नागपूर/प्रतिनिधी:
घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांकडील ग्राहकांकडील वीज बिलांची शंभर टक्के वसुलीसोबतच सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेच्या चालू वीज बिलांची संपुर्ण वसूली करण्याला प्राधान्य देण्याच्या सुचना महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी दिल्या आहेत.
नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या नागपूर, चंद्रपूर, गोंदीया, अकोला आणि अमरावती या पाचही परिमंडलातील वरिष्ठांच्या संयुक्त आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते.
गैरकृषी वीज वापर वाढविण्यासाठी सर्व नादुरुस्त मीटर लवकरात लवकर बदलण्या सोबतच मानव संसाधन विभागाशी संबंधित प्रलंबित विषयांचा त्वरीत निपटारा करण्याच्या सुचनाही दिलीप घुगल यांनी यावेळी केल्या. या बैठकीत लघु व उच्चदाब ग्राहकांसोबतच सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांकडील वीज बील वसुली, 1 एप्रिल 2019 पासून एकदाही वीजबिलांचा भरणा केला नसलेले सोबतच पाच हजारापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करणे, सामान्य व सरासरी वीज बील, बी-80 प्रकरणांना मंजूरी, कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांपैकी 5 टक्के ग्राहकांची तपासणी, मीटरवरील वीजवापराच्या नोंदीची पुनर्पडताळणी, विविध योजनांतील कामांच्या प्रगतीचा आढावा, वितरण रोहीत्रे व ऊर्जा रोहीत्रे, कॅपेसिटर बॅंक, वीज वाहिनी संरक्षण यंत्रणा, उच्चदाब वितरण प्रणाली, एकात्मिक ऊर्जा विकास योजना, दिन दयाल उपाढ्याय ग्रामज्योती योजना, अधिक हानी असलेल्या वीज वाहिन्या, पुर्व विदर्भ योजना, वीज वितरण यंत्रणा सक्षमीकरण योजना, देखभाल व दुरुस्ती योजना, मुख्यमंत्री सौर कृषीपंप तसेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना यांच्यासोबत गैर कृषी वीज वापर वाढविणे, नादुरुस्त मीटर बदली करणे आदी कामांचा आढावा घेण्यात आला.
अधिका-यांचा सत्कार
महावितरणतर्फ़े नुकत्याच आयोजित राज्यव्यापी रक्तदान शिबिरात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणा-या गडचिरोली मंडलाचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे, सौभाग्य योजनेत प्रशंसनिय कार्य केल्याबद्दल महावितरणच्या अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पारितोषिकासाठी निवड झालेल्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप पराते तसेच विपरीत परिस्थितीत महाल, गांधीबाग व सिव्हील लाईन्स या विभागाचे काम समर्थपणे हाती घेत त्यास सुरळीतपणे चालविणा-या नागपूर शहर मंडलचे अधीक्षक अभियंता दिलीप दोडके, सिव्हील लाईन्स विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे, महाल विभागाचे कार्यकारी अभियंता समीर टेकाडे व गांधीबाग विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल जीवतोडे यांचा ग्रामगिता देऊन प्रादेशिक संचालकांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
या बैठकीला मुख्य अभियंता (गुणवत्ता नियंत्रण) सुहास रंगारी, अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल डोये, अमरावती परिमंडलाच्या मुख्य अभियंता सुचित्रा गुजर, गोंदीया परिमंडलाचे मुख्य अभियंता सुखदेव शेरकर, चंद्रपूर परिमंडलाचे प्रभारी मुख्य अभियंता हरिश गजबे, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार, उपमहाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) प्रमोद खुळे, उपमहाव्यवस्थापक (मानव संसाधन) वैभव थोरात यांच्यासह पाचही परिमंडलातील अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, लेखा तसेच मानव संसाधन विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.