  असे नाव आहे. सतीच्या विरहाने कोपलेला तो महादेव कोपेश्वर. मग त्याची समजूत काढण्यासाठी श्री विष्णू येथे आले. त्यांचे नाव धोपेश्वर. मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळुंका आहेत. एक कोप्पेश्वर व दुसरा त्याहून थोडा उंच धोपेश्वर. शिव व विष्णू दोघेही येथे शाळुंका रुपातच आहेत, हे महत्त्वाचे. शैव आणि वैष्णव या दोघांनी मानलेल्या मोजक्या ठिकाणांपैकी एक असे हे स्थान.नंदी सतीच्या माहेरी गेला ते स्थान नदीपलीकडे "येडुर" या गावी आहे म्हणुन या मंदिरात नंदी नाही. खिद्रापूर येथील कोप्पेश्वर मंदिर पूर्व दिशेला तोंड करून आहे आणि येडूर येथील नंदीच्या मंदिरातील नंदी पश्चिमेस तोंड करून बसला आहे.

सातव्या शतकात ७ व्या शतकात येथे चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याने हे मंदिर बांधायला सुरुवात केली,पण युद्धात तो मरण पावला अन् काम थांबले. पुढे,१३व्या शतकात यादव नृपती सिंघणने जीर्णोध्दार केला.दोन दगडांच्यामध्ये आधार म्हणून खोबणी आणि कंगोरे यांचा वापर करुन, इतर कुठलाही आधार न घेता, दगडांची कलात्मक रचना करुन मंदिर बांधण्याची कला या वास्तु-विशारदाने प्रचलीत केली. खिद्रापुरचे कोपेश्वर मंदिर हे हेमाडपंथी शैलीचा एक अजोड नमूना आहे. मुख्य प्रवेशद्वारानंतर नगारखाना लागतो. प्रवेश-भिंतीवरील दोन हत्ती आपले स्वागत करत आहेत असं वाटतं. एका वेळी एकच व्यक्ति प्रवेश द्वारातून जाऊ शकेल इतकं ते अरूंद आहे. एके काळी ह्या देवळाचा आसमंत सनईच्या मधुर स्वरांनी जिवंत होत होता नगा-याच्या नादाने दुमदुमत होता. 

मंदिरात मधोमध गाभारयाच्या अलिकडे स्वर्गमंडप आहे यालाच यज्ञमंडप असेही नाव आहे. 

अतिशय सुरेख सजावट असलेले १०८ खांब आहेत. मंदिराची रचना ताऱ्यांच्या आकाराची असून ती ४ विभागात विभागलेली आहे. मात्र, या सगळ्यावर कळस म्हणजे इथला स्वर्गमंडप  ४८ खाबांवर उभा आहे. यातील प्रत्येक खांब म्हणजे तंत्रज्ञानाचा अतुच्च अविष्कारच म्हणावा लागेल. प्रत्येक खांब आपल्या आकारात वेगळ्या पद्धतीने सजवलेला आहे.अष्टदिक्पालांची दंपती मंडपात कोरून काढलेली आहे.त्याचे ४८ स्तंभ, त्यावरील शिल्पे,नक्षी,रंगशिला,वरचा गोल गवाक्ष मंत्रमुग्ध करुन टाकतो. मुख्य मंदिराला ९२ हत्तींचा गजपट्ट आहे, त्यावर नरपट्ट आहे. येथील देवदेवता,सेवक, सुरसुंदरी,यक्षकिन्नर,प्राणीपक्षी,फळेफुले, वाद्ये आयुधे यांची सृष्टी अदभुत चमत्कारच म्हणावा लागेल !

शिल्पकलेचं लेणं - कोप्पेश्वर मंदिर खिद्रापूर

छताखाली नऊ ग्रहांची मांडणी केली आहे. गोलाकार, चौकोनी, षट्कोन, अष्टकोन असे सगळे आकार आपण प्रत्येक खांबात पाहू शकतो. स्वर्गमंडपाच्या मुख्य खांबांच्या ३ वेगवेगळ्या रचना असून, हा संपूर्ण मंडप म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, कला, संस्कृती, स्थापत्यशास्त्र यांचा उत्तम संगम आहे. 

स्वर्गमंडपाबद्दल पौराणिक कथेनुसार संकेश्वर येथील श्री शंकेश्वर व बागेवाडी येथील बंकनाथ यांचे दर्शन घेऊन लगेच खिद्रापूर येथील या स्वर्गमंडपातुन शिवाचे दर्शन घेतल्यानंतर सदेह वैंकुठला जाता येत असे पण नारदमुनीमुळे ही प्रथा बंद झाली.

स्वर्गमंडपा एका मोठया, अखंड शिलेवर अट्ठेचाळीस खांबांच्या आधाराने गोल छत उभे आहे. यज्ञमंडपाच्या गोलाकार छताखाली नऊ ग्रहांच्या नऊ कलाकृती विलोभनीय आहेत. प्रत्येक खांबामधील कोरीव काम बघत राहावं असं वाटतं. एकाच साच्यातून काढल्याप्रमाणे या कोरीव कामामध्ये एकसंधता, सुबकता आहे. दगडाची चकाकी व मऊपणा त्या खांबांवर आपले प्रतिबिंब उठावे अशी पारदर्शकता पाहून मन थक्क होऊन जातं. त्यावरील शिल्प असणारे बारकावे , त्याची लक्षणे याची माहिती आम्हाला प्रा. धम्मपाल माशाळकर व शंशाक चोथे यांनी दिली.ही शास्त्रीय माहिती प्रथमच समजत होती. 

स्वर्गमंडप आोलांडुन पुढे गेल्यावर  येतो तो सभामंडप. सभामंडप हा सुध्दा दगडी खांबांवर उभा आहे. वरच्या बाजूला खोबणी कांगारीच्या साह्याने संधी साधलेले कलात्मक छत आहे. या दालनाला सहा खिडक्या, तीन दरवाजे आहेत. या सभामंडपाच्या मध्यभागी गोलाकार शिळा आहे. त्यावर उभे राहून वर पाहिले की, कमळाच्या आकाराचे सुंदर नक्षीकाम पर्यटकांच्या मनाला भुरळ पाडते. या मंडपाच्या खांबावर रामायण, महाभारत, पंचतंत्र त्याचप्रमाणे प्रचलित कथांवर सुंदर दगडी कोरीव काम आहे. पाने, फुले, नर्तकी यांच्या कलाकुसरींनी नटलेले हे दालन खरोखरच अप्रतिम आहे.येथील प्रत्येक खांबावर कलात्मक रचनेची शिल्प आढळतात.सप्तमातृका, योगनारायण,चामुंडा,भक्त प्रल्हाद,चपेटा मारूती, रामायणातील प्रसंग उत्तम रेखाटलेले आहेत. विशेष म्हणजे येथील एका खांबावर "गौतम बुद्ध" यांचेही शिल्प आढळते. या शिल्प मुद्रेला समाधी किंवा योग्य मुद्रा म्हणून ओळखले जाते. ही मुद्रा “बुद्ध शाक्यमुनी”, “ज्ञानी बुद्ध अमिताभ” आणि “चिकित्सक बुद्ध” इत्यादी बौद्धांच्या गुणधर्मांना दर्शवते. या मुद्रेत उजवा हात डाव्या हातावर पूर्णपणे बोट उघडून मांडीवर ठेवण्यात येतो. 

शिल्पकलेचं लेणं - श्री  कोप्पेश्वर मंदिर खिद्रापूर
खिद्रापूर मंदिरात असणारे गौतम बुद्ध यांचे शिल्प

यानंतर गर्भगृहात दोन्ही बाजुला जय- विजय या द्वारपालांच्या नऊ ते दहा फुट उंचीच्या मुर्ती दिसतात पण डाव्या बाजूला असणारी जय या द्वारपालाची मुर्ती पूर्णपणे नष्ट झाली असुन उजव्या बाजूला विजय द्वारपालाची मुर्ती बर्यापैकी सुस्थितीत आहेत पण हात नष्ट झाले आहेत. यामुर्तीवर असणारे आयुध, अलकांर , रूद्राक्ष इतके स्पष्ट दिसते की डोळयाचे पारणे फेडते. 

शिल्पकलेचं लेणं - कोप्पेश्वर मंदिर खिद्रापूर

या मंदिराची रचना मनुष्यदेहाशी  साम्य दाखवणारी आहे. म्हणजे की, ग्रीवा म्हणजे मान, डोके म्हणजे आमलक, कळस म्हणजे केस. गर्भाशय आणि गर्भगृह यात साम्य मानले आहे. गर्भाशयात काळोख असतो म्हणून गर्भगृहही फार प्रकाशमान असणार नाही, याची काळजी घेतली आहे. "गर्भाशयात गर्भ" तशी गर्भगृहात मूर्ती. गर्भात आत्मा, तसा गाभाऱ्यातील मूर्तीत सृष्टीचा आत्मा. कोपेश्वराच्या मंदिराचा गाभाराही अंधाराच आहे. मंद तेवत्या समईंच्या प्रकाशात कोपेश्वर व धोपेश्वर दिसतात. दक्षिणाभिमुखी आडवे विभूती लेपन केलेला कोपेश्वर आणि त्याच्यापुढे समजूत घालायला आलेला उभा गंध लावलेला धोपेश्वर. डोळे अंधाराला सरावले की भिंतीवर कोरलेल्या शिवलीलामृतातील कथा दिसतात. 

मंदिर जेवढे आतून सुंदर आहे, तेवढेच बाहेरूनही. कितीही वेळ निरखावे, डोळे निवत नाहीत.केवळ आतूनच नाही तर बाहेरून पण ही वास्तू सुंदर अशा कोरीव कमानी परिपूर्ण आहे. संपूर्ण प्रदक्षिणेच्या मार्गावर विविध भावनांचे प्रदर्शन करणाऱ्या आखीव-रेखीव मानवी आकृती सुमारे पाच-सहा फूट उंचीवर आहेत. मंदिराच्या पायाजवळ सर्व बाजूंनी हत्ती कोरलेले आहेत.शिल्पांतील कलाकुसरीला तोड नाही. प्रत्येक कीर्तीमुखाची ठेवण वेगळी आहे. नक्षीकाम वेगळे. शिल्पकाराने शिव-पार्वतीलाही कीर्तीमुखात बद्ध केलेले दिसते. कीर्तीमुखाची एक कहाणी आहे. कीर्तीमुख नावाचा एक राक्षस शिवभक्त होता. त्याने तहान-भूक विसरून घोर तपश्चर्या केली. शंकर महादेव त्याला प्रसन्न झाले. वर माग म्हणाले. तेंव्हा प्रचंड भुकेची जाणीव झालेल्या त्या असूराने महादेवांकडे अन्नाची मागणी केली. महादेवानी आोळखले याला कितीही खायला दिले तरी याची भुक भागणार नाही. म्हणुन ते म्हणाले, स्वत:चेच शरीर पायापासून खा. त्या असुराने तसे केले. तरीही त्याची भूक भागली नाही. त्यावर उपाय म्हणून महादेव म्हणाले, आजपासून तू माझ्या दारात येऊन बस आणि येणार्‍या जाणार्‍या सर्व भाविकांची पापे खा. तुला ती कधीच कमी पडणार नाही. तेव्हापासून कीर्तीमुखाचे शिल्प शिवमहादेवाच्या दारात कोरण्याची प्रथा पडली. 

मंदिराच्या बाहेरील बाजूच्या जंघाभाग, देवकोष्ठे आणि अधिष्ठानाच्या थरावर मंडोवरावरील विष्णू अवतार, गणपती, चामुंडा, दुर्गा यांची शिल्पेही सुंदर आहेत. मंदिरावरील सुरसुंदरींची शिल्पे देखणी आहेत. सुरसुंदरी म्हणजे देवांगना. सुरसुंदरी म्हणजे अप्सरा अथवा पर्‍या असाही समज आहे.लेणी व मंदिरे एका विशिष्ट पद्धतीत कोरलेली, साकारलेली दिसतात. म्हणजे लेणी या डोंगरांमध्ये तर मंदिरे सपाट भूभागावर. अनेकदा लेणीच्या जवळ पाण्याची सोय म्हणून टाके दिसते.येथे खिद्रापूरात जवळच नदी आहे. हे मंदिर शिल्पकलेचा उत्तम नमुना असून, मंदिराच्या वापरलेल्या पाषाणात कोरून केलेली पशू, पक्षी, स्त्री- पुरुषांची वादकांची शिल्प, तसेच नक्षीकामाची बारीक कलाकृती भुरळ घालते.  

 मंदिराबद्दल अनेक कहाण्या या मंदिराच्या सभोवती  विखरून पडल्या आहेत ध्वस्त शिल्पासारख्या. या मंदिराच्या उभारणीनंतर एकदा या मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला आहे. देवगिरीचा यादवसम्राट सिंहाण देव याने खिद्रापूरच्या लढाईत मोठा विजय मिळवल्यावर या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. या मंदिराच्या खर्चासाठी दान दिले होते. सभामंडपाच्या दक्षिण दरवाज्याबाहेरच्या शिलालेखात तसा उल्लेख आहे. जे उरले आहे तेही विलक्षण आहे.शिल्पसौंदर्याचा खजिना असलेले खिद्रापूर आपल्याला एका दिवसाच्या या सहलीत हजार वर्षांचा प्रवास घडवितो आणि हे आम्हा सर्वांना घडवुन आणले प्रा. डॉ. धम्मपाल माशाळकर सरानी त्यांचा मी क्रूणी आहे

-अनिल पाटील पेठवडगाव

9890875498

हा अभ्यास दौरा खिद्रापूर- पाटेश्वर असा होता.पण मी खिद्रापूर दौरयात सहभागी झालो होतो.

अभ्यास दौरा सहभागी अभ्यासक मान्यवर                    

१) श्री. प्रदिपदादा म्हैसकर सर              

२) श्री धम्मपाल माशाळकर सर       

३)  वसुधा देशमुख मॅडम             

४) श्री. व सौ. कोन्नुर सर          

 ५) श्री डॉ प्रमोद दंडवते सर            

६) श्री शैलेश सावे सर                    

७) श्री महेश जरंडेकर सर              

८) श्री  प्रकाश नारकर सर               

 ९) श्री अन्सार पटेल सर                  

१०) श्री. व सौ. भोई सर            

 ११) श्री अनिल पाटील                 

 १२) श्री  योगेश शेटे सर                 

 १३) श्री संकेत फडके सर                

१४) श्री  राजेंद्र भोसले सर               

१५)  श्री श्रीहरी कोळी सर               

१६) श्री  सुमित दुदुस्कर सर             

१७)श्री आोंकार  भुतकर सर             

१८) श्री  अमित खरात सर

१९) श्री  विजय वाईकर सर

२०) श्री  शंशाक चोथे सर

शिल्पकलेचं लेणं - श्री  कोप्पेश्वर मंदिर खिद्रापूर


शिल्पकलेचं लेणं - कोप्पेश्वर मंदिर खिद्रापूर


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.