नागपूर/प्रतिनिधी:
आयटीआयअंतर्गत अभ्यासक्रमासाठी २०१९-२० शैक्षणिक वर्षासाठी १ लाख ३७ हजार 3०० जागा उपलब्ध आहेत. मागील वर्षी हाच आकडा १ लाख ३९ हजार ४९२ इतका होता.त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल दोन हजार १९२ जागा कमी झाल्या आहेत.
कुशल मनुष्यबळाचे प्रमाण वाढावे यासाठी आयटीआयच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध करून आयटीआयचा अभ्यासक्रम, जागा व नियम हे नवी दिल्लीतील डायरेक्टर जनरल ऑफ ट्रेनिंगमार्फत ठरवण्यात येतात. त्यानुसार, एनएसक्यूएफकडून सर्व अभ्यासक्रम अपडेट करण्यात आले असून, ते प्रात्यक्षिकांवर आधारित आहेत.
एनएसकयूएफच्या तत्त्वानुसार काही जागा कमी झाल्या असल्याचे समजते. राज्यातील विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे असणारा कल गेल्या काही दिवसांपासून वाढला आहे. राज्यामध्ये सरकारी ४१७ तर खासगी ५३८ औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. मागील वर्षीची
गर्दी बघता आयटीआयच्या जागांमध्ये वाढ होणे अपेक्षित होते. तसे प्रस्तावही होते. मात्र, जागा कमी करण्यात आल्या असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, आयटीआयला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे. सोमवारपासून (ता. 3) ऑनलाइन नोंदणीस सुरुवात झालेली आहे. या नोंदणीत विद्यार्थ्याला हव्या त्या अभ्यासक्रम (ट्रेड ))चे ऑप्शन (विकल्प) भरता येणार आहेत. प्रवेशाच्या एकूण ४ फेऱ्या होणार आहेत. त्यानंतर शिल्लक विद्यार्थ्यासाठी विशेष फेरी होणार आहे. शासकीय संस्थेतील १०० टक्के प्रवेश याच प्रक्रियेतून दिले जातील, तर खासगी आयटीआयसाठीचे ८० टक्के प्रवेश या प्रक्रियेतून होणार आहेत.
असे आहेत अभ्यासक्रम
आयटीआयमधून ७९ प्रकारच्या व्यवसाय अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देण्यात येते. त्यातील १०वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी ११ तर १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ६८ अभ्यासक्रम आहेत.
आयटीआयकडून अभियांत्रिकी विषयाचे एक वर्ष कालावधीचे २३ अभ्यासक्रम, दोन वर्षे कालावधीचे ३२ अभ्यासक्रम, बिगर अभियांत्रिकी विषयाचे एक वर्षाचे २४ अभ्यासक्रम आहेत.