प्रा. मीनल ताई येवले
" मी मातीचे फूल "
(काव्य संग्रहाचे समीक्षा)
प्रा.मीनलताई येवले यांचा "मी मातीचे फूल " हा तिसरा काव्यसंग्रह आहे. या आधीच्या " सोहोर " आणि " परीघ" या काव्यसंग्रहानं वाचकांना वेड लावलं आहेच. मी मातीचे फूल या काव्यसंग्रहात 85 कविता असून पुन्हा लेखीकेने काव्य प्रांतात एक मानाचा तुरा रोवला आहे. मीनलताई ही कवयित्री खरोखरच मृण्मयी आहे. माती , पाणी, पाऊस, वारा यांचा आंतरिक झरा त्यांच्या कवितेतून नेहमी खळखळत राहतो. त्या अंजनगाव सुर्जी ह्या ग्रामीण भागातून येत असल्याने मातीशी त्यांचे घट्ट नाते जुळले आहे.
मी मातीची लेक सावळी
मातीच माझी आई
मी मातीची लेक लाडकी
मी मातीचे फूल .
या सारख्या अतिशय भावगर्भ, अर्थगर्भ ओळींनी सजलेला हा काव्यसंग्रह काळजाला भिडतो.लेखिकेच्या मनात पाऊस झुला झुलत राहतो. म्हणून त्यांचे मन नितळ आणि काळजात काळ्या मातीचा गंध दरवळत राहतो. हिरव्या रानवार्याची, पावसाच्या गाण्याची, प्रेमाच्या सावलीची, दुभंगलेल्या नात्याची आणि काळजातल्या प्रीतिची कवितांचा छटा त्यांच्या काव्यसंग्रहात प्रामुख्याने निदर्शनास येतात. माती आणि स्री यांच्याशी एकरूप होतांना लेखिका दिसतात. बाई आणि माती यांच्यातील अविट, उदात्त आणि दिव्यात्म नाते अनादि काळापासून असल्याचे धार्मिक विधानांनी अधोरेखित केले आहे.
मातीच्या कुशीत धान्य
अन् बाईच्या कुशीत जीव
लय सांभाळत राहतात त्या ऋतुचक्राची,
जातकुळी एकच बाई आणि मातीची.
अशा कवितांमधून लेखिका मातीशी एकरूप होतांना दिसतात. आहे त्या परिस्थितीत सुखी, समाधानी राहून सूजनाचे कण उधळणारी त्यांची कविता 'माहेर' डोळ्यात पाणी आणणारी आहे.नात्याचे अनुभव जपणारी, मनात प्रेमाची फूलं उमलत ठेवणारी कविता खूप आशावादी आहे.संसार तडजोडीचा असावा, भरजरी नको असं लेखिकेनी आवर्जून सांगीतलं.
" श्रावण" ही त्यांची कविता तर बाल कवींच्या निसर्गवेड्या पाऊलवाटेवरून आपणास घेऊन जाते.पण लेखिकेची वाट अनकृती नाही ,ती त्यांची खास प्रकृती आहे. तसं बघितलं तर लेखिकाचा पिंड निसर्ग सौंदर्यावर पोसलेला असल्याने त्या निसर्गवेडी कवयित्री असल्याचे प्रकर्शाने जाणवते. मनाचं हळूवारपण आणि मृदुता त्यांच्या कवितेतं जपून ठेवली आहे. शेतीवाडीत जीव ओतणारी बायामाणसे, दिवसभर कामात गुंतलेली बाई, गुरावासरांना जीव लावणारी गडीमाणसं , पाऊस-पाण्यात काम करणारी शेतकरीं निरागस मनाची माणसं ह्या कवितासंग्रहात पहावयास मिळतात. जे अनुभवलं, पाहिलं त्यातून कवितेचा खरा , प्रांजळ चेहरा रेखाटण्याचा प्रयत्न लेखिकेने केलेला दिसतो.छोट्या छोट्या गोष्टी मधून सुख शोधत जगण्याची सकारात्मक प्रवृत्ती मीनलताईच्या कवितेत आढळते. त्यांनी वेचलेले कवितांचे कण रसिकांना आनंधाचे क्षण बहाल करतात.रसिकांवर काव्यफुलांची उधळण करणार्या मीनलताई रसिक वाचकांना नक्कीच आनंदाची अनुभूती देतात. यात तिळमात्र शंका नाही.कवीला स्वःताचा चेहरा असतो हेच कवीचे वैशिट्य असते.आणि मीनलताई त्याच दिशेने वाटचाल करीत आहे हे निश्चित जाणवते.
त्यांच्या पूढील काव्य प्रवासासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा.
.............
शंकर जाधव.
7875015199