चंद्रपूर, दि. 22 डिसेंबर : ग्रामपंचायत निवडणूकीत सहभागी उमेदवार, कार्यकर्ते तसेच निवडणुकीसाठी कार्यरत कर्मचारी यांची तसेच लग्नसराई सुरू असल्याने मंगल कार्यालय व लॉन मध्ये कार्यरत कर्मचारी, बँडवाले इ. यांची कोरोना तपासणी प्राधान्याने करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिल्या. लग्नसमारंभात विहित मर्यादेपेक्षा अधिक नागरिक एकत्र आल्यास व मास्क न घालणाऱ्याविरूद्ध गुन्हे नोंदवून कडक कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले.
जिल्ह्यात कोरोनाच्या आरटीपीसीआर तपासण्या व शासकीय ऑक्सीजन खाटांची संख्या वाढविण्याचे तसेच कोरोना रुग्णांवर उपचारासाठी कायमस्वरूपी पायाभूत सुविधा उभारण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज दिले.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व लसीकरणाच्या अनुषंगाने जिल्हा शिघ्र कृती दल (जिल्हा टास्क फोर्स) समितीची बैठक जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी वीस कलमी सभागृहात घेतली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले, महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते, पोलिस अधिक्षक अरविंद साळवे, अतिरीक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अरुण हुमणे, निवासी जिल्हाधिकारी मनोहर गव्हाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.संदीप गेडाम प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी यावेळी जिल्ह्यातील सुमारे पाच हजार अंगणवाडी सेवीका व मदतनीस यांची व ग्रामपंचायत निवडणूकीत सहभागी उमेदवार, कार्यकर्ते तसेच निवडणुकीसाठी कार्यरत कर्मचारी यांची तसेच लग्नसराई सुरू असल्याने मंगल कार्यालय व लॉन मध्ये कार्यरत कर्मचारी, बँडवाले इ. यांची कोरोना तपासणी प्राधान्याने करण्याच्या सूचना दिल्या. लग्नसमारंभात विहित मर्यादेपेक्षा अधिक नागरिक एकत्र आल्यास व मास्क न घालणाऱ्याविरूद्ध गुन्हे नोंदवून कडक कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले.
जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी यावेळी कोरोना लसीकरणाच्या तयारीचाही आढावा घेतला. जिल्ह्यात कोरोना लसीकरणाकरिता नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला असून लसीकरणाची सर्व माहिती को-वीन या संकेतस्थळाच्या डॅशबोर्डवर उपलब्ध राहणार आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 16 हजार 69 फ्रंटलाईन वर्कर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार असून त्यातही प्राधान्य क्रमाने आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांना ही लस टोचली जाणार आहे. लस टोचण्यासाठी एकूण 529 लस टोचकांचे व 253 सुपरवायझर यांचे प्रशिक्षण पुर्ण करण्यात आले आहे. जिल्ह्यात लसीकरणाकरीता एकूण 1820 स्थळांची निवड करण्यात आलेली आहे. प्रत्येक लसीकरण सत्रात 100 लाभार्थ्यांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लसीकरण सत्राच्या ठिकाणी एक प्रतिक्षालय, एक लसीकरणाची खोली व लसीकरणानंतर संबंधीतांची पाहणी करण्याकरिता एक ऑब्जर्वेशन रुम असेल. प्रत्येक पथकामध्ये एकूण पाच लसीकरण अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. जिल्ह्यात लसींची साठवणूकीसाठी सद्यस्थितीत एक जिल्हा लस भंडार, एक उपजिल्हा लस भंडार, एक महानगरपालिका लस भंडार व इतर 78 शितसाखळी केंद्र कार्यान्वित आहेत. जिल्ह्यातील सर्व केंद्र मिळून लस साठवणूकीकरीता 94 आय.एल.आर व 112 डिप फ्रिजर शितसाखळी उपकरणे उपलब्ध असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) संग्राम शिंदे, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) उल्हास नरड, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दिपेंद्र लोखंडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद किन्नाके, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश साठे, अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविष्कार खंडाळे, यु.एन.डी.पी.चे जिल्हा प्रतिनिधी गणेश धोटे व इतर संबंधीत अधिकारी उपस्थित होते.