Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जानेवारी २७, २०१८

कालिदास महोत्सव यापुढे दरवर्षी रामटेकमध्येच


  •  पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
  • कालिदास राष्ट्रीय लोकमहोत्सवाचे थाटात उद्घाटन
  • रामटेककरांचा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद


        रामटेक ( ललित कनोजे ) दि.27 : कालिदास महोत्सवाच्या माध्यमातून कला व संस्कृतीचे संवर्धन करण्यासोबतच रामटेक या नगरीत पर्यटनाला चालना देण्यासाठी कालिदास महोत्सव दरवर्षी रामटेक येथे आयोजित करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. रामटेक येथील नेहरु भवन मैदानावर महोत्सवाचा दुसरा टप्पा राष्ट्रीय लोकमहोत्सव आणि आदिवासी संस्कृतीपर्वाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

            यावेळी खासदार कृपाल तुमाने, आमदार मल्लिकार्जून रेड्डी, विभागीय आयुक्त अनूप कुमार, नगराध्यक्ष कविता मुलमुले, माजी आमदार ॲड. आशिष जयस्वाल, आनंदराव देशमुख, पांडुरंग हजारे, कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरु श्रीनिवास वरखेडी, अपर आदिवासी आयुक्त श्रीमती माधवी खोडे, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, एमटीडीसीचे हनुमंत हेडे, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी डॉ.शेखर सिंह, वनविभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी आदी उपस्थित होते.

            रामटेक येथील नेहरु मैदानावर चार राज्यातील कलावंत, लोक व आदिवासी नृत्य सादर करणार असून रामटेककरांना या सांस्कृतिक महोत्सवाची पर्वणी असल्याचे सांगतांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, कालिदास महोत्सवाच्या माध्यमातून कालिदासाचे काव्य तसेच येथील ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचे दर्शन संपूर्ण देशात पोहचविण्याचा प्रयत्‍न आहे. लोक व आदिवासी नृत्याचा अविष्कार हे भारतीय संस्कृतीचे दर्शन असलेला कार्यक्रम आहे, असे त्यांनी सांगितले.

            स्वागतपर भाषणात आमदार मलिक्कार्जून रेड्डी यांनी रामटेकच्या विकासासाठी 150 कोटी रुपयाचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. या आराखड्याच्या माध्यमातून चांगल्या सुविधा मिळणार आहेत. रामटेक येथील गडावर कालिदासांचा भव्य पुतळा बसविण्यात येणार आहे. तसेच रामटेक येथील संस्कृत विद्यापीठ हे रामटेकचे वैभव असल्याचे त्यांनी सांगितले.

            भंडारा येथील कलावंतांनी गणेश वंदनेने कालिदास महोत्सवाची सुरुवात झाली. प्रधान ढेमसा नृत्य चिमूर, पावडे नृत्य भामरागड तसेच रेला नृत्य आलापल्ली या महाराष्ट्रातील आणि झाडीपट्टीतील विदर्भाचे आकर्षण ठरलेल्या लोक व आदिवासी नृत्याला रामटेककरांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला.

            यासोबतच छत्तीसगडचे पंथी, मध्यप्रदेश मधील शैला व कर्मा आदिवासी नृत्य गुदमबाजा वाद्य नृत्य तसेच राजस्थानच्या कालबेलिया, भवाई नृत्य आणि मांगनियार लोकगायन हे दोन दिवसाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. कालिदास महोत्सवाचे आयोजन कालिदास आयोजन समिती, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.                                                                                             ** * * * **

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.