Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, ऑक्टोबर १८, २०१४

दारुडा बाप बगीच्यात, चिमुकली खुशबू पोलिस ठाण्यात

कामठी : बाप मतिमद्यप्राशनाने बगीच्यात कुठेतरी पडलेला अन्‌ त्याची चिमुकली मुलगी खेळत होती. रात्री अंधार झाल्यावर चिमुकली बापाला शोधू लागली. मात्र, कुठेही न दिसल्याने ती रडत होती. अशातच पत्रकाराच्या मदतीने मुलीला पोलिस ठाण्यात आणले. तिच्या बापाचा शोध घेऊन पोलिसांनी त्या दोघांनाही घरी सुखरूप सोडले.
16 ऑक्‍टोबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कामठी येथे खुशबू सुभाष गौतम (वय तीन, रा. खैरी) ही तिच्या वडिलांसोबत जयस्तंभ चौकाजवळील बगीच्यात खेळायला गेली. यावेळी तिच्यासोबत तिचे वडीलसुद्धा होते. मात्र, सुभाष गौतम हा दारू पिण्याच्या सवयीमुळे बगीच्यात नशेत पडलेला होता. आपली मुलगी खुशबू ही कुठे आहे, काय करीत आहे, कशी आहे, याबाबत त्याला कोणतीही चिंता नव्हती. खेळणे झाल्यावर खुशबू वडिलाला शोधत होती. मात्र, अंधारामुळे तिला तिचे वडील त्याच ठिकाणी असूनही दिसले नाही. त्यामुळे ती सारखी रडत होती. रडतरडत रस्त्यावर भटकत गेली. यावेळी तिच्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. ती बराच वेळ एका महामार्ग रोडवर बसून रडत होती. तेव्हा एका पत्रकाराने पोलिस ठाण्याचे ठाणेदार सतीश गोवेकर यांना मोबाईलवरून माहिती दिली. ठाणेदार गोवेकर हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मुलीची विचारपूस केली. मात्र, ती यावेळी काहीच बोलत नव्हती. पोलिसांनी आजूबाजूला घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा त्या ठिकाणी एक व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत पडलेला होता. हेच तिचे वडील असल्याचे गृहीत धरून मुलीला पोलिस ठाण्यात आणण्यात आले. मुलीला तिच्या घराचा पत्ता व इतर माहिती विचारण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, तिला ती माहिती सांगता आली नाही. यावेळी ठाणेदार गोवेकर यांनी त्या मुलीच्या वडिलाला कामठी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करून औषधोपचार केले. तो शुद्धीवर आल्यानंतर त्याने आपली माहिती दिली. त्यानंतर रात्री साडेअकरानंतर त्या दोघांनाही घरी सोडण्यात आले. पोलिस हवालदार तेजराम भलावी, पोलिस शिपाई अंकुश लाखे यांनी सहकार्य केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.