नागपूर / अरुण कराळे:
राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुंगधित तांबाखुची तस्करी करणाऱ्या नागपूर लगत असलेल्या गोदामनगरी वाडी येथील गोदामावर अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी व पोलीसांनी शुक्रवार २८ जून रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास छापा मारुन ७ लाख २४ हजार ४०० असा अंदाजे ८ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. सुंगधित तंबाखु ची तस्करी करणारा गोदाम मालक शुभाष मोहनलाल बिश्नोई वय ४५ व रामकिशन पतराम बिश्नोई यांच्या वर अन्न व औषध प्रतिबंधक कायद्या अंतर्गत कारवाई केली. अन्न व औषध विभागाने सुगंधित तंबाखु जप्त करुन ट्रक वाडी पोलिसांच्या ताब्यात दिला.
वाडी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक देविदास चोपडे यांनी दिलेल्या माहिती नुसार, अन्न व सुरक्षा विभागाचे अधिकारी अभय देशपांडे यांना वाडी येथील एका गोदाम मध्ये सुगंधित तंबाखुने भरलेला ट्रक आढळला. तो ट्रक आरोपी यांच्या गोदाम मध्ये खाली होणार होता. अहमदाबाद ते नागपूर (वाडी) असा या ट्रकने प्रवास गाठला होता. अभय देशपांडे यांनी सुगंधित तंबाखुची खुलेआम तस्करी होत असल्याची माहिती, आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी द्वारे दिली. माहिती मिळताच अन्न व सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनेची सुचना वाडी पोलिसांना दिली. अन्न व सुरक्षा विभागाचे अधिकारी व वाडी पोलिसांनी गोदाम येथे उभा असलेल्या ट्रक ची तपासणी केली. यात त्यांना सुगंधित तंबाखु आढळला. अन्न व सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुगंधित तंबाखु जप्त करुन गोदामाला सील ठोकले. वाडी पोलिसांनी ट्रक जप्त करुन आरोपींचा शोध घेत आहे. या प्रकरणाचा तपास पीएसआय अमोल लाकडे करीत आहेत.