Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, फेब्रुवारी ११, २०१८

फुलपाखरांचे जग ताडोबा :नक्की वाचा काय आहे

फुलपाखरू साठी इमेज परिणामचंद्रपूर /प्रतिनिधी:
 वाघ, शेकडो अन्य वन्यजीव, विपूल वनसंपदा, पक्षांच्या शेकडो प्रजाती आणि आयुष्यावर प्रेम करायला शिकविणारे मनमोहक फुलपाखरांचे जग ताडोबा व अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला आपण पर्यावरणाचे देणे लागतो, हे भावना शिकवणार आहे. त्यामुळे ताडोबा हे पर्यावरणाचे चालते बोलते विद्यापीठ म्हणूनच पुढे येणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातंर्गत आगरझरी येथे उभारण्यात आलेल्या बहुरंगी बटरफ्लाय वर्ल्डच्या लोकार्पणाप्रसंगी शनिवारी ते बोलत होते.
यावेळी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, मनपा स्थाई समितीचे सभापती राहुल पावडे, जिल्हा परिषदचे बांधकाम सभापती ब्रिजभुषण पाझारे, वनविकास महामंडळाचे व्यवस्थापक उमेश अग्रवाल, मुख्य वनसंरक्षक मुकूल त्रिवेदी, ताडोबा प्रकल्पाचे उपसंचालक गजेंद्र नरवणे, डॉ.किशोर मानकर आदी उपस्थित होते. वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले, ताडोबा येथील पराक्रमी वाघांच्या उपलब्धतेसोबतच विविध माहितीपूर्ण प्रकल्पांनी बटरफ्लाय वर्ल्ड नव्या स्वरुपात पर्यटकांपुढे लवकरच येणार आहे. येत्या दोन वर्षांत ताडोबा पर्यटनाच्या नकाशावरील पहिल्या पसंतीचे स्थळ राहील, असा दावाही त्यांनी व्यक्त केला. चंद्रपूरमध्ये एखादा उद्योगपती जितका रोजगार निर्माण करु शकत नाही. तितका मोठा रोजगार वाघांमुळे मिळणार आहे. आगरझरी व परिसरात येत्या काळामध्ये वाघ बघायला येणाऱ्या पर्यटकांना पर्यावरणाचे धडे देणारे, पर्यावरणावर प्रेम करायला शिकवणारे आणि पर्यावरणाबद्दल शिक्षित करणारे अनेक प्रकल्प बघायला मिळतील, असेही ना. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाप्रसंगी पद्मापूर, आगरझरी, अडेगाव, उडीयाटोला, मोहर्ली येथील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. उत्कृष्ट कार्याबद्दल उपविभागीय वनअधिकारी शिंदे आणि सहकारी कर्मचाºयांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
रोजगाराला चालना
फुलपाखरु प्रत्येकाच्या लहानातील आकर्षण असते आणि ते कधीच संपत नाही. अगदी १४ दिवसांचे जीवनक्रम असणारे फुलपाखरु जगाला आनंदाने जगण्याचे संदेश देते. या ठिकाणी हजारो फुलपाखरे जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात येईल. फुलपाखरु उद्यान व माहिती केंद्र व विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र राहणार आहे. यातून पर्यटनाचा विकास होणार असून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे.
असे आहे बटरफ्लाय वर्ल्ड
लहान मुलांना आवडेल अशा पद्धतीची मांडणी बटरफ्लाय वर्ल्डमध्ये करण्यात आली. फुलपाखरांच्या अनेक प्रजाती बघायला मिळणार आहेत. फुलपाखरांच्या जीवनपटाची शास्त्रीय माहितीही उपलब्ध राहील. काचेच्या घरांमध्ये फुलपाखरांचा मुक्त विहार, लहान मुलांना खेळण्यासाठी विपूल जागा, विविध कारंजी व लटकते पूल, मचान सवारी आदी सुविधा उपलब्ध आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा संपूर्ण प्रकल्प स्थानिक गावकऱ्यांकडून चालविला जाणार आहे.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.