Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मे ३०, २०१५

बल्लारपूर उपविभागीय कार्यालय उद्घाटन

बल्लारपूर विधानसभा क्षेत्र राज्यात आदर्श बनविणार - सुधीर मुनगंटीवार 



चंद्रपूर : कोट्यवधी रुपयांचे सिमेंट रस्ते, 100 कोटींचे वनस्पती उद्यान, सैनिकी शाळा, अद्ययावत असे तालुका क्रिडा संकुल अशा विविध विकास कामांचा झंझावात बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात सुरु असून पुढील 4 वर्षांत बल्लारपूर तालुका विकासाच्या दृष्टीने राज्यात आदर्श बनविणार असल्याचा संकल्प पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

बल्लारपूर उपविभागीय कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी केंद्रिय रसायन आणि खते राज्यमंत्री हंसराज अहिर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्याताई गुरुनुले, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, अपर जिल्हाधिकारी संजय धिवरे, नगराध्यक्ष छाया मडावी, पंचायत समिती सभापती चंद्रकला बोभाटे, उपविभागीय अधिकारी कल्पा निळ-ठुबे, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, चंदनसिंग चंदेल व तहसीलदार डी.एस.भोयर यावेळी उपस्थित होते.

नांदगाव पोडे येथील शेतकरी सुधाकर उरकुडे यांचे हस्ते उपविभागीय कार्यालय बल्लारपूरचे उद्घाटन करण्यात आले. यापुढे सर्व उद्घाटन व भूमिपूजन शेतकरी, कष्टकरी, महिला, मजूर व सर्वसामान्य माणसाच्या हाताने करण्यात येईल असे श्री.मुनगंटीवार यांनी जाहिर केले.

श्री.मुनगंटीवार म्हणाले, बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सिमेंट रस्ते तयार होणार आहेत. त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. वनस्पती उद्यानासाठी 100 कोटी मंजूर केले आहेत. तर 250 कोटी खर्चून सैनिकी शाळा उभारली जाईल. बल्लारशा ते मुंबई थेट रेल्वे जोडण्यात येणार आहे. सध्या कोठारी येथे नायब तहसीलदारचे कार्यालय असून 2018 मध्ये कोठारी तालुका होईल. ताडोबा येथे 500 कोटींचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन केंद्र उभारले जाणार आहे. चिचपल्ली येथे बांबू प्रशिक्षण केंद्र सुरु झाले आहे.

बल्लारपूर येथील जमिनीच्या पट्टयाचा प्रश्न महत्त्वाचा असून लोकांच्या हक्काचे पट्टे देण्याचा भव्य कार्यक्रम लवकरच राबविला जाणार आहे. संपूर्ण जिल्ह्याला प्रगतीच्या वाटेवर नेण्याचा आपला संकल्प असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले. जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा समतोल विकास साधायचा असून यासाठी गाव दत्तक योजना राबविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

जनवन योजनेच्या माध्यमातून वनाजवळील गावाचा विकास साधला जाणार आहे. वनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी 7 हजार कुटुंबांना गॅस कनेक्शन दिली आहेत. बल्लारपूर येथे भव्य क्रिडासंकुल होणार आहे. पळसगाव आमडी उपसा जलसिंचन योजना पूर्ण होणार असून यामुळे सिंचनात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्याला भूषण ठरेल, असे वैद्यकीय महाविद्यालय नक्की होईल, असेही श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

या उपविभागीय कार्यालयामार्फत जनसामान्याचे प्रश्न तातडीने मार्गी लागतील. केंद्र सरकारच्या जनकल्याणकारी योजनांचा तसेच अटल पेंशन योजना, जनधन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री.अहीर यांनी केले.

बल्लारपूर उपविभागीय कार्यालयांतर्गत 35 गावे, 55 तलाठी कार्यालये व 17 ग्रामपंचायतचा समावेश आहे. या कार्यालयात सर्व प्रकारचे महसूल प्रकरणे, शासकीय व खाजगी जमिनीच्या नस्ती हाताळणे, जातीचे व इतर प्रमाणपत्राचे वाटप करणे, गुंठेवारी विकास अधिनियम, भोगवटादार वर्ग एक जमिनीचे वर्ग दोन रुपांतर करणे, वनहक्क कायदा, गावठाण जमीन प्रकरण, भूसंपादन यासारखी अनेक कामे वेगाने होतील, असा विश्वास डॉ. म्हैसेकर यांनी व्यक्त केला.

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते दुर्गा विश्वनाथ आत्राम, प्रफुल कांबडे, दिव्यानी गणपडे यांना जातीचे प्रमाणपत्र तर शत्रुघ्न नगराळे यांना सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.