गुरु विना तयार झालेला जन्मजात ढोलकीपटू ,अरुण शिंदे
पेठ वडगावात भारत तरुण मंडळ हे ठाणेकर चौकात आहे. त्या मंडळात प्रामुख्याने कैलासवासी अण्णासाहेब हिरवे, एस. के. आमने, श्री. मनु भंडारे, श्री निळकंठ नकाते (राजेंद्रकुमार) व श्री रंगा परीट ही मंडळी काम करीत होती.या सर्वांचे एक वैशिष्ट्य होते हे सर्व पट्टीचे कलाकार होते. यांच्या कलांना वाव देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे कै.रघुनाथ ठाणेकर . यांची त्यांच्या प्रत्येक कामात सगळ्या परीने मदत असे. गणपती उत्सवात हलते डेकोरेशन हे या मंडळाचे वैशिष्ट्य होते. हे देखावे पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लोक बैलगाडी करून येत असत.
ह्या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे या मंडळाने बरेचसे कलाकार तयार केले. त्यांना प्रोत्साहन दिले. पाठीवरती मायेचा हात ठेवला. याच गल्लीतले एक कलाकार श्री. अरुण ज्ञानोबा शिंदे यांचा ढोलकीवादक म्हणून या कलेचा उगम या मंडळातून झाला. सुरुवातीला अरुण शिंदे डब्याच्या तालावर वाजवून शिकले. त्यानंतर त्यांना पहिली ढोलकी विनामोबदला तयार करून दिली. श्री बापू शंकर सुतार खोचीकर, श्री लिंगाप्पा चौगुले आचारी व नूरमोहम्मद आत्तार* या लोकांनी मित्राला प्रोत्साहन म्हणून तयार करून दिली. त्यानंतर अरुण शिंदेने भारत तरुण मंडळाचे सर्व कार्यक्रम, नाटक, संगीत रजनी, करावयाचे सुरू केले.
त्यानंतर भारत तरुण मंडळाने 1976 साली विच्छा माझी पुरी करा हा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाची ढोलकी वादनाची जबाबदारी पूर्णपणे अरुण शिंदे यांनी सांभाळली. या कार्यक्रमाचे सलग वीस कार्यक्रम(प्रयोग) झाले.वडगावकरांनी या मंडळाच्या सर्व कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले. भारत तरुण मंडळाच्या कार्यक्रमातूनच अरुण शिंदे यांची सर्व भागात ओळख निर्माण झाली.
🎵त्यानंतर बी. वाय. हायस्कूलच्या रघुपति भट्ट सरांनी पहिली संधी आकाशवाणी सांगली केंद्रावर 1982 साली दिली. त्यात मला सरांनी संधी दिली. ढोलकीची मी साथ केली, याकरिता आकाशवाणी कडून मला मानधन म्हणून 2500 रुपये मिळाले, ही आयुष्यातली पहिली कमाई होती. त्यानंतर केडीसी बँकेत शिपाई म्हणून दहा वर्षे महिन्याला दीडशे पगारावर नोकरी केली. त्यानंतर कै.चंद्रकांत गाणबावले हे संभुआप्पा उरसाला गाण्याचा कार्यक्रम करीत असत. त्यात अरुण शिंदे यांना खास आमंत्रित करीत. नवोदित कलाकारांना ते नेहमी प्रोत्साहन देत असत. ते एकदा अरुण शिंदेला घेऊन कोल्हापूरला गेले, व एका ओळखीच्या दुकानात थोडावेळ बसण्यास सांगितले. त्यावेळी तिथे बसले असता तिथे शाहीर सुरेश लोखंडे यांची भेट झाली. एक कलाकार दुसऱ्या कलाकाराला ताबडतोब ओळखतो. सुरेश लोखंडे त्यांना घेऊन जगदीश खेबुडकर यांच्या घरी गेले. जगदीश खेबुडकर पट्टीचे कवी. त्यांनी अरुण मधील कला ओळखली, व गावरान मेवा या कार्यक्रमासाठी सहा वर्षांचा करार केला. या करारावर साक्षीदार म्हणून श्री चंद्रकांत गाणबावले यांनी सही केली, गावरान मेवा चे सलग 250 कार्यक्रम झाले. या कार्यक्रमात तीन वर्षे ढोलकी वादनाचे काम करताना माझा सुधाकर साळुंखे (ढोलकी वादक) व प्रकाश मोहिते या लोकांशी परिचय झाला व त्यांच्या कलेला वाव मिळाला. भारत तरुण मंडळाचे प्रसिद्ध संगीतकार के. सिकंदर यांची भेट झाली,स्नेह वाढला, व चित्रपटांमध्ये ढोलकी वाजवण्याची संधी त्यांना दिली. ढोलकी, कलंकिता, झुंज तुझी माझी, टोपीवर टोपी, इरसाल कार्टी, शुभ बोल ना-या, प्रतिकार. अशा दहा चित्रपटात ढोलकीची साथ केली.
🎵 त्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अभिनंदनाची पत्रे येऊ लागली. पुन्हा एन. रेळेकर त्यांच्या संगीत कॅसेट मध्ये काम मिळाले. त्याचे 70 कार्यक्रम झाले. नंतर आकाशवाणी सांगली केंद्रावर 20 कार्यक्रम झाले. त्यानंतर आमचा बाप खोटा होता या लोकनाट्यात काम मिळाले. त्याचे 70 प्रयोग झाले. आतापर्यंत वीस ते पंचवीस सन्मानपत्रं मिळाली आहेत. अन्न नागरी पुरवठा विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडून 'उत्कृष्ट ढोलकी वादक' म्हणून मानचिन्ह मिळाले आहे.मुंबई दूरदर्शने सुद्धा त्यांच्या कार्यक्रमात ढोलकी वाजवण्याची संधी दिली. गणेश कॅसेट कंपनी मुंबई, सोनी रेकॉर्डिंग कंपनी कोल्हापूर, यांच्याकडून सातत्याने ढोलकी वादकाचे काम मिळाले. 💫 सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, आशा भोसले, सुदेश भोसले, उत्तरा केळकर या महान गायकांच्या गाण्याला ढोलकीची साथ 'अरुण शिंदे' यांनी दिली आहे, ही गोष्ट गावकऱ्यांना माहित नसेल पण याचा अभिमान मात्र सर्वांना आहे.त्यानंतर जबलपूर आकाशवाणी, रायपूर आकाशवाणी येथे कार्यक्रम केले. गोलाबारूद कंपनी पुणे (खडकी), यांची दीडशे वर्षे सेवेला पूर्ण झाली, त्यांच्या 'लोककला' कार्यक्रमासाठी निवड झाली. पेठ वडगांवचा, 💫 वडगाव भूषण व कोल्हापूर कलापथक संघटना यांच्याकडून 💫जीवनगौरव पुरस्कार मिळाले. यानंतर या सगळीकडच्या पळापळीत व धांदलीत स्वतःच्या कुटुंबाचे पालन पोषण ही जबाबदारी महत्त्वाची होती. ही भूमिका त्यांच्या पत्नी सौ. उषा अरुण शिंदे यांनी पुरेपूर पार पाडली.
या दरम्यान त्यांचे सासरे किसन तुकाराम कांबळे हे स्वतः अरुणच्या घरी असत. अरुण शिंदे यांच्या प्रगतीमध्ये त्यांची पत्नी व सासरे यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांना एक मुलगा व मुलगी आहे. मुलाला ढोलकीचे ज्ञान देणे सुरू आहे. यावेळी कलाकारांना लग्नासाठी कोणी मुलगी देत नव्हते पण, सासर्यांनी नुसती मुलगी दिली नाही तर आजपर्यंत त्यांच्या कलेला प्रोत्साहन दिले.
महाराष्ट्र शासनातर्फे वयोवृद्ध कलाकार मानधनासाठी विलास पाटील (जिल्हा परिषद) यांनी शिफारस केली व त्यांना गेली दोन वर्षे 2250 रुपये मानधन मिळते. करोना काळात *माननीय शरद पवार* यांनी कलाकार जगावा म्हणून 3000 रुपये मदत सर्वांना केली. अशा कलाकाराला साप्ताहिक युवा मराठा व माझ्यातर्फे पुढील वाटचालीस शुभेच्छा व मानाचा मुजरा🙏🏻
शब्दांकनः- सुरेश भट, वडगांव
मो. 9860945169