औरंगाबाद जिल्ह्यात जागतिक मृदा दिवस कार्यक्रम साजरा
पाच डिसेंबर जागतिक मृदा दिन
औरंगाबाद (प्रतिनिधी):-जिल्हा मृदा सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी कार्यालय औरंगाबाद, कृषी विज्ञान केंद्र,पैठण रोड,औरंगाबाद व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०५ डिसेंबर रोजी मौजे सटाणा ता.जि. औरंगाबाद येथे जागतिक मृदा दिवस कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना केव्हीकेचे प्रमुख डॉ.किशोर झाडे म्हणाले की, आज मातीचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी जमिनीची मशागत करताना सेंद्रिय खतांचा वापर करणे गरजेचे आहे. तसेच हिरवळीच्या पिकांची लागवड करणे आवश्यक असून शेतातील काडीकचरा शेतात कुजवणे गरजेचे आहे. यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढण्यास खूप मोठ्या प्रमाणावर मदत होते तसेच सर्व पिकांमध्ये निंबोळी अर्काचा प्रभावी वापर करावा आणि जैविक खते व बुरशीनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणावर केल्यास नक्कीच पिकाचे उत्पादन वाढीत मोठा फायदा होणार आहे. तसेच त्यांनी यावेळी डाळिंबातील मूल्यवर्धन व प्रक्रिया उद्योग उद्योग याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमांमध्ये औरंगाबाद जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी श्री चंद्रशेखर भोगे, केव्हीके विषय विशेषज्ञ डॉ.बस्वराज पिसुरे, डॉ.संजूला भावर, श्री.अशोक निर्वळ, श्री विवेक पतंगे,जिल्हा मृद सर्वेक्षण कार्यालयाचे श्री राजीव सिलमवार यांच्या सह कृषि पर्यवेक्षक श्री व्ही.जी.इनकर ,कृषी सहाय्यक श्री.रंगनाथ पिसाळ, श्री.गणेश देवळे, सरपंच श्री.जानिमिया, उपसरपंच श्री.नारायण घावटे गावातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री.भोगे म्हणाले की, सर्व शेतकऱ्यांनी माती परीक्षण करणे आवश्यक असून माती परीक्षण करण्यासाठी मातीचा नमुना घेताना कोणती काळजी घ्यावी घ्यावी यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात डॉ.पिसुरे यांनी समाज माध्यमांचा शेतीसाठी प्रभावी वापर कसा करावा या संदर्भात माहिती दिली तसेच सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे एका ठिकाणी मिळावेत यासाठी शासनातर्फे 1800 123 2175 व 14426 हे दोन टोल फ्री क्रमांक देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तरी यासाठी सर्व शेतकऱ्यांनी किसान सारथी या पोर्टलवर आपली नोंदणी करावी असे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी डॉ.भावर यांनी गावातील प्रमुख पीक असलेल्या डाळिंब पिकास संदर्भात सविस्तर माहिती दिली तसेच बहार नियोजन एकात्मिक खत व्यवस्थापन यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन देऊन शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी बोलताना श्री.पतंगे यांनी माती परीक्षणावर खत व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन केले आणि मातीचे क्षारीकरण कशामुळे होते व क्षारीकरण थांबवण्यासाठी काय केले पाहिजे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. श्री.निर्वळ यांनी हवामानाच्या बदलानुसार शेतकऱ्यांनी शेतीत काय उपाययोजना कराव्यात या बद्दल व केव्हीकेच्या जिल्हा कृषी हवामान केंद्र द्वारे तयार करण्यात येणाऱ्या कृषि हवामान सल्ला पत्रिका याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
यानंतर प्रत्यक्ष डाळिंब बागेच्या प्रक्षेत्रावर भेट देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी गावातील सरपंच व सर्व प्रतिष्ठित मंडळी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
World Soil Day celebrations in Aurangabad district