❗ जात्यावरल्या आेव्या ❗
फेसबुक लिंक https://bit.ly/3jqjFX7
पूर्वीच्या काळी स्त्रियांची लग्न फार लवकर व्हायची. स्त्रिया कसल्या परकरया ,बालिश पोरीच म्हणा ना.अगदी अल्लड वयात जे वय खेळायच , बागडायच असायचं त्या वयात लग्न होऊन सासरी जाव लागायच .सासरी जाच ,सासुरवास पन भरपूर , प्रेमाचा एखादा शब्द तिच्या नशिबी नसायचा. नवरा चांगला असेलच अस नाही.आणि असला तरी त्याच्या बरोबर बोलायची बंदी.मग आपल्या मनातलं गूज,गुपित,आठवणींचा तो कप्पा बोलणार कुणाजवळ .अशा वेळी ती आपलं मन गोठ्यातल्या गाई जवळ ,परसातल्या केळी जवळ, अंगणातल्या तुळसी जवळ,शेतातल्या आंब्या जवळ,आणि जात्या जवळ उघड करायच्या .जात्यावर दळण दळताना तिच्या मनातील तो कप्पा आपोआप खुला व्हायचा
जुन्या काळी स्त्रियांना फार लवकर उठून घरातील कामे करावी लागायची,झाडलोट,सडा सारवण ,जात्यावर दळण, दळण दळताना अशा ओव्या मुखातून बाहेर पडायच्या .
🔊 पहिली ओवी गातो.
हाय दुसरा माझा नेम.
तुळशी खाली राम ,
पोथी वाचतो ब्राह्मन .
दुसरी ओवी गातो ,
सोन्याच्या मंडपात ,
विठू वाचीतो हरिपाठ.
तिसरी ओवी गातो,
माझ्या ओवीचा पोवाडा ,
सीता बाईच्या सेजवरी ,
नाम नवतीचा केवडा .
चवथी ओवी गातो ,
गण चवथी चा गणपती,
रिद्धी सिद्धी उभी होती,
हाती करंडा कुंकू लेवती .
पाचवी ओवी गातो,
पाची या पांडवाला ,
द्रौपदी ओवी गाते
कृष्ण गोविंद बांधवाला .
सहावी ओवी गातो ,
भुई सायास कधी झाले ,
तेहातीस कोटी दयावं ,
दयावं हृदयी माझ्या आले.
सातवी ओवी गातो,
साती या समुंदरा,
दर्याच्या काठावरी,
देव अवतार झोपीयला.
आठवी ओवी गातो ,
युग झाल्यात आठहाविस ,
देव त्या विठ्ठलाला ,
कोण म्हनीना खाली बस.
नववी ओवी गातो ,
नऊ या एकादशी ,
चंद्रभागेला चौदा येशी ,
किल्ली कुलूप देवापाशी.
तिच्या ओवी तून भक्तीचा सागर उचंबळून यायचा .पहाटे च्या राम प्रहरी ती गायची.
सकाळी उठोयेनी ,
आधी रामाच नाव घेतो ,
राम आम्हाला काय देतो,
मरणाच्या वेळी
बंदी यमाची सोडवितो .
सकाळी उठोयेनी ,
दार उघडीतो गुमानित ,
राम तुळशी कमानीत.
सकाळी उठोयेनी ,
आधी उघडीतो परडे दार,
दारी तुळशी थंडगार .
सकाळी उठोयेनी ,
दार उघडीतो भिरी भिरी ,
राम तुळशी घाली फेरी .
सकाळी उठोयेनी ,
मी ग तुळशी घाली कट्टा ,
पाप पळाली चारी वाटा .
सकाळी उठोयेनी,
मी ग तुळशी घाली पाणी ,
पाप फेडोनी झाली शहानी .
तुळस तू ग बाई ,
नको राहुस जंगलात ,
ये ग बंधूच्या दाराईत
जागा देते मी अंगणात .
प्रचंड कामाचा भार , ताण,सासरच्या लोकाकडून कधी मायेचा शब्द नसायचा. दूर देशी माहेर .अशा वेळी तिला दिसायची तिची मायमाऊली .आईची सय आली की तिचा पदर भिजायचा .
हिरव्या केळाच
कोण करील रायत ,
बया ग वाचून
कोण वाढील आयत.
पुरणाची पोळी
गुळावाचुन दिस फिकी ,
बया ग वाचून ,
कोण म्हणील माझ्या लेकी.
कामानी मंदी काम
नाही कामाला मी ग भ्याले ,
बया ग बाईचं दूध ,
दूध वाघिणीच मी ग प्याले .
आई वाचून कोणी ही आयत वाढतच नाही...तिच्या शिवाय कोण पण मायेने जवळ घेत नाही...हे ही शाश्वत सत्य...आईच्या दुधाला वाघिणीची उपमा देऊन ,सासरच्या लोकांच्या नकळत ती त्यांना परखड भाषेत सूनावते.की मी कोणत्याही कामाला भित नाही .वाघिणीचे दूध प्याले आहे .मी वाघीणीची लेक आहे...
स्वतःच्या लांबच्या लांब केसाचा पन तिला खूप आभिमान .केस विंचरताना पन तिला तिच्या आईची आठवण यायची.
लांबनी लांब क्यास ,
साऱ्या डोंगरी झालं याल.
माझी ग बया बाई ,
गोळा करून लावी त्याल .
आईची आठवण आली की तिला माहेरी जाव आईला भेटाव अस वाटायचं. पण बोलणार कुणाजवळ .ती अप्रत्यक्ष पणे घरच्यांना बोलायची.कदाचित ही ओवी एकून तिला आईला भेटावायास पाठवतिल ही एकच आशा.
माह्याराला ग जाते,
सुख मला ग आईच ,
फुल फुललं जाईच .
माह्याराला ग जाते ,
सुख मला ग बापाचं ,
फुल फुललं चाफ्याच .
माह्याराला ग जाते,
सुख मला ग बंधूच ,
फुल फुललं झेंडूच .
फुल फूलने म्हणजेच आनंदीत होणे. मग काय माहेरी गेल की फुल तर फ़ुलणारच मनाला आनंद तर होणारच.कारण माहेर मध्ये असतात आई आणि बाबा .त्यांच्या पायाजवळ स्वरग असतो.आईबाबांच्या सावलीत तिला एक मोठा आधार वाटतो . तिच्या साठी आई बाबा च्या मध्येच सर्व तीर्थक्षेत्र आहेत.ती गाते
बाप माझा ग सजन,
बया माझी ग गोंदण ,
काशीला गेली वाट ,
दोन्ही झाडाच्या मधन .
माहेर म्हणटल की भावाची आठवण तर येणारच.आपला एकूलता एकच बंधू त्याच कौतूक बहिण नाही करणार तर कोण.. आपल्या भावाचा आणि त्यायोगे माहेरचा मोठेपणा ती आपल्या ओवी तून सांगते .
वाट ग वयला वड ,
घस सोडूनी पिकला ,
नटवा बंधू माझा ,
साता नवसाचा एकला.
वाट ग वयल श्यात ,
गडी माणसं राबत्यात ,
माझ्या ग बंधुजीला ,
मोठा कुळणबी म्हणत्यात .
सुतराच्या ग साळा ,
केर , गदाळा कशाचा ,
माझ्या ग बंधू जिन
बांधला वयला माळा .
सोनाराच्या ग साळा ,
चांदी कशान उतू गेली ,
माझ्या ग बंधू जिनी,
चांदीची बटण केली.
भावाचा मोठेपणा तो किती.त्याच्या शेतात गडी माणसा चा नेहमी च राबता आहे.तो मोठा तालेवार आहे.त्यांने चांदीची बटण केली आहेत.... तिला भावाची खुप आठवण येते . शेवटी तिला राहवत नाही .ती माहेरी कुणाकडून तरी निरोप देते की तिला भेटायला या . आणि अशातच तिला भावाचा निरोप येतो की तो तिला भेटायला येत आहे. आता मात्र तीच मन कशात लागत नाही.ती डोळ्यात प्राण आणून भावाची वाट पाहत असते .आया बाया ना सांगते.
पायात पायतान,
बुट वाजत चरा चरा,
आया बायानो माग सरा ,
बंधू वकील येतो घरा.
पळस फुल येला ,
डोंगरी आली शोभा ,
आपल्या बहिणी साठी ,
बंधू लोकाच्या दारी उभा.
भाऊ एक ना एक दिवस नक्की येईल .आपल्याला माहेरी घेऊन जाईल या एका आशेवर ती आता आपल्या कामाला लागते. आणि तिच्या नकळत तिचा भाऊ घरी येतो .
बंधुजी माझा आला ,
मला आलेला ठाव नाही.
जाऊबाई होती घरा ,
तीन आग्रह केला नाही ,
बंधू माझा ग रहाला नाही .
बंधू डाग च्या खाली गेला ,
हात शेल्याचा वर केला,
शेला कशान झळकला .
बया ग विचारिती ,
शेला कशानी भिजयेला ,
काय सांगू आई बाई ,
बहि ना माझी च्या गावावर ,
मेघराजा हा बरसला .
बहिणीच्या गावी जाऊन पन तिची भेट झाली नाही,त्याला कोणी आग्रह पण केला नाही याची खंत त्याच्या डोळ्यातून अश्रु रूपाने बाहेर पडते .मात्र तो ही व्यथा आईला सांगू शकत नाही. आई विचारताना तो आईला सांगतो की , आई माझा शेला बहिणीच्या गावावर पाऊस होता त्यामुळे भिजला .
एक छोटीशी ओवी. पण किती नाजूक आणि हळवी भावना व्यक्त केली आहे या ओवी मधून .
बहिणीला सासुरवास आहे,हे तो आइला नाही सांगू शकत.
भावाची जशी आठवण तिला येते तशी बहिणीची पन येतेच. ती अशीच तिच्या सारखी दूर च्या गावी असते.तिला ही असाच सासुरवास असणार. म्हणून ती आपल्या मेव्हण्याला या ओवी मधून निरोप धाडते .
सांगावा मी बी सांगी ,
दूर देशीच्या मेव्हण्याला ,
धन संपदा तुझी तुला,
भन भेटव माझी मला.
सांगावा मी बी सांगी ,
लखोट्या मध्ये चीठी ,
माझी तू बहिणाबाई ,
कंत(नवरा) घेऊन यावी भेटी .
सांगावा मी बी सांगी
माझा सांगावा जाऊ रहाऊ ,
माझ्या त्या बहिनाईचा
पर मुलखी तिचा गाव .
माहेर म्हणजे आई बाबा ,बहीण भाऊ येवढच सीमित नसतं माहेरच्या आठवणीच्या कप्प्यात एक कप्पा असतो तो सखीचा ,जिवाभावाच्या मैत्रिणीचा ,जिच्या शिवाय माहेर अपूर्ण.अशी ती आपली घडणी(मैत्रीण).
आपल्या घडणी ची आठवण आली की ती गुणगुणते
घडणी मी ग केली ,
वयल्या गल्लीला जाऊयेनी ,
जीवाला माझ्या जड ,
आली कंदील लाऊयेनी .
घडणी मी ग केली ,
पाण्याला जाता जाता
साखरेचा लाडू मी ग ,
ठेविला खाता खाता .
माहेरच्या आठवणी,मोठेपणा किती सांगू आणि किती नको अस प्रत्येक स्त्री मनाला होऊन जात .
नाचण्याच पीठ मी ग
मळीता येत घट्ट ,
माझी सोन्याची काटवट ,
माझं माह्यार बळकट .
या जात्यावरच्या ओव्या म्हणजे स्त्री मनाचा आरसाच आहेत .
जात्या वरच्या घरघर आवाजात ती आपलं सारं मन उघड करते. आपल्याला होणारा जाच ,सासुरवास ती सार सार काही ओवी तून गाते .
सासुर ये ग वस ,
कुणी करू ने त्यांनी केला ,
आपला मायबाप ,
पर मुलखी राहियेला .
सासुर ये ग वस ,
भल्या भल्याचा लेकराला ,
आडवा खरवत ,
इमारतीच्या ग लाकडाला .
सासुर ये ग वस,
तिथं आपलं नाही कोणी ,
बया ग माझी बोल ,
शेजी जोडाव्या मायभनी.
आई सांगते की सासर मध्ये सासुरवास होणारच.तिथ आपल कोणी नाही...अशा वेळी शेजारिनी मायबहिनी सारख्या जोडाव्या.
पण काहिवेळा प्रत्येकीला सासुरवास होतो अस नाही .काहींना खूप माया,प्रेम ,जिव्हाळा मिळायचा सासरी. मग ती सासरच कौतुक तर करणारच .
सासुर ये ग वस ,
सासू बाईंनी नाही केला ,
भांगातला केस,
नाही आडवा जाऊ दिला .
सासू नी सासरा ,
माझ्या देव्हा र्या वरल दयावं .
हवशी चूडेराजू (नवरा),
आम्ही जोड्यान पाया पडू .
खूप काळ लोटला जातो .
आता माहेर पन पहिल्या सारखं राहिलेलं नसतं .आई बाबांची सत्ता कमी झालेली असते. आणि भाऊ भावजय ची सत्ता आलेली असते. ती खंत तिच्या मनात घर करून असते. तिच्या ओवी तून ती व्यथा बाहेर पडते .
माय बापाच्या राज्य मंदी ,
मी ग खाल्या गुळभेल्या ,
भाव भावजाच्या राज्या मंदी,
बहिणी गुराळ्या वयन गेल्या .
वाट ग वयला वड ,
वड पानांनी झाला जड ,
माय बापाला लेकी गोड ,
भन भावाला झाली जड .
वाट ग वयला वड,
वड पिकाला साखराचा .
आम्हा भनी भावंडांचा मेळा ,
जमला पाखरांचा.
चौघी आम्ही भनी ,
चार खेड्यांचा चिमण्या ,
बंधू जीच्या सोप्या मंदी ,
आम्ही धर्माच्या पाहुण्या .
आई बाबा ,भाऊ भावजय किती ही मोठे असले तरी आता तिच्या साठी तिच्या नवऱ्याच घर आणि तिचा नवरा हेच सर्वस्व होऊन जात .
समर्थ मायबाप सत्ता नाही काडीची ,
दुबळ्या भरताराची (नवरा)कुलूप काढावी माडी ची.
नवऱ्या वरची प्रीती ती ओवी तून प्रकट करते.
भ्रतार शिवी देतो ,
त्या ग शिविचा नाही राग,
कंत कैवारी पाठीमागं .
पिकलं सिताफळ ,
तिची हिरवी झाली काया ,
रागीट भरताराची ,
आहे पोटात त्याची माया .
भरताराच ग सुख ,
सुख सांगीते गोता मंदी ,
धडीच्या धोतरची ,
केली सावली शेता मंदी.
वर्षा मागून वर्ष सरतात .आता ती सासरच्या घरची मालकीण झालेली असते .
सासरच्या घराचा मोठे पणा सांगताना ती गाते .
थोरल माझं घर ,
हंड्या भांड्याचा पसाईरा .
दौलत सासरा,
वाडा बांधूया दुसरा .
भावा भावा च भांडण ,
आम्हा जावांच एकमत ,
हवशी चुडेराजू ,
नको घालूस आडभित .
स्वतःच्या कल्पनेतून ती क्षणात माहेरी तर क्षणात सासरी जाते.
स्वतःच्या लेकरांच कोडकौतुक ती ओवी तूनच करते .
हवश मला भारी ,
ताटा शेजारी वाटीची ,
शेजारी वाटी ची ,
लेक लेकाच्या पाटीची .
लेकाच्या पराईस ग ,
लेक कशांन झाली उनी ,
कशान झाली उनी ,
एका कुशीची रत्न दोन्ही .
थोरला माझा ल्योक ,
जशा वाड्याचा कळइस ,
धाकली माझी बाय ,
जणू दारी ची तुळइस .
कोणत्याही आईला आपली मुल मग तू मुलगी असो वा मुलगा एकसमानच असतात. आई कधीच दोन्ही मध्ये फरक करत नाही.तिच्या साठी ती एका कुशीची च दोन रत्न आहेत. मुलगा वाड्याचा कळस आहे तर तिची लेक तिच्यासाठी दाराची तुळस आहे. किती छान विचार मांडले आहेत या ओवी मधून.त्याकाळी स्त्रिया अशा विचार करायच्या.आपल्या ओवी मध्ये त्यांनी मुलगा मुलगी भेद अजिबात नाही केला.
लाडक्या लेकियेला ,
काटा रूततो भोपळीचा .
काटा रुततो भोपळीलीचा
पाय नाजूक पुतळीचा .
माझ्या लेकीचा पाय इतका नाजुक आहे की तिला
भोपळीचा काटा रूततो.अशी नाजूक लेक कुणाच्या घरी द्यावी. अशा लेकीला आपल्या भावाच्या घरी द्यावी भावाला इवाई करून घ्यावं अस तिला वाटत. ती आपल्या मनीची इच्छा बोलून दाखवते .
बंधू इवाई करू गेलो,
सेनापतीच्या तोलण्याचा .
केला राजाच्या बोलण्याचा .
बंधू इवाई करू गेलो ,
भावज गुजर बोलणा,
बधुजी काई बोल ,
बहिनाई इलाज चालना.
बंधू इवाई करू गेलो ,
आंबा सोडून चिंचेखाली ,
गावात वर्दी गेली,
भन भावाची इन झाली .
बंधू इवाई करू गेलो ,
दयाज मागीत थोड थोड ,
जीन्या सहित पाच घोड .
कोणत्याही आईला आपलं मूल खूप शिकाव मोठं व्हावं असं वाटतच. म्हणूनच ती ओवी मधून शाळेच्या मास्तराना म्हणते .
शाळेच्या मास्तराला ,
तुला देते मी नारळ ,
माझ्या ग बाळायेला ,
लीन शिकिव सरळ .
शाळेच्या मास्तराला ,
तुला देते मी खारीक ,
माझ्या ग बाळायेला,
लीन शिकिव बारीक .
शाळेच्या मास्तराला ,
तुला देते मी कंबाळ ,
माझ्या ग बाळायेला
बाळ माझ्याला सांभाळ .
स्त्रीला आपल्या मनातील गोड कडू अनुभव ,चांगले वाईट भाव,सुख दुःख सांगायचं एकमेव साधन म्हणजे ओवी .ओवी म्हणजे स्त्री मनाचा आरसा ,जे तिला स्पष्ट बोलता येत नाही ते तीला ओवी मधून गाता यायचं.स्त्री जन्माची व्यथा या ओवीतून च पहायावस मिळते.असा जन्म आता तिला पुन्हा नको आहे. म्हणूनच ती आता देवा कडे एकच मागणं मागते .
नाचण्याचा कोंडा
नाही कशाचा कामकाजा ,
लेकीचा जलोम
नको घालूस येड्या रामा .
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻.