Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मे ०३, २०२१

भाजपचा डाव उलटा पडला.....





निवडणूक जिंकता येतं. समोर आस्था असेल. जयश्रीराम नारा असेल. केंद्राची सत्ता असेल. तिचा चौफेर दबाव असेल. चिडविणाऱ्या घोषणा असतील. तरी चिंता नाही. खंबीर नेतृत्व हवं . प्रचारात स्पष्टता हवी. थोडा संयम असावा. प्रचारात आस्था आणणे गैर. तरी आडमार्गे आणली. माहौल बनविण्यास वापर केला. आयोग बघत राहिला.

मतदार धुर्वीकरणाचा  डाव होता. उघडपणे नाव न घेता मतं मागण्याचा प्रकार होता. बांगला देश दौरा. मतुआ मंदिरात पुजा. त्याचाच भाग होता. आदर्श आचार संहितेचा बोजवारा होता. भाजपचा हा सिक्रेट डाव होता.  तो 75 जागा देवून गेला. त्या डावांच्या दुप्पट लाभ तृणमूलच्या पदरात पडला.  त्यात  डावे-कॉग्रेस पिसले गेले. त्यांना भोपळा मिळाला. बरं झालं तिरंगी लढत टळली .ही तृणमूलच्या पथ्यावर पडली. अन्यथा भाजपला मोकळं मैदान असतं.  त्यानं जखमी शेरनीची हैट्रिक धोक्यात आणली असती. स्वार्थ भाजपचा. आयोगाचा कर्तव्यात कसूर. अन् लाभार्थी ठरली तृणमूल. या तीन वाक्यात पश्चिम बंगाल निवडणूक निकालाचे  विश्लेषण !


आस्थेचा वाघ होता....
 ममता यांना भाजपच्या धन,बल,भेद,दंड अन् आस्थेच्या वारूळास तोंड द्याव लागलं.भाजपनं जखमी वाघिणीवर आस्थेचा वाघ सोडला. जयश्रीरामच्या नाऱ्याने विचलित झाल्या. त्याला रोखण्यास जयबांगलाचा नारा दिला. यातून प्रादेशिक अस्मिता जागविली. चंडीपाठचा धावा करावा लागला. हा भाग वेगळा. एकिकडे एकटी महिला प्रचारक. विरोधात पीएम,एचएम, अनेक मंत्री. तरी शेवटपर्यंत लढल्या. बंगाली अस्मिता जागविली. बाहरी माणसं संबोधलं. दहाड भरली. रेल्वे विकली. टेलिफोन कंपनी विकली. सरकारी उपक्रम विकले. बँकां विकत आहेत. धड देश चालविता येत नाहीत. ते गुजरातचे दोन वैश्य. प.बंगाल चालवू म्हणतात. उद्या हा प्रदेश विकतील. खोटारडे आहेत. लुटारू आहेत. मी जिवंत असेपर्यंत भाजपला पश्चिम बंगालात सत्ता मिळू देणार नाही. हे शब्द बंगाली माणसाच्या ह्रदयाला हात घालित. जोडीला मॉ, माटी आणि माणूस. त्याला खेला होबेची झणझणीत फोळणी होती. त्यावर बंगाली युवक फिदा होते. ना ताम ,ना झाम. पायात हवाई चप्पल,अंगावर पांढरी साडी हा साधेपणा होता.  तो सर्व जाती, धर्माच्या माणसाला साद घालत होता. सोबतीला एक फुटबॉल. बंगालींचा आवडता खेळ. हा  प्रचाराचा साधेपणा۔ भाजपच्या तामझामावर भारी पडला. काँग्रेस-डाव्यांना दोन्हीपैकी  एकही जमलं नाही. त्यामुळे त्यांचं अस्तित्व उरलं नाही.


आयोग बटिक होता...

भाजपची आक्रमक मार्केटींग. दोनशे पारचे दावे. दो मई आयी, दिदी गयी. पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत नागरिकता कानून लागू. घुसपेठींना काढू. मतुआा समाज,आदिवासी भाजप सोबत.  हे हवाई दावे. सहभोजनाचे प्रसारण मुस्लिमांना घाबरवित होते. त्याने मतांची टक्केवारी वाढली. ही गठ्ठा मते ममताच्या पारड्यात जात होती. कलकत्यात एका भागात प्रचार सभा. दुसऱ्या भागात मतदान होतं. आयोग बटीक असेल. तेव्हाच असं चित्र दिसू शकते. बिहाराच्या पाटण्यात असचं घडलं होतं. कलकत्ता हायकोर्टानं आयोगावर कोरोना आड खेटरं हाणलं. तेव्हा रडतं सुप्रीम कोर्टात गेलं. अगोदर ताठ व्हा. निष्पक्ष बना. मग मना लोकांचा विश्वास उडेल. कृतिच विश्वास उडविणारी असेल. तर विश्वास कसा बसेल. आठ टप्पे पाडताना सर्व पक्षांना विश्वासात घ्यावं असं वाटलं नाही. एका शहरात दोन तारखा ठरविताना काही वाटलं नाही. न्यायालयानं डोळे वटारले. तर रडतं बसले. लोकशाही मजबूत हवी असेल. तर निवडणूक आयोग मजबूत हवा. प्रचारात आस्था, धर्माचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शिरकाव नको.एवढं साधं कळत नसेल. तो आयोग कसला. आयोगाचा आयुक्त लोकशाही मारेकऱ्यांचा हस्तक. हेच नामाभिमान योग्य ठरेल. पश्चिम बंगालात शिक्षणाचे प्रमाण अधिक. त्यांनी लोकशाहीला मारक ठरणाऱ्या कृती नाकारल्या. महिलेच्या हातात सत्ता सोपविली. निवडणुकीच्या अगोदर घातलेल्या ईडीच्या धाडी कामी आल्या नाहीत. लोकशाही बळकट करणारी बंगालीवृत्ती स्वागतार्ह आहे. देशात अर्थव्यवस्था मृत्यूशय्येवर आहे. कोरोनाचा कहर आहे. आत्मनिर्भर भारताचे दिवाळे निघाले. ऑक्सिजन, इंजेक्शन, दवाई नाही. दुसऱ्या देशापुढे हात पसरावे लागते. अगोदर इंजेक्शन विकतो. एका लसीच्या तीन किंमती ठेवून धंदा चालतो. धडाक्यात निर्यात चालते.अन् आता विदेशांपुढे हात पसरतो.भूतान सारखा छोटा देश मदत करतो. कुठं गेलं निती आयोग !


-भूपेंद्र गणवीर

.................BG..................

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.