नागपूर : अरूण कराळे:
महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर पासून हाकेच्या अंतरावर औद्योगिक व गोदाम नगरी म्हणून वाडी शहराची ओळख आहे.मागेल त्याला काम.येथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला काम मिळून त्याचा उदरनिर्वाह चालतो.याच उद्देशाने विविध राज्यातील तसेच इतर जिल्ह्यातील कष्टकरी कामगार वर्गांचे लोंढेचे-लोंढे या शहराकडे वळली.
शहरातील बांधकाम व्यावसायिकाकडे,गोडावून,ट्रान्सपोर्ट,छोटे-मोठे व्यवसाय व औद्योगिक क्षेत्रातील वेगवेगळया कंपनीत येऊन काम करू लागला.परंतु अचानक कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने संचार बंदी केल्याने हा वर्ग जागेवर अडकून पडल्याने त्यांचे व परिवाराचे दिवसेंदिवस हाल होत आहे.शेवटी नाईलाजास्तव आम्ही जातो आमुच्या गांवा,आम्हाला नको थांबवा असे केविलवाणी विनंती करायची वेळ त्यांच्यावर आली आहे.
वाडी शहरात संचारबंदीमुळे हॉटेल मध्ये काम करणारे कामगार,धुणे-भांडीचे काम करणाऱ्या महीला,गवंडी,सलून व्यावसायिक,रोजमजुरीचे काम करणारे कामगार,गोदाम मधील हमाल,छोटा-मोठा रस्त्यावर व्यवसाय करणारे कष्टकरी कामगार जो दररोज हातावर आणून आपले व आपल्या परिवाराचा कसातरी गाडा चालविणाऱ्या कामगारांचे जीवन दिवसेंदिवस कठीणचे होत आहे.स्वतःजवळ असणारा पैसा तसेच घरातील असलेले राशन संपले असल्यामुळे घरातील ८-१० सदस्यांचे पोट भरायचे कसे?यातही ज्या कुटुंबातील कमावता व्यक्ती वयोवृद्ध असेल तर त्याची फरफट होत आहे.
ट्रकची चाकेही संचारबंदीमुळे मागील एक आठवड्यापासून थांबल्यामुळे स्वतःचे गावाकडे जाण्याचे दोरही कापले गेले आहेत.घरातील मंडळी सारखी वाट पाहत असून कुटूंब तिकडे आम्ही इकडे असल्याने घरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा कठीण परिस्थितीत मदतीचा ओघ म्हणून अनेक सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्ती सामाजिक बांधिलकीची भावना जपत जेवढे जमेल तेवढी मदत करण्यासाठी उतरले असली तरी या तुटपुंज्या मदतीने या संकटातून सध्यातरी बाहेर पडणे शक्य नाही.या कष्टकरी कामगार वर्गात विविध समस्या व कौटुंबिक मानसिक तणाव येऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची संभावना भविष्यात नाकारता येणार नाही.जीवनावश्यक वस्तूंमध्ये तिप्पट-चौपटीने महागाई वाढली आहे.सर्वसामान्य माणूस, कामगारांना अक्षरश: लुटले जात आहे.दुकानदारांकडून महाग दराने वस्तू विकल्या जात आहेत.
भिकाऱ्यांपेक्षाही बिकट परिस्थिती कामगारांची झाली आहे.बंदचा गैरफायदा घेऊन कामगारांची लूट करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याची मांगणी होत आहे.काम बंद झाल्याने जे आर्थिक संकट ओढावले आहे,त्याकडे शासनाने सहानुभूतीने पाहून मूलभूत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा.आर्थिक मदत करावी.
तीन आठवडे बंद राहणार असून पुढेही संचारबंदी ठेवण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहे.तेव्हा सर्वसामान्य नागरिकांची काय अवस्था होईल.याचा सारासार विचार करून आपल्या मतदार राजाची सेवा करण्याची संधी लोकप्रतिनिधींनी आली आहे.यासाठी बाहेर पडून सढळ हाताने मदत करावी.