Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, एप्रिल २०, २०११

पावित्र्य कायम; गर्दी घटली

देवनाथ गंडाटे - सकाळ वृत्तसेवा
Thursday, April 14, 2011 AT 12:00 AM (IST)

Tags: chandrapur, vidarbha, mahakali devi

चंद्रपूर - महाकालीदेवीवर अपार श्रद्धा ठेवणारे भाविक लाखोंच्या संख्येत आहेत. मात्र, येथील अपुऱ्या सोयीसुविधांमुळे मागील शंभर वर्षांपासून सुरू असलेल्या यात्रेतील गर्दी दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. धर्मशाळा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था हा अपवाद सोडला, तर कोणतीही नवी व्यवस्था येथे करण्यात आलेली नाही. जिल्हा प्रशासन, नगर प्रशासन आणि मंदिर व्यवस्थापन नवे काही करण्यास पुढाकार घेताना दिसत नाही.
महाकाली ही विदर्भातील अष्टशक्तिपीठांपैकी एक आहे. चंद्रपूरचे आराध्यदैवत असलेल्या देवी महाकालीची यात्रा दरवर्षी चैत्र महिन्यात भरते. देवी महाकालीच्या मंदिराचे बांधकाम 1704 ते 1719 च्या काळात पूर्ण झाले. भिंतीवरील शिल्प गोंडकालीन कलेचा उत्कृष्ट नमुना होय.

यात्रेला प्रारंभ

भोसलेंच्या काळापासूनच येथे यात्रा भरण्यास सुरवात झाली. मात्र, दरोडेखोरांमुळे शहरात अशांतता निर्माण व्हायची. त्यामुळे भोसले सरकारने यात्राच बंद केली. 20 मे 1818 मध्ये चंद्रपूर इंग्रजांनी आपल्या ताब्यात करून घेतले. 1905-06 च्या आसपास यात्रेला पुन्हा सुरवात झाली. यात्रेत नांदेड, परभणी, उस्मानाबाद, माहूर आणि आंध्रप्रदेशातील भक्त मोठ्या संख्येने येतात.



मंदिरातील व्यवस्था

महाकाली मंदिर व्यवस्थापनाने पाच हजार चौरस फूट जागेत चार मजली धर्मशाळा निर्माण केली आहे. दोन हजार चौरस फुटांचे सभागृह आहे. त्यात निःशुल्क निवासव्यवस्था आहे. मात्र, ती अपुरी पडत असल्याने यात्रेकरू तंबू ठोकून, झाडाच्या आडोशाने, पाण्याच्या टाकीखाली रात्र काढतात. ही यात्रा उन्हाळ्यात भरत असल्याने दिवसभर अंग भाजून निघते. परिसरातील घरांमध्ये विसावा मागितल्यास प्रतिव्यक्ती 100 ते 50 रुपये मागितले जातात. 40 खोल्यांची एक धर्मशाळा सोडली, तर थांबण्याची व्यवस्था कुठेच नाही. या धर्मशाळेची क्षमता केवळ दोन हजारांची आहे. म्हणजे यात्रेकरूंच्या तुलनेत एक टक्काही नाही. धर्मशाळेची स्वच्छता राखण्यात भाविकांकडून सहकार्य मिळत नाही. स्वयंपाकासाठी जागा उपलब्ध करून दिलेली नाही. थोडीशी जागा मिळाली की, गोट्यांची चूल मांडून भाविकांचे जत्थे स्वयंपाकास बसतात. अशातच उरलेले शिळे अन्नही कुठेही फेकून दिले जात असल्याने दुर्गंधी पसरते.

50 हजार लिटर क्षमतेच्या दोन पाण्याच्या टाक्‍या असून, मंदिर परिसरात काही ठिकाणीच नळ लावण्यात आले आहेत. मंदिरानेही स्वतःची यंत्रणा उभारली. पण, भाविकांची संख्या पाहता ही व्यवस्था अत्यंत तोकडी आहे. शिवाय या नळातून मिळणारे पाणी गरम असते. यात्रेला शहरीकरणाचा धोका निर्माण होत आहे. मंदिर परिसरात असलेल्या मोकळ्या जागा झपाट्याने काबीज केल्या जात आहेत. येत्या पाच-सात वर्षांत या रिकाम्या जागा पूर्णपणे भरण्याची शक्‍यता आहे. एक दसरा मैदान सोडले, तर दुसरे सुरक्षित ठिकाण नाही. आता काही मोकळ्या जागांवर मंदिर व पालिका प्रशासनातर्फे मंडप टाकून भाविकांना थांबण्याची व्यवस्था केली जाते. पण, या जागा भरल्यावर कुठे व्यवस्था करणार, हा प्रश्‍न प्रशासन नजरेआड करीत आहे. भाविकांना धर्मशाळेसारख्या इमारती बांधून स्थायी व्यवस्था करणे गरजेचे आहे. दरवर्षी कोट्यवधींचा धर्मार्थ निधी येथे गोळा होतो. मात्र, सुधारणा करण्यात आलेली नाही.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.